गीत रामायण साकारताना......


मित्रमंडळाच्या वार्षिक सहलीमध्ये सहभागी होण्याचा योग बऱ्याच वर्षांनी आल्याने 'आनंदी आनंद गडे' अशी मनःस्थिती असतानाच गंधर्व कला केंद्राच्या  अर्चना बक्षी काकूंनी सुखद धक्का दिला- ‘‘अगं ह्या वर्षी गणेशोत्सवासाठी गंधर्व कला केंद्रातर्फे गीत रामायणावर नृत्यनाटिका बसवत आहे. जमेल ना तुला?'
‘‘हो काकू, शक्य तितकी मदत नक्की करेन.' मनावरील गदिमा-बाबूजींच्या मोहिनीने मी भानावर येण्याआधी उत्तर देऊनही टाकलं.

पण मग मनात विचारचक्र सुरू झालं. माझी नक्की काय मदत हवी असेल? एखादा डान्स बसवायला सांगतील की तालमी घ्यायच्या असतील? काही असो... खूप वर्षांनी पुन्हा नृत्यसेवा करायची संधी मिळतेय तर मागे फिरायचं नाही हे मनाशी पक्कं झालं. एखादं छोटं सादरीकरणही करायला मिळेल कदाचित, अशी आशाही होतीच.
या मनःस्थितीत असताना आमच्या पहिल्याच भेटीत एक सरप्राईज माझी वाट पाहत होतं. समूहनृत्य दिग्दर्शित करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होतीच, पण संपूर्ण नृत्यनाटिकेतील कथाकाराची (सूत्रधार) भूमिकाही मी करावी असं काकूंनी सुचवलं, ज्यासाठी मला साथ लाभली रश्मी, शिवांगी, कल्याणी आणि आठ बालकलाकारांची.


निस्तब्ध शांततेचा एक क्षण... खूपच मोठी जबाबदारी होती. 'कथा कहे सो कथक व्हावे' असा कथाकार हा तर कत्थक नृत्याचा आत्मा. मी जरी नृत्य विशारद असले तरी लग्नानंतर प्रापंचिक व्यवधाने, बालसंगोपन ह्या सगळ्यात नृत्यसाथ जरा सुटलीच होती. जिथे नियमित रियाज नव्हता तिथे गदिमांच्या समर्थ लेखणीला आणि बाबूजींच्या अजरामर संगीताला मी नृत्यातून न्याय देऊ शकेन? माझ्या मनात फक्त प्रश्न... पण काकूंच्या डोळ्यात मात्र ठाम विश्वास होता. सुरुवातीला फक्त काय अपेक्षित आहे हे सांगितल्यावर खरोखरच त्यांनी मला दिग्दर्शनाचंही पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्याच विश्वासाने बळ दिलं मला हे शिवधनुष्य उचलण्याचं.

आणखी एका गोष्टीसाठी त्यांना सलाम! ती म्हणजे 'पात्रनिवडीतील अचूकता'. आमचा इतका छान ग्रुप जमला होता, प्रत्येकीनेच आपापल्या व्यक्तिरेखेची देहबोली इतकी आत्मसात केली होती की राम, लक्ष्मण, सीता,  दशरथ,  कौशल्या, जटायू आदी सुजन तसेच कैकेयी,  मंथरा, शूर्पणखा, रावणादी खल व्यक्तिरेखाही समूर्त साकार होत असल्याचा भास प्रत्येक तालमीदरम्यान होई. कलाकारही ७ ते ७० अशा सर्व वयोगटातील आणि प्रचंड उत्साही. त्राटिका पहिल्यांदा अंगावर धावून आल्यावर स्वतः लक्ष्मणाने घाबरून ओरडणे अथवा खुद्द रावणालाच 'सेतू बांधारे... ' गाण्यावर नृत्य करण्याची सतत होणारी इच्छा अशा अनेक गंमतीजतींसह पाऊस, ट्रॅफिक, घरगुती अडचणी आदींवर मात करत आमच्या तालमी रंत होत्या, गीत रामायण आकारास येत होते.
परंतु अजूनही 'तरुन जो जाईल सिंधू महान... अशा सीता शोधार्थ गेलेल्या हनुमानाच्या शोधात मात्र आम्ही सर्वच होतो. ध्यानीमनी नसताना काकूंचा फोन आला, ‘‘खरंतर तुझ्यावर आधीच खूप जबाबदारी आहे म्हणून कसं विचारू असं वाटत होतं, पण हनुमानासाठी तूच योग्य वाटतेस. करशील ना?' त्या इतक्या प्रांजळपणे बोलत होत्या की मी नकार देऊच शकले नाही. गुरूचा विश्वास आणि आशीर्वाद ह्याशिवाय शिष्याला तरी वेगळं काय हवं असतं...
भूमिकेची तयारी करताना सुरुवातीला खरंच खूप दडपण होतं. समूहनृत्य असो व एकल शास्त्रीय नृत्यप्रस्तुती, दोहोंमध्ये मनाची एकतानता अत्यावश्यक असते. ती साधली की रियाजातून आकारास आलेले नृत्य खुलतं. मात्र नृत्यनाटिकेमध्ये एक विशिष्ट पात्र म्हणून नृत्य करताना त्याचे संपूर्ण स्वभावविशेष, देहबोली ह्या सर्वांचं भान ठेवावं लागतं आणि हनुमान म्हणजे तर 'बलवतां बुद्धिमतां वारिष्ठ'. तालाचा बाज सांभाळत, वीरश्रीयुक्त संगीताच्या साथीने, दमदार पदन्यासासह अपेक्षित ठेहेरावही साधणं ही ह्या भूमिकेची गरज होती. हे सादरीकरण करण्याचं सामर्थ्य तूच मला दे, अशी त्या भक्तश्रेष्ठालाच प्रार्थना करून व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा माझ्या अल्पमतीने प्रयत्न केला.

ग. दि. मा. ची प्रसंगोचित, उत्कट भावाविष्कार पेश करणारी शब्दरचना आणि त्याला साजेसं बाबूजींचं संगीत यामुळेच हा प्रयत्न अधिक सुकर झाला. शब्द-लय-ताल या गीत-रामायणाच्या त्रिवेणीचे सामर्थ्य असे कि केवळ श्रवणानेही प्रसंग डोळ्यासमोर साकार होतात, लयीवर आपण डोलू लागतो आणि पाय आपोआप ठेक्यात पडू लागतात. गरज असते ती फक्त तना-मनाच्या तद्रुपतेची!

अखेर २५ ऑगस्ट १७ चा अविस्मरणीय दिवस उजाडला. श्रीमती पूर्णिमा पांडेजी (कत्थक गुरू, लखन घराणा),  श्री. आनंद शिरूरजी, श्रीमती विभा रामस्वामीजी अश्या दिग्गजांच्या उपस्थितीत सादरीकरणाचा दुग्धशर्करा योग छान जमून आला. अर्चना काकूंचे अथक परिश्रम, आमचे रंगभूषाकार, नेपथ्य सांभाळणारी स्वप्ना ताई, ध्वनिसंयोजक,  छायाचित्रकार, आपल्या स्पेशल इफेक्ट्स नी सादरीकरणाची रंगत वाढवणारे प्रकाशयोजनाकार, इंग्रजी सबटायटल्सच्या माध्यमातून गीत रामायण अमराठी लोकांपर्यंत पोहोचवण्याची किमया साधणारी लावीन ताई, सर्व साहकलाकार आणि घरच्यांचीहीउत्तम साथ मिळाल्याने नृत्यनाटिकेचं प्रथम सादरीकरण यशस्वी झालं. ह्या शुभप्रसंगी ज्येष्ठ कत्थक गुरू आदरणीय पूर्णिमादीदींचे आशीर्वाद लाभल्याने ही नृत्यसेवा अखंडित ठेवण्याचं बळही मिळालं. घरी आल्यावर सासूबाईंनी मीठमोहोऱ्यांनी दृष्ट काढली तेव्हा साऱ्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटलं. 


रंगमंच सादरीकरणाचा आत्मविश्वास, मानसिक कणखरता, नव्या मैत्रिणी हे सारं आमचं ह्या प्रवासातील संचित आहेच, परंतु न कंटाळता नियमित तालमींना हजर राहून, गाण्यांसह डान्स स्टेप्सही पाठ करणाऱ्या माझ्या चार वर्षांच्या मुलीवर नकळत झालेला 'रामायणाचा गीत-नृत्य संस्कार' हा माझा या प्रवासातील अनमोल ठेवा!


सौ. मानसी फडके

No comments:

Post a Comment