माहितीतले अनोळखी...


असं किती वेळा होतं की समोरची व्यक्ती  ओळखीची वाटते; पण जुजबी गोष्टींखेरीज आपल्याला फारशी माहिती नसते... मित्रमंडळ आणि त्यांच्या कार्यक्रमांविषयी थोडीही माहिती असणाऱ्यांना राजनकर काका, काकूंची नक्कीच ओळख असेल. मंडळाच्या बहुतांश कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असणारं हे जोडपं, मंडळाच्या संस्थापकांपैकी एक आहेत, या पलीकडे जाणून घेणारे थोडेच  असतील.


राजनकर काकांनी मित्रमंडळ त्यांच्या काही मित्रांबरोबर सुरू केले याची गोष्ट मंडळाच्या स्मरणिकेतून एकदोनदा येऊन गेली आहे.  मॅजेस्टिकच्या महाराष्ट्र मंडळातली ८० सालची एकांकिका स्पर्धा ही  मित्रमंडळ सुरू होण्यासाठी अवचितपणे कारणीभूत ठरली. एकांकिका रहस्यमय आणि विनोदी होती. काळा पहाडनावाची ही नाटुकली. एका वाड्यात कित्येक वर्षे बंद असणारी, बरेच प्रयत्न करूनही कुणाला न उघडता येणारी एक तिजोरी बऱ्याच जणांना अस्वस्थ करत असते. आतल्या खजिन्याबद्दल बरेच तर्क-वितर्क तर असतातच – पण त्यावर हक्क सांगणारे मग काळा पहाडला बोलावतात. पण सगळेच ओंफस होते - त्यातून निघतात पुस्तके ! अशी ही थोडक्यात कथा. राजनकर काकांच्या शब्दात  ही एकांकिका पडली. अगदी पहिल्या प्रवेशातच पडली.  साहजिकच त्या दिवशीच्या गप्पा जरा जास्तच रंगल्या असणार.  मग त्या बैठकीत कोजागिरी करायचे ठरले. परत उत्साह आला कोठारी (का मांडे?) यांच्या गच्चीत कार्यक्रम झाला करता करता ८१ साली गणेशोत्सव करायचे घाटले. मेजर नायबांनी त्यांचा हॉल देऊ केला. तो सगळ्यांनी मिळून साफ केला. एक छोटसं रोप पेरलं गेलं त्याचं छोटं रोपटं आणि मग आता एक दमदार वृक्ष झालाय.

या सगळ्या उद्योगात राजनकर काकांना  काकूंची भक्कम साथ  होती. किंबहुना त्यांच्या अॅक्टिव्ह सहभागाशिवाय हे काम होऊच शकले नसते. लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचा हा उद्योग होता.  सुरुवातीच्या एक दोन वर्षांत, गणेशोत्सवाचा महाप्रसाद हा काकांच्या बंगल्यावर होत असे. जरी अंगतपंगत पद्धतीने स्वैपाक झाला तरी – घरात चार बाहेरची माणसे जेवायला येणे हे घरच्या गृहिणीसाठी कसरतच असते इथे चाळीस माणसे असायची!! मंडळाच्या किती बैठकी राजनकरांकडे झाल्या आहेत याची मोजदाद नाही. कित्येक नाच, गाणी, नाटुकल्या यांची तयारी काकांच्या घरात झाली आहे. राजनकर काकूंचा मंडळाच्या वाटचालीतला सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.
अर्थात राजनकर / द्रविड / कोठारी / मांडे इत्यादी मंडळींनी beyond-call-ऑफ-duty जाऊन कष्ट घेतलेत. केवळ मराठी बोलतो आहे म्हणून माणसांची ओळख काढून, त्यांना या उपक्रमाची माहिती देऊन, त्यांचा फॉलोअप ठेवून,  कार्यक्रम केले. त्या काळी वर्गणी होती फक्त पाच रुपये – पण त्यासाठीसुद्धा राजनकर काका-काकूंनी जोडे  झिजवले आहेत.  “...वर्गणीवाले काका आले...अशीही वाक्यं ऐकून घेतली. अर्थात वर्गणीच्या बाबतीत आज काही गोष्ट वेगळी आहे अशी परिस्थिती नाही पण सुरुवातीचा ग्रुप  पक्का यात शंका नाही. महाराष्ट्र मंडळाच्या एका अध्यक्षांनी  राजनकर काकांना एकदा विचारलेसुद्धा, – “...अहो तुमची भांडणे कशी होत नाहीत ?”. पण इंदिरानगरवाल्यांनी नवा घरोबा मांडला याबद्दल वावगा शब्द त्या मोठ्या मंडळानेही कधी काढला नाही, उलट क्वचितप्रसंगी चार अनुभवाचे बोलच सांगितले हे राजनकर काका काकूआवर्जून नमूद करतात. आज मित्रमंडळाचा इतका विस्तार झाला आहे, या मागे या संस्थापक मंडळींचा हा अत्यंत unassuming स्वभाव आहे.

राजनकर कुटुंब विदर्भातल्या धामणगावचं -  मध्यम वर्गीय. पोटापाण्याचा मुख्य उद्योग – शेती. तेव्हा हायस्कूल संपल्यावर काका मुंबईला गेले. तिथे कोणीतरी एअरफोर्सचा पत्ता दिला. त्या निमित्ताने बंगलोरला आले. तिथे ट्रेनिंग घेऊन – विमान दलाच्या ग्राउंड स्टाफमध्ये रुजू झाले. मग आदमपूर, मुंबई, मग परत बंगलोर अशी ९ वर्षं ट्रेनिंग स्कूलमध्ये काढल्यावर, आता काही स्वत:चा उद्योग करावा म्हणून नागपूरला गेले. या वेळपर्यंत त्यांचं लग्न झालेलं होतं. तेव्हा व्यवसाय कुठला तर किराणा मालाचं दुकान काढलं. त्याचा जम बसायला थोडा जास्त वेळ लागला असावा पण हे आपले काम नोहेअसं वाटत असतानाच HAL मधून त्यांना मुलाखतीचं आमंत्रण आलं. एअर फोर्मधल्या ट्रेनिंगची माहिती HAL कडे होती. १९६२ पासून मग राजनकर काका flight test डिपार्टमेंटमध्ये काम करू लागले ते १९९० साली superintendent या पदावरून निवृत्त होईपर्यंत.  १९८१ पासून मग नोकरीबरोबर मित्रमंडळाचाही व्याप त्यांच्या मागे होता. 

काकांचे आनंद साधे. आपल्या नातवंडांचे फोटो अगदी कौतुकाने त्यांनी दाखवले. HAL मध्ये उत्तम कामाबद्दल मिळालेले प्रशास्तीपर किताब त्यांच्या दिवाणखान्यात आहेत. राहुल द्रविडचं; मित्राचा मुलगा म्हणून कौतुक आहे. मंडळाचं काम करताना खूप मित्रांचा सहभाग होता याची आवर्जून आठवण आहे.हे फक्त मी / आम्ही केलंअशी प्रौढी चुकूनही बोलण्यात / विचारात नाही. सध्याची पिढी आपल्यापेक्षा जास्त छान काम करते आहे याचा उल्लेख आहे. मित्रमंडळाची स्वत:ची जागा नाही याची खंत आहे. मराठी वाटतो आहे म्हणून बोलायला गेल्यावर माणूस कानडी निघाला म्हणून स्वत:ची फजिती सांगताना  स्वत:वरच हसणं आहे. मंडळाच्या सोवेनीअरचे ८३ पासून जपून ठेवलेले अंक त्यांनी थोड्या साशंकतेनेच मला दिले.  काकूंच्या मते काकांचे प्रेम पहिले मंडळावर आणि दुसरे झाडांवर (आणि आता त्यांची नातवंडांनी या जागा घेतल्याची खुषी पण आहे !). बागेत रोपं तयार करणं हा आवडीचा उद्योग. ह्या  दाम्पत्याची बरीच भांडणं ह्यात काकांनी घालवलेल्या वेळावरून झाली आहेत. हे काकूंनी स्वतःच सांगितलं, तेव्हा ते खरंच असणार यात शंका नाही. या छंदाचा एक दृश्य परिणाम म्हणजे – काही वर्षांपूर्वी, मंडळाने पाहुण्यांना फुलांऐवजी फुलझाडांची छोटी रोपे दिली होती! रोपांचे supplier अर्थातच राजनकर काका होते. 



म्हटलं तर अगदी सरळधोपट आयुष्य – पण मित्र जमवण्याची आवड, लोकांना एकत्र आणण्याची इच्छा आणि सर्वांत महत्त्वाचं समविचारी मित्र या सगळ्याचा परिपोष मित्रमंडळ चालू करण्यात, ते कार्यकर्त्यांची  पुढची फळी येईपर्यंत पेलून धरण्यात झाली. गंमत म्हणजे – राजनकर काका ऑफ़िशिअली मंडळाचे अध्यक्ष नव्हते, नसावेत८३ साली पहिल्या स्मरणिकेत त्यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे पण त्यांचाच शब्दात सांगायचं तर – अहो, पहिल्या वर्षी सगळेच अध्यक्ष होते. मी जरा जास्त काम केलं असेन, म्हणून माझं नाव आलं!”. पण त्यानंतर मात्र कित्येक वर्षं काका उपाध्यक्ष होते.  सुरू केलेच्या उपक्रमाचा विकास; स्वत: मागे राहून, इतरांना पुढे करून, पण सर्वस्वी वेगळे न होता; त्यांनी व्यवस्थित साधला हेच खरं! 

त्यांच्याशी बोलताना मी विचारलं – “मागे वळून बघताना तुमच्या नातवंडांना काय सांगाल?” – तर त्यावर म्हणतात – “आयुष्यात मी एकदम मोठा होईन असं वाटत असेल, अशी इच्छा असेल, तर ते शक्य नाही हे समजावं. पाय जमिनीवर ठेवत we need to go in moderation”. आणि खरोखरच यात राजनकर दाम्पत्याच्या स्वभावाचं प्रतिबिंब आहे. आणि म्हणूनच कसलाही गाजावाजा न करता; “मी स्थापन केलेली ही संस्था आहेअसा कसलाही अभिनिवेश न आणता – पण अत्यंत कौतुकाने – राजनकर काका, काकू मंडळाच्या कार्यक्रमांना, जमेल तेव्हा, हजर असतात. मंडळाच्या त्या त्या वेळच्या कार्यकारिणीला प्रोत्साहित करत असतात.

परवा गीतरामायणाच्या कार्यक्रमाला काका भेटले. मुलाखतीसाठी त्यांना भेटल्यावर पहिल्यांदाच.  नेहेमीप्रमाणे वाकून नमस्कार केला इतके दिवस वयाने, मानाने मोठे म्हणून नमस्कार होत असे; त्या दिवशीचा नमस्कार मात्र इतके दिवस अनोळखीअसणाऱ्या पण आता माहितीतल्याझालेल्या राजनकर काकांना होता.

अभिजित टोणगांवकर 


No comments:

Post a Comment