अजी मी ब्रह्म पहिले - किशोरीताई आमोणकर

मी शाळेत होते तेव्हाची गोष्ट. मी पुण्यातली. माझे आई-वडील व मी तेव्हा नेहरू स्टेडियमवर तिसऱ्या मजल्यावर लेले गुरुजींच्या योगा क्लासला जायचो. १९७४-७५ चा काळ असेल तो. आई-वडील स्कूटरवर व मी सायकलवर जायची. नेहमीप्रमाणे क्लास सुरू होता. अर्धा तास आसने झाली असतील कशीबशी, सर्वांना सर्वांगासन करायला सांगितले. तोच एक बाई दिसल्या. सडसडीत बांधा, धारदार नाक, अगदी स्पष्टपणे करारी आहेत असे जाणवणारे व्यक्तिमत्व. मागच्या बाजूला मांडी घालून बसल्या होत्या. त्या आमचा क्लास बघत होत्या. मी सर्वांगासनात, खाली डोके वर पाय अशा स्थितीत सारखी त्यांच्याकडे बघून आठवण्याचा प्रयत्न करत होते. कुठेतरी बघितलेला चेहरा आहे हा, असे सारखे वाटत होते मला.

क्लास संपल्यावर कोणीतरी बोलत होते त्यांच्याशी. नंतर पायऱ्या उतरून मी खाली गेले. सायकल मारत कशीबशी आनंद मंगल कार्यालयापर्यंत पोचली असेन मी, आणि त्या बहुतेक किशोरी आमोणकर असणार असे वाटू लागले. चैन पडणार नव्हते खात्री केल्याखेरीज. तशीच मागे फिरले आणि स्टेडियमवर परत गेले. रिसेप्शनवर विचारले की, आपल्या हॉटेलवर गायिका किशोरी आमोणकर उतरल्या आहेत का? ते 'हो' म्हणाल्यावर, पळतपळत तीन मजले चढून गेले. त्या दाराशी उभ्या होत्या. त्यांना बघितले आणि रोमांच उभे राहिले अंगावर. त्यांचं 'हे शामसुंदरा' आठवलं. पटकन जाऊन त्यांना नमस्कार केला आणि सांगितले की, मला तुमचे 'हे शामसुंदरा' , आणि 'सहेला रे' खूप आवडते. त्यांनी क्षणभर डोळे मिटून स्मितहास्य केले. "चांगल्या सवयी आहेत या योगाच्या. चालू ठेवा." म्हणाल्या. त्यांचा तो छान कमावलेला आवाज, असे साधे वाक्य बोलतानादेखील जाणवत होता. आजही आठवून डोळ्यात पाणी येते. बस्स! एवढेच काय ते बोलणे झाले. त्या त्यांच्या रूममध्ये आत गेल्या.

मी धाडधाड जिने उतरून खाली आले. त्या रिसेप्शनवरील माणसाला सांगितले, "त्या भेटल्या बरं का!!!" नंतर इतकी फास्ट सायकल मारत घरी गेले त्या दिवशी, की जन्मात एवढ्या जोरात सायकल कधीही चालवली नसेल. किशोरीताई भेटल्याचे आईला कधी एकदा सांगते असे मला झाले होते. नंतर किशोरीताईंचे कितीतरी कार्यक्रम ऐकले, पाहिले. अगदी गणेश क्रीडा केंद्रातला अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी आयोजित केलेला कार्यक्रमसुद्धा पाहिला. पण ही माझी त्यांच्याशी झालेली 'पहिली भेट' काही औरच होती. पण चुटपुट लागून राहिली की आपण त्यांच्याशी तेव्हा अजून का नाही बोललो!

--- रत्ना गोखले

No comments:

Post a Comment