कविता: तार


मी शाळेत असताना
घरी एक तार आली
घर उघडं टाकून
माणसं  पळाली 
कोणी तरी कायमचं
गेलं होतं सोडून
गाठला स्वर्ग असा
एका तारेला धरून

नंतर एकदा
पोस्टमनलाच बाबा
पेढे चारत होते
मला भाऊ झाल्याची
तार फोडत होते
तोसुद्धा आला असा
तारेलाच धरून...
खूप आनंद झाला
घर गेलं भरून

पुन्हा एक तार आली
मला नोकरी लागल्याची
तारेवरची कसरत
खरी सुरू झाल्याची 
नंतर लग्नात खूप
तारा आल्या शुभेच्छांच्या
‘तारा’सुद्धा उभी होती
तोऱ्यात अनिच्छेच्या

गेले ते दिवस
गेले ते तारांगण
आता उरले सर्वत्र 
नेटचे नभांगण
कड-कट्ट जाऊन
मोबाईलची रिंग आली
खरंच तेव्हापासून
उत्सुकतेची झिंग गेली.

--- लक्ष्मीकांत रांजणे
       
  





No comments:

Post a Comment