माझं पान


खूप दिवसात ‘माझं पान’वर काही लिहिलं नाही.

मध्यंतरी वाचलं होतं, 'प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं आणि ध्यान म्हणजे त्याचं म्हणणं ऐकणं.' ही ओळ मनात ताजी असतानाच रोज पहाटे दूरच्या मंदिरातून लाऊडस्पीकरवरून लावलेली गाणी, आरत्या ऐकू यायच्या. पहाटेची निर्मळ शांतता भंग करणारी ती भक्ती नको वाटायची. मग विचार आला... इथे सगळ्यांना फक्त सांगायचंय. ऐकायचं कुणालाच नाही. देवाचं तर नाहीच...
माणसांचंही ऐकायचं कुणालाच नाही. सोशल मीडियावरही सगळ्यांना स्वतःचं काही सांगायचंय, दाखवायचंय. ...घरी केलेल्या एखाद्या खाद्यपदार्थापासून ते आध्यात्मिक मतांपर्यंत सगळे फक्त बोलतायत...
बोलतायत... बोलतायत 

हे प्रदर्शन ही अपरिहार्यता आहे का
हातात हात घेऊन आपुलकीने 'तुझ्या मनातलं कळतंय मला...' ही जाणीव देण्याइतका एकमेकांसाठी वेळ नाही. आयुष्यातून ही तरलता संपत चालली आहे.  नाती इतकी औपचारिक झालीत की सुखदुःख कुणाजवळ सहजतेने व्यक्त करणं अवघड झालंय. टीव्ही, मोबाईल, नेटमुळे सगळ्या जगाशी कनेक्टेड असतो आपण, पण घरी आल्यावर टीव्ही ऑन करण्यापेक्षा तुझा दिवस कसा होता आज? हे विचारायला विसरतो आपण आणि कुणी सांगायला लागलंच तर त्यात आपल्याला काडीचाही इंटरेस्ट नसतो. मग बोलणारा बंद करतो बोलणं... व्यक्त होण्याचा एक मार्ग उरतो, तो ‘व्हर्च्युअल जवळच्या’ माणसांचा. ऐकणारा समोर नसेल... तो माझा कुणी नसेल... पण याला खोडूनच काढायचं या एकमेव भूमिकेतून संवाद करीत नसेल किंवा आपल्या  बोलण्याला तो दुर्लक्ष करताना आपल्याला फालतू, अनावश्यक गोष्टी बोलणारा मानत नसेल. 

म्हणून जे जे काही बोलायचं, दाखवायचं ते आपण सोशल मीडियावरच दाखवतो. कदचित म्हणून बोलणारे खूप आहेत, ऐकणारे कुणी नाही अशी अवस्था आहे. या सगळ्या कोलाहलाचा ताण येत असेल. वातावरणात जणू शब्दांचं ट्रॅफिक जॅम झालंय. 

बाळ छोटं असल्यापासून आपण त्याच्या व्यक्त होण्याचं कौतुक करतो. ते शांत बसलं की अस्वस्थ होतो. घरात नातेवाईकांना कविता म्हणून दाखवण्यापासून ते रिअॅलिटी शोमधे परफॉर्म  करण्यापर्यंत  आपण बोलायला शिकवतो. सहानुभूती आणि इंटरेस्ट घेऊन ऐकायचं कसं हे कुठे शिकवतो? शांत राहून निसर्ग ऐकायला कुठे शिकवतो? त्याआधी फोटो घेऊन ते अपलोड करण्याची, दाखवण्याची घाई असते आपल्याला. 

या कोलाहलात भर टाकण्याचा अचानक कंटाळा आला म्हणून नाही लिहिलं. पण लिहिणं, व्यक्त होणं हा माझाही श्वास आहे! 
मी तरी कशी लांब राहणार पेनपासून? तेव्हा म्हटलं चला... ट्रॅफिक जॅम मध्ये आपणही आपले शब्द उतरवू या. ...माझ्या व्हर्च्युअल माणसांसाठी सुद्धा!


 राजलक्ष्मी देशपांडे 

No comments:

Post a Comment