ठेविले अनंते तैसेचि रहावे

परवा नेहेमीप्रमाणे मोबाईलची रिंग वाजली आणि एका मैत्रिणीचा तिकडून आवाज आला. माझे सदगुरू येणार आहेत. त्यांच्या भेटीला येणार आहेस का? जावे की नाही कळत नव्हते, तरीसुद्धा माझी पावले मला तिकडे घेऊन गेली. त्यांचे  चार शब्द ऐकून वाटले, तेथे गेले नसते तर जीवनात खूप काही गमावले असते. मला मिळालेला लाभ सर्वांना मिळावा म्हणून त्यांचे शब्द पानावर कोरले. त्याचे थोडेसे सार इथे नमूद करत आहे. सदगुरू महिमासुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी काही सूत्रे ह्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. आपल्या सगळ्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा करते. 

सद्गुरूबद्दल बोलताना ते म्हणाले, सद्गुरू मनाला निर्मळ करतो. आपले विचार बदलवतो. ज्या वेळी आपल्याला सद्गुरू लाभतो त्या वेळेपासून आपण मनुष्य म्हणुन जीवन जगतो. अन्यथा पशू व मनुष्य ह्यात काहीही फरक नाही. सद्गुरू हा जगातील सर्वात दुर्मीळ हिरा आहे आणि तो फार भाग्याने लाभतो. बाळ ज्या वेळी आईच्या पोटात असते त्या वेळी ते ईश्वरसमान असते. परंतु बाहेर आल्यावर ते ईश्वराला विसरून जाते. ईश्वर त्याला सांगतो, मी तुला ह्या संसारात पाठवत आहे. तुला जसा पाठवतो आहे तसाच माझ्याकडे परत ये. तू जर तसा आलास तर तुला मी अलिंगन देईल.

यात्रेत मूल आपल्या वडिलांचा हात धरून जातं आणि गर्दीत त्याचा हात वडिलांच्या हातातून सुटून जातो. पण त्याला मिठाई, खेळण्यांची दुकाने, डोंबाऱ्याचा खेळ इत्यादी बघण्यात मजा येते. थोड्या वेळाने ज्या वेळी ते मूल भानावर येते त्या वेळी त्याला जाणीव होते कि त्याची आणि वडिलांची ताटातूट झालेली आहे. तेव्हा ते मूल रडू लागते. मग त्याच्या समोर दिसणारी तीच दुकाने त्याला आकर्षित करू शकत नाही. तशीच आपलीसुद्धा ईश्वरापासून ताटातूट झालेली आहे. फक्त एक सद्गुरूच आपली ईश्वराशी भेट घालून देऊ शकतो.

वाघाच्या बाळामध्ये ज्या प्रमाणे वाघाचे गुणधर्म असतात, त्याचप्रमाणे आपणही ईश्वराची मुले आहोत. आपणही ईश्वररूप होऊ शकतो, नव्हे नव्हे, त्यासाठीच मनुष्य जन्म मिळतो. म्हणूनच समर्थ रामदास म्हणून गेले "नरदेह मोठे घबाड". ज्या ज्या ठिकाणी संतांचे बोल ऐकायला मिळतात त्या ठिकाणी जरूर जावे. कारण सत्संग हा झाडूप्रमाणे कार्य करतो; आपल्या मनावरचा मळ साफ करण्याचे काम करतो.

सर्व चिंता सदगुरूला अर्पण करा. मग निश्चिन्त रहा. सद्गुरूवर सर्व भार टाकला की त्याला तारणे भाग पडते. ज्या वेळी तुम्ही सर्व चिंता गुरूला अर्पण करता त्याच वेळी तुमच्या अंतःकरणात गुरूप्रती अत्यंत दृढ भाव निर्माण होतो कि गुरूनी सांगितले आहे चिंता करायची नाही सर्व चांगलेच होणार आहे. तो दृढभावच पैलपार करुन देतो. चिंताविरहित जीवन जगण्याचा अभ्यास करा. त्याप्रमाणे प्रयत्न करा. चिंता चितेसमान आहे. वाळवी सारखी देहाला आणि मनाला खाते.

दुसरे म्हणजे कोणतीही इच्छा न करणे. ज्या वेळी आपला जन्म होतो त्याच वेळी आपले भाग्य बनलेले असते. जे जे घडायचे असते ते ते सर्व घडणार असते. मग चिंता का करायची? ज्या वेळी आपण एखादी इच्छा करतो  म्हणजेच  ईश्वर आपल्याला जे काही देऊ इच्छितो त्याव्यतिरिक्त आपल्याला दुसरेच काहीतरी हवे असते. देवाकडे काही मागणे म्हणजे कळत नकळत आपण त्याला जाणीव करून देत असतो की देवा मला काय हवे आहे हे तुला कळतच नाही त्यामुळे आता मी मागतो आहे ते तू मला दे, तरच मी सुखी होऊ शकेन. देव आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी पुरवू शकत नाही असे काहीच नाही. कारण ज्याने ब्रह्माण्ड निर्माण केले त्याच्याकडे काय कमी आहे? पण आपल्या बँकखात्यात पैसे नसतील तर पैसे काढू शकत नाही हा साधा व्यवहाराचा नियम आपल्याला माहीत असतानादेखील देवाने जादूगार बनावे असे आपल्याला वाटते.

आपले  भाग्य कर्मकांड करून बदलता येते. ते शक्य आहे. पण असे कदापि करु नये. Because it comes with heavy punishment. आपण मनात कोणतीही इच्छा केली की ते आपले कर्म बनते. कर्म बनले कि त्याची शिक्षा भोगावी लागते. अनंत जन्मांच्या आपल्या एक एक इच्छा रांगेत पूर्ण होत जातात आणि त्या त्या प्रत्येक इच्छेचे एक एक कर्माचे फळ भोगावे लागते. म्हणून देव आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवतो त्याच परिस्थितीत आनंदात रहावे. दररोज देवासमोर हात जोडून एक प्रार्थना म्हणा- 

"Thank you GOD for keeping me in a position that I am having now, because situation could be worse than this, he is taking care of us in a best possible way"

एवढी एकच गोष्ट मनुष्य समजू शकला तर त्याला जीवनात सुख, समाधान आणि शांतीचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवल्यावाचून राहत नाही.

ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान

-- धनश्री कुलकर्णी


No comments:

Post a Comment