सिंगापोर

Part 1
गेल्या महिन्यात कामानिमित्त सिंगापूरला जाण्याचा योग आला. 'लगे हाथों' अजून एखादा जवळचा देश फिरून यायची योजना आखली. थायलंड, मलेशिया, बाली, कंबोडिया असे अनेक लोकप्रिय पर्याय समोर होते. प्रेक्षणीय स्थळं पाहण्यापेक्षा मला इतिहास, संस्कृती, सामाजिक घडण व विकासाचे वेगळे अवतार पाहायला जास्त आवडणार होतं. या दृष्टीने थायलंडला जायचं ठरवलं. आर्थिक दृष्ट्या पण ते जास्त फायद्याचं होतं. बँकॉक, पट्टाया, फुकेत ही इथली लोकप्रिय ठिकाणं आहेत. पण इतर पर्यायांचा शोध घेताना एका फिरस्त्या नातेवाइकाने 'आयुत्थया' हे ठिकाण सुचवलं. बँकॉकपासून दीड तासाच्या अंतरावर असलेलं  हे गाव; सयामची (थायलंडचं पुरातन नाव) राजधानी होतं. तब्बल ४१५ वर्षं! तिथे रेल्वेनी जाताना आजूबाजूचा प्रदेश-शेती-गावं-निसर्ग न्याहाळता येईल हा पर्यायही आवडला.

प्रगत आदर्श राष्ट्र 'सिंगापोर', राजेशाही थायलंडची आधुनिक राजधानी 'बँकॉक' आणि जागतिक ऐतिहासिक ठेवा 'आयुत्थया' असा बेत ठरला.

सिंगापोरमध्ये भारतीय उपखंडातून; दक्षिण व बंगाल भागातून आलेले लोक काहीशे वर्षांपासून इथे स्थायिक झाले आहेत. एक 'लिटिल इंडिया' नावाचा भागच या देशात आहे. शासनाचा कारभार ज्या तीन भाषांतून चालतो त्यापैकी एक भाषा तामिळ आहे, अशी ऐकीव माहिती होतीच. दिवाळीच्या निमित्तने लिटिल इंडिया मेट्रो स्टेशनच्या अंतर्भागात केलेली प्रेक्षणीय सजावट व्हाट्सअपवर पाहायला मिळाली होती. भारतीय संस्कृती जोपासणारे १०-१२ % लोक व त्यांची अभिव्यक्ती पाहण्यास मी उत्सुक होतो.

सिंगापोरमध्ये 'Changi' हवाईतळावर उतरताच तिथे स्वागत केलं ते भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याने- 'मोराने'. मोरांच्या सुंदर प्रतिकृती खऱ्याखुऱ्या अर्किड्सच्या साहाय्याने साकारल्या होत्या. बनविणाऱ्या कारागिरांचे काम अत्यंत सफाईदार, उत्तम दर्जाचे होते.

प्रतीक भारतीय पक्ष्याचे भारतीय सणानिमित्त साकारलेलेच; पण त्यात कुठेही 'चलता- है' असा भारतीय आविर्भाव नव्हता. ही पहिली खूण सुखावून गेली. विमानतळावरही बरेच भारतीय वाटणारे लोक कामाला होते. विमानतळसुद्धा आपल्या बंगलोरच्या दर्जाचंच वाटलं... किंवा बंगलोरच्या उत्कृष्ट विमानतळाची सवय असल्याने त्या विमानतळाचं विशेष काही वाटलं नाही. उलट आपणही बरेच सुधारत चाललो असल्याची जाणीव सुखावून गेली.

पोहोचल्याच्या दिवशीच 'लिटिल इंडिया' भागात कामानिमित्त जाणं झालं. 'लिटिल इंडिया' भाग या शहरवजा राष्ट्राच्या जुन्या मध्यवर्ती भागात आहे. नाव जरी ‘लिटिल इंडिया’ असलं तरी इथे बांग्लादेशी लोकांची अनेक दुकानं व वसाहत आहे. हा भाग चकाचक सिंगापोरच्या मानानी अस्वच्छ आणि अव्यवस्थित वाटतो. या भागात स्वच्छता अभियानासाठी व सुशोभीकरणासाठी काय करता येईल असा उद्देश मनात होता; त्या संदर्भात लोकांशी विषय छेडावा म्हणून प्रयत्न केला. सिंगापोरमध्ये एकुणातच वागण्या-बोलण्यात अलिप्तता आहे. आपल्यासारख्या पाल्हाळीक भारतीयांच्या मानानी तर जास्तच. आम्ही इथल्या अस्वच्छतेबाबत काम करायचा मानस व्यक्त करत होतो, तशा जागांच्या मालकीविषयी विचारपूस करत होतो. लोकं मात्र बोलणं टाळत होती किंवा मोकळेपणानी बोलत नव्हती. येथील कडक कायदे व व्यवस्था याबाबतीत लोक बिचकून असावेत किंवा सिंगापोरमधल्या या गरीब भागात बेकायदेशीरपणा असण्याची दाट शक्यता आहे असंही वाटून गेलं. येथील स्थायिक भारतीयांच्यात 'गरीब कामगार वर्ग' 'श्रीमंत नोकरदार / व्यावसायिक वर्ग' अशी साहजिक दरी आहे. येथील कामगार वर्गाच्या सवयी व अशिष्ट वर्तन  यामुळे इतर भारतीय त्यांच्यापासून फारकत ठेवून असतात असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. सिंगापोरमध्ये चायनीज व मलेशियन वंशाच्या अशाच वसाहती आहेत. तौलनिक निरीक्षणासाठी त्याही पाहायची तीव्र इच्छा होती.

आम्ही दुसऱ्या दिवशी चायनाटाऊनला जायचं ठरवलं. दाटीवाटीची वस्ती व छोटी छोटी दुकानं तिथेहि होती, परंतु तुलनेने जास्त नेटकेपणा होता. गल्लीच्या एका टोकाला निवृत्त-वयस्क मंडळी खुर्च्या टाकून 'महाजोंग'चा पट मांडून बसली होती व इतर उभे राहून विडीकाडी-गप्पाटप्पा करत होते. हे चित्र बरंच काही सांगून जातं. एकाच प्रकारच्या संस्कृतीचा भाग असलेले हे लोक होते - वयस्क लोक इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कमी एकलकोंडे असावेत - तरुण पिढी वृद्धांची काळजी घेत असावेत. त्यांना असं एकत्र येताना मोकळेपणा वाटतो. कुटुंबाची वीण अजूनही घट्ट असावी. 'लिटिल इंडिया' भागात मात्र वांशिक असमानता आहे, बेकायदेशीर अथवा संदिग्ध मालकीच्या जागा आहेत. इथे बेकायदेशीर घुसखोर व निर्वासितांच्या वसाहती असणार. या सर्व बाबींमुळे हा भाग जास्त बकाल व कमी सुसंस्कृत वाटत असावा. लिटिल इंडिया भाग असाच राहील असंही वाटतं. कारण...
१. थोडासा अजागळ व स्वस्ताई असणारा भाग एक प्रकारे गरीब कामगार वर्गासाठी राखीव असल्यासारखा आहे. बाकी प्रदेश नेटका राहण्यासाठी स्थायी किंवा अस्थायी कामगारांना राहण्यासाठी-वावरण्यासाठी  हा एक हक्काचा भाग झाला आहे. त्यामुळे अशा लोकांची आणि अशा भागाची गरज लक्षात घेऊन सरकार डोळेझाक करत असावं.

२. नियमांच्या बाबतीत खुलेपणा, ढिलेपणा असलेला, स्वस्ताई असलेला, भारतीय खाद्यसंस्कृतीचे चाहते असणाऱ्या जगभरच्या पर्यटकांना आकर्षित करणारा हा भाग आहे. दक्षिण भारतीय जुनी मंदिरं पण इथे आहेत. सिंगापोरसारखं नैसर्गिक उपलब्धी कमी असलेलं छोटेखानी राष्ट्र 'पर्यटन' उत्पन्नासाठी बरंच प्रयत्नशील आहे. अशात हे स्वयंभू 'पर्यटन' ठिकाण निर्माण झाल्याने सरकार या बाबतीत नक्कीच खूश असावं.
शासकीय-राजकीय दृष्टीने मात्र त्यांनी भेदभाव केलेला नाही. तामिळ भाषेला शासकीय मान्यता, लिटिल इंडिया भागात इंडियन हेरिटेज सेंटर या कायमस्वरूपी प्रदर्शनस्थळाची निर्मिती, दिवाळी सण साजरा करण्यासाठी सरकारी उत्साह, सहभाग व साहाय्य यातून हे सिद्ध होतं. चायनीजबहुल असलेल्या, मलेशियाचा जुना भाग असणाऱ्या, भारतीय वंशाच्या व्यापारी-नोकरदार-कामगार वर्गांची पूर्वापार वसाहत असणाऱ्या, व आता अनेक मल्टीनेशनल कंपन्यांची प्रमुख कार्यालयं असल्याने  जगभरातील अनेक लोकांचं घर व कामाची जागा बनलेल्या राष्ट्राने सर्वांना समान वागणूक दिली आहे. येथील जनतादेखील स्वतःला स्वतंत्र सिंगापोर राष्ट्राचे अभिमानी नागरीक मानतात व सर्व बाबतीत इतर जगाशी स्पर्धा करण्यात उत्सुक आहेत. इथल्या टॅक्सी चालकाने बेंगलोरबाबत चौकशीही केली आणि सिंगापोर सरकारच्या 'हाउसिंग डेव्हलेपमेन्ट'चं उदाहरण देत बंगलोरच्या सरकारनी 'सरकारी घरं व सरकारी नोकऱ्या' वाढवण्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे हे समजावलं. (गेल्या वर्षी सिंगापोर सरकारने १० लाख घरं उभारण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण केला.)

आमच्याकडे सिंगापोरची इतर प्रेक्षणीय व प्रसिद्ध ठिकाणं पाहायला दीड दिवस होता. त्यात आम्ही बोटॅनिकल गार्डन, २ म्युझियम व 'मरिना बे सँड्स' ही प्रसिद्ध इमारत व परिसर पाहायचं ठरवलं.

येथील ऑर्किड गार्डनचं वर्णन करण्यासाठी केवळ 'स्वर्गीय' हा एकच शब्द सापडतो. इथे ऑर्किडपासून बनवलेले दागिनेही मिळतात. प्रत्यक्ष ऑर्किडच्या वाळवलेल्या फुलांना सोन्याचा-चांदीचा-सिरॅमिकचा लेप चढवून हे दागिने बनवले जातात. मला ते फारसे काही भावले नाहीत. या बोटॅनिकल गार्डन भागात एक वर्षावन राखून ठेवलेलं आहे. आम्ही ऑर्किड गार्डनमध्ये इतके हरवून गेलो की तिथे जायला वेळच उरला नाही.

चायना टाऊनमध्ये 'बुद्धाच्या दाताचा अवशेष' असलेलं चार मजली मंदिर म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या चायनीज-बुद्धिस्ट प्रतीकं-चिन्हं-रचना यांनी अंतर्बाह्य नखशिखांत नटलेलं राजसी थाटाचं शिल्पच आहे. 'मरिना बे सँड्स' ही जगविख्यात बिल्डिंग मानवाच्या आधुनिक अभियांत्रिकीच्या विकासाचं एक प्रतीक-शिल्पच आहे. प्रशस्तता, सुंदरता व उपयोगिता याचा अभ्यासपूर्ण वापर दिसतो. कोणत्याही दिशेने पाहून हे आधुनिक शिल्प वेगवेगळं आणि तरीसुद्धा तितकंच दिमाखदार दिसतं.

एशिअन सिविलायझेशन म्युझियममधील, समुद्रतळातून काढलेल्या (नवव्या शतकातील) व्यापारी जहाजाचे दालन आणि अफगाणिस्तानातून अतिरेक्यांच्या तावडीतून सुटलेलं बोधिसत्वाचं दगडात घडवलेलं भव्य शीर अतिशय मनमोहक आणि देखणं आहे. इथल्या दालनांची, वस्तूंची अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे. इथे प्रवेश-तिकिटातच आपल्याला एक गायडेड टूर मिळते... आपल्याला त्या त्या दालनाचं ऐतिहासिक संशोधनातलं महत्त्वाचं स्थान समजावून देण्यात येतं.

या दिलखेचक-आधुनिक-नेटक्या शहरात माझं मन पार विरघळून गेलं ते चायना टाऊन हेरिटेज सेंटरमध्ये. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात कामाच्या शोधात आलेल्या अनेक अतिगरीब गुलाम व कामगारांनी स्वतःच्या सिंगापूरमधील अस्तित्वाचा इतिहास ज्या प्रकारे मांडला आहे तो अनुकरणीय आहे. हा अनुभव मला खूप अंतर्मुख करून गेला; मी सिंगापोरमधल्या चायनीज लोकांच्या प्रेमातच पडलो म्हणा ना! त्यांचं कष्टकरी-चिवट-कुटुंबप्रिय व आध्यात्मिक जीवन मला कायम प्रेरणादायी ठरेल. कष्टाळू लोकांनी स्वबळावर अवघ्या ३५-४० वर्षांत एक आदर्श राष्ट्र निर्माण केलं आहे- सिंगापोर. जरूर पहा.

-- अनिरुद्ध अभ्यंकर

No comments:

Post a Comment