सदर: निसर्गाच्या सहवासात भाग ३

वनस्पती वाढीला आवश्यक असणाऱ्या माती, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्याविषयीची  माहिती आपण मागील सदरात घेतली. त्यामुळे झाडांची जोपासना करताना या तीन मुलभूत गरजांचा वापर कसा करायचा हे हि आपल्याला कळले.

बागेत, उघड्या माळरानावर, रस्त्याच्या कडेला, घराच्या कुंपणालगत झाडे लावताना डायरेक्ट जमिनीतच लावू शकतो. पण वेगवेगळ्या प्रकाराने आपण गच्चीचा, खिडकीतल्या सज्जाचा किंवा बाल्कनीचा वापर करू शकतो. गच्चीतल्या जमिनीवर माती टाकून डायरेक्ट झाडे लावण्याआधी जमिनीचे प्रूफिंग करून घेणे आवश्यक आहे. नाहीतर खाली राहणार्यांकडे लिकेजचा त्रास होऊ शकतो. नंतर प्लास्टिक शीट अंथरून त्यावर मातीचे वाफे तयार करून झाडे लावता येतील किंवा जमिनीपासून वर एक-दीड फूट अंतरावर विटांचे अथवा सिमेंटचे प्लान्टर बांधायचे. त्यात माती टाकून झाडे लावता येतील. आयरन चे पॉट होल्डर मिळतात त्यात देखिल कुंड्या ठेवता  येतील. Hanging कुंड्यानमध्ये पुदिना छान दिसतो. जमिनीवर कुंड्या ठेवायच्या तर कुंडीच्या खाली प्लास्टिक किंवा स्टीलची प्लेट ठेवू शकतो. आपल्या खिडकीतही मेथी उगवू शकते. 





आजकाल बाजारात सिमेंटच्या, पोर्सेलींनच्या, प्लास्टिकच्या कुंड्या वेगवेगळ्या आकारात, रंगात उपलब्ध असतात. त्याही वापरायला हरकत नाही. छान दिसतात. पण शक्यतो प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंड्यापेक्षा मातीच्या कुंड्या केव्हाही चांगल्या कारण माती पोरस असल्याकारणाने हवा खेळती राहते. कुंडीत तळाला खापराचा तुकडा किंवा एखादा दगड ठेवायचा कि जेणेकरून जास्तीचे पाणी वाहून जाऊ शकते पण माती नाही. प्लास्टिकचे जुने डबे, पिशव्या, tetrapack चे कार्टन्स, ज्यूटच्या पिशव्या, गोणी, पुठ्याचे किंवा लाकडी खोके, वेताच्या परड्या, बिसलेरीच्या बाटल्या अशा कितीतरी टाकाऊ गोष्टींची आपण कुंडी तयार करू शकतो. तळाला जर जाळी असेल तर तळाशी नारळाच्या शेंड्या, उसाचे चिपाड किंवा गवत भरून जाळी कव्हर करू शकतो. अशा प्रकारे आपण आपली कुंडी निवडू शकतो, अगदी अर्धा-एक लिटरची दुधाची पिशवी सुद्धा. उपलब्ध कुंडीच्या आकारमानानुसार आपण ठरवू शकतो कि कुठली झाडे लावायची. उदाहरणार्थ, पातीचा कांदा, सदाफुली, तेरडा, पालक हे लहान आकाराच्या कुंडीत लावता येणे शक्य असते. ज्या वनस्पतीची वाढ फारशी नसते किंवा ज्यांचे जीवनचक्र ३-४ महिन्यांचे असते अशा भाज्या आपण लावू शकतो. २४ तास ऑक्सिजन देणारी तुळस देखिल लावता येईल. मात्र फळझाडे लावण्यासाठी मोठ्या आकाराच्या कुंड्या वापराव्या लागतात.


Photo Credit: Sangeeta Karlekar

अशा रीतीने एकदा कुंडी ठरली कि ती आता मातीने भरायची. सुरवात करताना नर्सरीमध्ये मिळणारी माती वापरू शकतो. त्यामध्ये माती, रेती/वाळू आणि शेणखत यांचे मिश्रण असते. याला  planting material म्हणतात. साधारणतः ४५% कंपोस्ट, ४५% जमिनीवरची नेहेमीची माती आणि १०% बारीक रेती/वाळू असे प्रमाण असते. शेणखत, गांडूळखत, कोको पिट, कंपोस्ट यापैकी जे उपलब्ध असेल ते मातीबरोबर मिक्स करून गरजेनुसार planting material तयार केले जाते. एकदा आपल्याला झाडे लावायचा सराव झाला कि आपण नर्सरीतली तयार माती न वापरता घरच्या घरी तयार केलेले कंपोस्ट वापरून कुंडी तयार करू शकतो. याविषयीची माहिती पुढच्या भागात घेऊ.
Photo Credit: Sangeeta Karlekar

आता पुढची पायरी म्हणजे बियांची पेरणी करणे किंवा नर्सरीमधून रोप आणून लावणे. नर्सरीमध्ये लहान लहान रोपे पिशवीत तयार केलेली असतात. कुंडीत तळाला थोडी माती घालायची. अलगदपणे मुळाना इजा न पोहोचवता पिशवी फाडायची. रोपाला बिलगलेल्या घट्ट झालेल्या मातीसकट त्यावर रोप ठेवायचे. त्याच्या बाजूने माती टाकायची. कुंडी काठोकाठ कधीही भरायची नाही. मातीचा पृष्ठभाग व कुंडीचा पृष्ठभाग यामध्ये साधारणपणे २ cm ची जागा ठेवायची. मधेमधे हलक्या हाताने दाब द्यायचा. माती भरून झाली कि हाताने त्यावर पाणी शिम्पडायचे. कुंडी तयार. आपल्या हातानी लावलेल्या रोपाची होणारी वाढ बघताना आपला आत्मविश्वास वाढतो. एकदा आत्मविश्वास वाढला की बियांची पेरणी करून झाडे लावायला हरकत नाही. मात्र पेरण्यापुर्वी बिया रात्रभर पाण्यात भिजत घालायला विसरायचे नाही. त्यामुळे होते काय की काही बिया पाणी शोषून घेतात आणि फुगतात. अशा बिया लवकर अंकुरित होतात. ज्या बिया चांगल्या नसतात, त्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. त्या काढून टाकायच्या. काही बियांना कडक covering असते. उदाहरणार्थ, धणे, ते हाताने जरा मोडून कोमट पाण्यात भिजवावे लागतात. तरच ते उगवते. मेथी लावताना सरळ मोड काढून लावली तर पटकन उगवते. बिया पेरताना बियांची संख्या जरा जास्त घ्यायची. कारण सगळ्याच बिया अंकुरित होतील असे नाही. बिया कधीही खोलवर पेरू नयेत. कारण अंकुर मातीच्या पृष्ठभागावर येतीलच असे नाही. तसेच मातीवर बिया नुसत्याच टाकू नयेत कारण पक्षीच खाउन टाकतील त्या. तेव्हा पेरताना मातीच्या पृष्ठभागापासून आत साधारणतः २ cm खोल पेरावे. वर माती नीट पसरावी. पेरणीपूर्वी माती चेक करावी, अगदी ओलीगच्च वा कोरडीही नको. परंतु ओलसर मात्र हवी. बिया जरा पसरून पेराव्यात, म्हणजे रोपांना वाढीसाठी जागा मिळते. एकाच कुंडीत गर्दी करू नये. काही झाडं लावण्यासाठी बियांची देखिल गरज नसते. काही झाडांच्या फांद्यांची cutting लावून सुद्धा तुम्ही नवीन झाडं तयार करू शकता. उदाहरणार्थ, पुदिना, गुलाब, जास्वंद. अशी cutting लावताना काडीच्या टोकाला माती घट्ट दाबून मग ती काडी मातीत लावावी. नवीन फुट येईपर्यंत शक्यतो कुंडी सावलीत किंवा थोडा वेळ ऊन मिळेल अशा जागी ठेवावी. लिलीसाठी कंद पेरावे लागतात तर बटाट्यासाठी त्याचे डोळे. अख्खी ओली हळद पेरावी लागते. पारिजातकासाठी वेगळ्या प्रकारचे grafting करतात. ब्रम्हकमळ तर पानांपासून लागते. पाण्यातले पानकमळ तर एकापासून अनेक होतात. वनस्पतीमधली हि सृजनाची विविधता खरोखर अचंबित करणारी आहे.
Photo Credit: Sangeeta Karlekar
आपली कल्पनाशक्ती वापरून योग्य कुंडीची निवड करून, संशोधनाअंती योग्य झाडाची निवड करून निसर्ग आपण आपल्या घरीदेखिल फुलवू शकतो. एका कुण्डीपासून सुरु झालेल्या वाटचालीचा झालेला वटवृक्ष तुम्हाला अगणित आनंद देऊन जाईल याची मला खात्री आहे.

 -- रुपाली गोखले



No comments:

Post a Comment