नर्मदा परिक्रमा

I श्री गणेशाय नमः I
I नर्मदा जयंती I

     त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे I

     अगदी लहानपणापासून भेडाघाट येथील धबधब्याचे कॅलेंडर पाहिले की धबधबा, स्वच्छ पाणी, मोठे पात्र असलेली नर्मदा बघायची ओढ लागली.  पुढे मोठे झाल्यावर १२ ज्योतीर्लिंगे करतांना ओंकारेश्वरला नर्मदा नदी बघितली व तिथला मार्कंडेय घाट बघून तिच्या प्रेमातच पडलो व आता ही नदी बघायची. गो. नी. दांडेकरांचे भ्रमणगाथा वाचण्यात आले व लोक पायी परिक्रमा करतात हे कळले. बंगलोरला आल्यावर अर्चनाच्या वडिलांनी (ते भोपाळचे) दूरदर्शन करिता ५२ एपिसोड करतांना कसे हिंडले ते व नर्मदेचे वर्णन केले. व तरी ते सर्व एपिसोड डब्यातच राहीले. आपण इतका चांगला कार्यक्रम दूरदर्शनवर बघण्यास मुकलो. पण त्यामुळे प्रेरित होऊन लायब्ररीतून जगन्नाथ कुंटेंचे 'नर्मदे हर' व भारती ठाकुरचे 'नर्मदा परिक्रमा एक अंतर यात्रा' हे पायी चालून येणाऱ्यांचे अनुभव वाचले व नर्मदा बघायची उत्सुकता अधिकच वाढली. व तिच्या प्रेमात पडायला झाले. तरी निदान ४ ते ६ महिने पायी चालायची हिम्मत होत नव्हती. वय व शरीर कशी साथ देईल असे वाटायचे व परिक्रमेचा बेत मनातच राहिला. मधून मधून यात्रा घडत होत्या. ऑक्टोबरमध्ये कर्दळीवनात गेलो होतो. त्यानंतर एके दिवशी बसने नर्मदा परिक्रमा करायची का? असा त्यांचा मेसेज आला. मनाच्या आतल्या कोपऱ्यात सुप्त इच्छा होतीच. तिने बाहेर उसळी मारली. आम्ही डिसेंबर १४ ला जायचे ठरवले. पुणे ओंकारेश्वर व परिक्रमा पूर्ण करून परत पुणे. त्यांनी पहिली नोव्हेंबर मध्ये पहिली Batch ठरवली होती पण ती काही कारणाने रद्द झाली. आमची दुसरीच batch होती. त्यात ४० लोक येणार होते पण आम्ही १७ च राहिलो.
     मनात प्रतिभाताई चितळे यांचा संकल्प कसा करावा हा विडीओ रुंजी घालतच होता. शिवाय पायी चालणारे किती कष्ट घेतात, त्यांना किती त्रास होतो तरी पण मैय्याचे दर्शन झाल्यावर ते आनंदी असतात व चेहरे तेजाने उजळून जातात. आयुष्य कसे बदलून जाते. तिच्या नुसत्या दर्शनाने सर्व पापे धुतल्या जातात. तर 'नर्मदे हर' म्हणतांना आपला अहंकार कमी होईल या भावनेने हा निश्चय केला "ही यात्रा आहे, त्रास होणारच पण ही संधी मिळाली आहे तर आपण ह्याचे सोने करायचे. आनंद घ्यायचा, समाधान मिळवायचे. परिक्रमा आहे तर तक्रार नाही करायची." व स्वतःला भाग्यवान समजून बसमध्ये निश्चिंत मनाने बसलो.  


     शंकरमठ समाधी, सातारा रोड, पुणे इथून १४ डिसेम्बरला दुपारी ४ वाजता आमची बस सुटली. मुहूर्ताचा नारळ फुटला. नगर रोडनी आम्ही सर्व प्रवासी रांजणगाव येथे अष्टविनायकापैकी महागणपतीचे दर्शन घ्यायला निघालो. बसमध्ये नांदेडचे कुलकर्णी आमचे मनेजर होते. त्यांनी दोन वेळेला नर्मदा परिक्रमा बसने केली होती. ते माहिती सांगत होते. महागणपतीचे दर्शन घेऊन पुढे आम्ही शिर्डीला रात्री ९ ला पोहचलो. चला साईबाबाची आरती व पालखी बघायला मिळाली. तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सर्वांनाच मनात छान वाटले. सुरवातीलाच गणपती व गुरूंचे दर्शन झाले. आता मैय्या पूर्ण परिक्रमा करून घेणारच. रात्री बसमध्ये सहप्रवाशांची ओळख करतांना गाण्यांच्या भेंड्या खेळलो. व झोपेतच सकाळी ओंकारेश्वरला निरंजन आखाडा इथे पोहचलो. १५ डिसेम्बर. आजचा दिवस मोकळा होता. संकल्प १६ ला घेणार होतो. त्यामुळे आता आम्ही नर्मदामैय्याच्या मधोमध असलेल्या डोंगरावरील ओंकारेश्वरला जाऊ शकत होतो. कारण परिक्रमेत असतांना मैय्याच्या काठाकाठानेच परिक्रमा करायची असते. सकाळचे आन्हिके आटोपले व आता मैय्याचे दर्शन घेण्यासठी मन आतुर झाले.
     चंद्रवंशातील पुरुरवा राजाने कडक तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न करून घेतले होते. व त्यांनी मागितलेल्या वरामुळे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठविले. आणखी अशीपण एक कथा आहे की हलाहल प्राशन केल्यावर खूप उष्णतेने शंकराला घाम आला व त्यातून नर्मदा प्रगट झाली. तिचा वेग इतका प्रचंड होता की फक्त मेकल पर्वतच तो सहन करू शकला म्हणून ती मध्यप्रदेशातील (आताचा छत्तीसगड) बिलासपूर जिल्ह्यातील अमरकंटक गावांत ती प्रगट झाली. त्यामुळे ती मेकलसुता नावांनीपण प्रसिद्ध आहे. ती मेकल पर्वतावर उगम पावून २ मैलावर एका उंच कड्यावरून खाली कोसळते. या स्थानावर कपिल मुनींनी तपस्चर्या केली म्हणून हे ठिकाण कपिलधारा म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा ही ५ लाख वर्षापूर्वी उगम पावलेली भारतातील सर्वात प्राचीन नदी आहे. हिला रेवा, मेकलकन्या, अमरजा, रुद्रकन्या व नर्मदा अशी नावे आहेत. नर्मदा म्हणजे (नर मद) अहंकार. 'नर्मदे हर' म्हणजे अहंकार हरण करणारी. आता माणसाचा अहंकार गेल्यावर फक्त आनंदच राहाणार नं. तर नुसत्या दर्शनाने पावन करणारी अशी नर्मदा मैय्या अमरकंटकला उगम पावून छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ असा जवळजवळ ८०० मैलाचा प्रवास करून गुजराथ मध्ये भडोचजवळ पश्चिम समुद्राला मिळते. नदीकाठचा भाग सुजलाम सुफलाम करते. फक्त हिलाच आपण परिक्रमा (प्रदक्षिणा) करू शकतो. पहिली परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी २७ वर्षात पूर्ण केली. (नर्मदेला मिळणाऱ्या सर्व नद्या उपनद्या न ओलांडता). साधारण अमरकंटक पासून परिक्रमा दक्षिण काठांनी सुरु करून परत अमरकंटकला आल्यावर पुन्हा दक्षिण तीरावरील ओंकारेश्वरला अभिषेक करण्यासाठी यावे लागते. म्हणून बहुतेक जण ओंकारेश्वर पासूनच परिक्रमा सुरु करतात. आम्हीपण तिथूनच परिक्रमा सुरु केली.

तर आम्ही ओंकारेश्वरचे दर्शन घेण्यासाठी नावेतून गेलो व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. नंतर ८ किमी. ची ओंकार पर्वताला प्रदक्षिणा घातली. ही खालून नावेने पण करता येते. आजूबाजूचे सुरेख दृष्य, पर्वत, कावेरी-नर्मदेचा संगम हिरवीगार सृष्टी व स्वच्छ नितळ पाणी, पर्वतावरील पुरातन देवळे पाहून मन अगदी आनंदून गेले.
     दुसऱ्या दिवशी १६ तारखेला सकाळी नर्मदेत आंघोळ केली. मैय्यानी तिच्या स्वच्छ पात्रात थंडगार पाण्यानी मस्त आंघोळ घातली व आम्ही शुचिर्भूत होऊन, नर्मदेचे जल बाटलीत भरून घेतले व ममलेश्वरला संकल्प घेतला. पूजा करतांना पुजार्यांनी परिक्रमेत पाळण्याचे नियम सांगितले. सदा सर्वकाळ ध्यानांत रहावे. सकाळी ध्यान, स्नान, साधना करावी. शक्यतो परिक्रमा करतांना नर्मदेच्या जास्त दूर जावू नये. ब्रम्हचर्य पाळावे. तामस गुण वाढीस लागू नये म्हणून कांदा, लसूण, मांसाहर वर्ज करावा. रोज शक्यतो नर्मदेतच आंघोळ करावी व नर्मदेचे अष्टक व आरती म्हणून पूजा करावी. आपल्या उजव्या हाताला नर्मदा असावी व तिला ओलांडू नये. (जसे देवाला प्रदक्षिणा) करतो. आता आम्ही बडवानीकडे निघालो. 
या पुढील यात्रेची कथा पुढील भागात.



  
- सौ. वर्षा संगमनेरकर




No comments:

Post a Comment