शंकर-जयकिशन आणि भारतीय चित्रपट संगीत


शंकर-जयकिशन –  संगीत क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. जरी शंकर आणि जयकिशन ह्या दोन वेगळ्या व्यक्ती असल्या, तरी त्यांच्यातील संगीत मात्र एक होते. शंकर यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९२९ रोजी हैद्राबाद येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव शंकरसिंग रामसिंग रघुवंशी. लहानपणापासून त्यांचा संगीताकडे ओढा होता. त्यांनी तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण बाबा नसीर खानसाहेब यांच्याकडे घेतले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईतील पृथ्वी थिएटरमधून केली. तिथेच त्यांची ओळख जयकिशन यांच्याशी झाली. पुढे ते दोघे राजकपूर यांच्याकडे, संगीतकार राम गांगुली यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. तिथे काम करता करता एका प्रसंगामुळे शंकर जयकिशन यांना स्वतंत्रपणे सन १९४९ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटाचे संगीत देण्याची संधी मिळाली आणि त्या दोघांनी त्या संधीचे अक्षरशः सोने केले. त्यानंतर त्यांनी सन १९७१ पर्यंत मागे वळून पाहिलेच नाही.

जयकिशन यांचा जन्म दिनांक ४ नोव्हेंबर १९२९ रोजी गुजरातमधील वन्सडा या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव जयकिशन डाह्याभाई पांचाळ असे होते. ते हार्मोनियम अतिशय सुरेख वाजवत असत. अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व व दिलदार स्वभाव ह्यामुळे ते चित्रपटसृष्टीत अतिशय ख्यातनाम होते. उलट शंकर हे थोडेसे रागीट होते, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना लोक जरा घाबरून बोलत असत. परंतु त्या दोघांची नाळ एकमेकांशी अशी काही जुळली होती की बस! शंकर हे जयकिशन यांना मुलाप्रमाणे वागवत असत. जयकिशन यांच्या पत्नी पल्लवी ह्यांच्या घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण शंकर यांनी त्यांचे कन्यादान केले. शंकरसुद्धा अतिशय मोठ्या मनाचे होते. आम्ही मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये शंकर-जयकिशन रजनीसाठी गेलो असता तिथे एक चित्रपट निर्माते आले होते. त्यांनी शंकर यांच्या मनाच्या मोठेपणाची एक गोष्ट सांगितली. हे निर्माते एक दिवस शंकर यांच्याकडे आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी शंकर-जयकिशन यांनी संगीत द्यावे यासाठी विचारणा करण्यासाठी गेले होते. त्या वेळी शंकर जयकिशन ही जोडी सर्वात जास्त मानधन घेणारी होती. शंकर यांनी त्या चित्रपट निर्मात्याला सांगितले की आम्ही चित्रपटाला संगीत देण्यासाठी पाच लाख रुपये मानधन घेतो. त्यावर त्या चित्रपट निर्मात्याने तेवढे मानधन देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्या वेळेस त्यांनी शंकर यांना विचारले की तुमच्याकडे या नंबरची एक गाडी होती का? शंकर यांनी आठवून या नंबरची गाडी असल्याचे सांगितले. त्यावर चित्रपट निर्मात्याने सांगितले की साहेब तुम्ही मला ओळखले नाही, कारण माझ्या सुरुवातीच्या काळात मी तुमची ती गाडी पुसत होतो. हे ऐकल्यावर शंकर त्यांना म्हणाले, “जेबसे एक रुपिया निकालो और मेरे को दे दो, हम आपके चित्रपट को संगीत देनेको तय्यार हैं|” फक्त एक रुपया घेऊन त्यांनी त्या चित्रपटाला संगीत दिले.


भारतीय जनमानसावर १९६० पर्यंत भारतीय रागदारी, भारतीय लोकसंगीत व नाट्यसंगीताचा प्रचंड पगडा होता. या काळापर्यंत, आपल्या स्वतंत्र शैलीने भारतीय शास्त्रीय संगीतात ज्या प्रमाणे अनेक घराणी स्थापित झाली त्यात आग्रा, किराणा, भेंडीबाजार, ग्वाल्हेर ही अग्रगण्य होती आणि अगदी त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत १९५० च्या दशकात एक प्रचंड घराणे आपल्या अलौकिक शैलीने प्रस्थापित झाले आणि ते म्हणजे  ‘शंकर जयकिशन’. १९४० ते १९७० हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीतला गाण्यांचा सुवर्ण काळ समजला जातो. हा काळ होता तो दिग्गज संगीतकार मदन मोहन, एस.डी. बर्मन, सी.रामचंद्र, सलील चौधरी, ओ.पी. नय्यर, रोशन, नौशाद यांचा. शंकर- जयकिशन या घराण्याने जवळ जवळ पंचवीस वर्षे आपली सत्ता या सुवर्णकाळावर गाजवली व आजतागायत त्यांच्या शैलीचा वापर करण्याचा मोह त्यांच्या पश्चात आलेल्या संगीतकारांना आवरता येत नाही. महाराष्ट्रात तर सन १९२५ ते १९६० या काळा समाजमनावर रागदारी व नाट्यसंगीताचा प्रचंड पगडा होता. तरी पण या संगीतकार जोडीने त्या समाजमनावर कुठलाही आक्रमक हल्ला न करता त्याच भारतीय संगीताचा सुरेख वापर आपल्या संगीतात करून जनमानसाला नुसतेच स्वतःकडे आकृष्ट केले नाही, तर मोहित केले.
राग दरबारी कानडा, शिवरंजनी, पिलू, शंकरा, बागेश्री हे शंकर साहेबांचे आवडते राग होते, तर राग तिलंग, शुद्ध कल्याण, यमन, शिवरंजनी, देस, या रागांचा जयकिशन यांच्यावर जास्त पगडा होता. भैरवी या द्वयींची अगदी दासी होती अस म्हटले तर वावगे ठरू नये. मुळातच राग भैरवी हा विलक्षण राग आहे, ज्यातील कोमल स्वरांना मानवी मनातील सात्विक भावनांना हात घालण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. मग या रागाचा उपयोग करून शंकर साहेबांनी ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’, ‘किसीने अपना बनके मुझको मुस्कुराना सिखा दिया’ अशी अनेक गाणी रचली. शंकर साहेबांनी भैरवी रागाचा अल्प प्रमाणात वापर करून शैलेंद्र यांचे ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’हे मस्त गाणे बनवून शम्मी कपूरचा रांगडा अभिनय रसिकांच्या मनात पक्का रुजवला. ज्याचा गंभीर असा स्थायी भाव आहे त्याच भैरवीच्या सुरातून शम्मी कपूर नावाचा ब्रँड तयार करणे हे फक्त शंकर-जयकिशनच करू शकतात. मराठी माणसाच्या मनात ‘तो मी नव्हेच’ म्हणजे प्रभाकर पणशीकर हे समीकरण जसे पक्के बसले आहे, त्याचप्रमाणे सगळ्या भारतीयांच्या मनात ‘मेरा जुता है जपानी’म्हणजे राज कपूर समीकरण पक्के बसविले ते शंकर साहेबांनी शैलेन्द्रच्या ‘मेरा जूता है जपानी’ या गीताला भैरवी रागात बसवून ‘तू ही गया मुझे भूल रे’ आणि ‘मनभावन के घर जाये गोरी घुंघटमें शर्माये गोरी’ ही अनुक्रमे ‘कठपुतली’ व ‘चोरी चोरी’ या चित्रपटातील गाणी म्हणजे शंकर साहेबांनी वेगवेगळ्या ढंगाने भैरवी रागात बनविलेल्या लाजबाब रचना होत. ‘बादल’ या चित्रपटात ‘उनसे प्यार हो गया’ या गाण्याच्या चालीची सुरुवात होते ती तार सप्तकात व शेवटी उतरत उतरत क्षणभर धावते ती मन्द्र सप्तकात. या गाण्यांचा उल्लेख करण्याचा हेतू असा की, ही सर्व गाणी भैरवी या रागात रचली हे सांगणे नसून, या रागाचा उपयोग अनेक तऱ्हेचे भाव व्यक्त करण्यास कसा केला सांगावयाचे आहे. राग दरबारी कानडा हा शंकर साहेबांचा आवडता राग असल्याने ‘हम तुमसे मुहब्बत करके सनम रोते भी रहे हसते भी रहे’, या आवारा चित्रपटातील गाण्यानंतर त्यांनी निराश भावना व्यक्त करणारे शैलेंद्र यांचे ‘मुझे तुमसे कुछ भी न चाहिए’ हे ‘कन्हैय्या’ चित्रपटातील गीत दरबारी कानडा या रागात बनवून रसिकांना भारावून ठेवले. चाल एका विशिष्ट रागात बनवून त्यात मध्येच दुसऱ्या रागातील स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे त्यांचे कौशल्य होते. याचे एक उदाहरण म्हणजे ‘राधिके तूने बन्सरी चुराई’ (चित्रपट बेटी बेटे) या दरबारी रागात बनविलेल्या गाण्यातली ‘कहाँ छुपाई पर न बताये’ ही एक ओळ राग पटदीप मधील आहे. ‘बसंत बहार’ या चित्रपटातील सर्व गाणी रागदारी संगीतावर आधारीत आहेत, जी शंकर साहेबांचे रागदारी व नृत्य संगीतावर किती मोठे प्रभुत्व होते हे दर्शवितात. त्यातील ‘भय भंजना वंदना सुन हमारी’ या भजनाच्या चालीसाठी वापरलेला राग मिया मल्हार च्या वाटेला फारच थोडे संगीतकार गेले आहेत. कारण या रागाची ठेवणच अतिशय अवघड असून त्यात लोकांच्या गळी उतरेल अशी सोपी चाल बांधणे अत्यंत कठीण असते, त्यात शंकर साहेब त्यात कमालीचे यशस्वी झालेले आहेत.
आपल्या चालीतून एखादा नट आपल्या नजरेपुढे आणणे किंवा त्या नटासाठी अशा चाली बनविणे की ज्यात त्याचे प्रतिबिंब, दिसेल हे फारच कौशल्याचे काम आहे. पण ही किमया शंकर साहेबांनी साधली ती मेह्मूदसाठी ‘हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं’ या गाण्याद्वारे. त्या आधी अनेक संगीतकारांनी मेह्मूदसाठी अनेक गाणी बनविली, पण त्यात मेह्मूदच्या अभिनायातला अंगविक्षेप व थयथयाट उतरला नाही. पण तो उतरवला शंकर साहेबांनी या गाण्यात. नुसतेच ‘हम काले हैं तो क्या...’ असे न सांगता ‘हम’ या शब्दाचा उच्चार ‘हम काले’ असे वेडेवाकडे म्हणून व त्यात थयथयाटी नृत्याचे तुकडे मिसळून मेह्मूद उभा केलाय. असा आपल्या संगीतातून नट नजरेसमोर आणण्याचे कसब या संगीतावर द्वयीत होते.
शैलेंन्द्र यांच्या काव्यप्रतिभेचा व शंकर साहेबांच्या संगीत प्रतिभेच्या एकत्र आविष्काराचा इथे उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे आशिक या चित्रपटातील ‘झनन झन झनाके अपनी पायल’ या गाण्याचा. नृत्यांगना स्वतःच्या ताकदीचे वर्णन करताना आपली तुलना श्रावणातील सुसाट वाहणाऱ्या नदीशी करत म्हणते की, ‘छम छम अपनी डगर चलूंगी कोई रोके तो मैं न रुकूंगी, मैं सावन की चंचल नदिया बंधके रही ना बंध के रहूंगी’ या गीतात जोश व वीर रसाची जी भावना आहे तिला शैलेन्द्र यांनी श्रावणातील वाहत्या नदीची सुंदर उपमा देऊन शब्दबद्ध केली आहे. आणि शंकर साहेबांनी तो भाव तितक्याच प्रभावीपणे, राग शंकरा, ज्यात वीर रसाची भावना उफाळून येते, तो वापरुन परिणामकारक स्वरबद्ध केलाय.
आता बोलू या जयकिशन साहेबांबद्दल. त्यांच्या सुंदर रूपासारखीच त्यांची गाणीपण सुंदर होती. जयकिशन यांच्या चाली देस, शुद्धकल्याण, तिलंग, भैरवी, यमन या रागात स्वरबद्ध केलेल्या आढळतात आणि त्यांचा तोंडावळा दरवेळी काही नवीनच पद्धतीचा असायचा. ये शाम की तनहाइयाँ, रसिक बलमा, मेरी मुहब्बत जवाँ रहेगी आणि फलसफा प्यार का तुम क्या जानो या गाण्यांच्या चालीत राग शुद्ध कल्याणचा वापर अनेक तऱ्हेने केला आहे हे लक्षात येते. असाच कित्ता त्यांनी देश रागासाठी गिरवीला तो ‘चली कौनसे देश गुजरिया तू सजधजके’ (बूट पॉलिश) ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे’ (दिल एक मंदिर), ‘अजी रूठकर कहाँ जाइएगा’ (आरजू) या गाण्यासाठी ही जुनी गाणी आजपण रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. ‘जाने कहाँ गये वो दिन’ आणि ‘आवाज देके हमे तुम बुलाओ’ ही अनुक्रमे ‘मेरा नाम जोकर’ व ‘प्रोफेसर’ चित्रपटातील शिवरंजनी रागावर आधारित असलेली गाणी कोण विसरू शकेल? हसरत जयपुरी आणि जयकिशन यांचे मेतकूट अतिशय चांगले जमले होते.
मध्यंतरी संगीत जगात फ्युजन संगीत नावाची लाट येईल की काय असे वाटले होते व तसे प्रयोग पण देशीविदेशी वादकांनी करून बघितले पण ते फारसे लोकांना आवडले नसावेत. थोडक्यात या प्रकारात भारतीय रागदारी रचना देशी व पाश्चात्त्य वाद्यांवर ठरावीक तालावर वाजवल्या जातात. ज्याचा परिणाम मिश्र स्वरूपाचा होतो. लेखकाला असे वाटते की या फ्युजन संगीतामुळे फार मोठा कन्फ्युजन झाला. सबब हा प्रकार लोकप्रिय झाला नाही. खरे तर हा प्रयोग जयकिशन साहेबांनी ‘मै नशेमें हूं’ या चित्रपटात
‘सजन संग काहे नेहा लगाय’ या राग तिलंगवर आधारित गाण्याद्वारे १९५९६० मध्ये केला होता. नंतर असाच प्रयोग ‘जब इश्क कहीं हो जाता है’ या ‘आरजू’ चित्रपटातील दरबारी कानडा रागावर आधारित कव्वालीद्वारे १९६६ च्या सुमारास केले होते आणि परत एकदा ‘तुम हंसी मै जवाँ’ हे शीर्षकगीत तिलंग रागात बनवून १९६९७० च्या सुमारास ‘तुम हंसी मै जवाँ’ या चित्रपटात केला होता. सांगावेसे एवढेच वाटते की, फ्युजन संगीत फारसे गाजले नाही, पण जयसाहेबांच्या वरील रचना लोकांना आवडल्या कारण यात भारतीय सतार, तबला व पाश्चात्त्य वाद्ये, जशी बॉंन्ड, बोंगो, कोंगो याचा केलेला कल्पक मिलाफ फारच वेगळा आणि श्रवणीय होता. ‘इंडियन रागाज ऑन जाझ स्टाईल’ नावाची एक ध्वनिमुद्रिका त्यांनी १९६६६७ च्या सुमारास काढली. या ध्वनिमुद्रिकेला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांचे पाश्चात्त्य शैलीत सादरीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न फारच स्तुत्य होता.
जयकिशन साहेबांची एक खासियत होती. गाण्यातल्या दोन कडव्यांना जोडण्यासाठी वेगवेगळे वाद्य संगीताचे जोड तुकडे असतात त्याला इंग्रजीत इंटरल्युड म्युझिक पीसेस असे म्हणतात. पण ‘अजीब दस्तां ये’ या ‘दिल अपना और प्रीत पराई’ मधील गाण्यात तीन वेगवेगळे जोड तुकडे वापरले आहेत. अशी खासियत  करणारे हिंदी सिनेमासृष्टीत जयकिशन हे एकमेव संगीतकार आहेत. अनेक प्रकारच्या वाद्यांचा उपयोग करून आपल्या वाद्यवृंदाची अनोखी ओळख राखून असणारे ते एकमेव संगीतकार होते. याच चित्रपटातील ‘अंदाज मेरा मस्ताना’ हे गाणं पण रसिकांनी ऐकावे, म्हणजे अनेक वाद्यांचा योग्य तो मेळ घालून गाणे किती रंजक होते याची प्रचिती येईल.
जयकिशन साहेबांनी ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ हे ‘प्रिन्स’ चित्रपटातील गाणे राग मालकंसाचा वापर करून केले हे चटकन लक्षात येत नाही. तसेच या जोडीचे ‘मुझको यारों माफ़ करना मैं नशेमें हूँ’ हे गाणे पूर्णपणे भैरवी रागात आहे समजल्यावर जयसाहेबांच्या चाली लावण्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच असे वाटते.
शंकरजयकिशन यांच्या संगीताने नटलेला व अतिशय सुरेख कथा असलेला ‘आम्रपाली’ हा चित्रपट सुमारे ५० वर्षांपूर्वी पार कोसळला; पण  या संगीतकारांचा ‘शंकरजयकिशन नाईट’ हा त्या काळी लोकप्रिय असलेला कार्यक्रम सदर चित्रपटाच्या मध्यंतरात दाखवून हा चित्रपट व्यापारी दृष्टीने सावरला. कुठलाही चित्रपट आपल्या ‘नाईट’ने कोसळण्यापासून रोखण्याचे सामर्थ्य आजपर्यंत कोणत्याही संगीतकारात नाही व नजीकच्या काळात असेल असे वाटत नाही. सकस चाली, भव्य वाद्यवृंद व त्यांचा परिणामकारक गाण्याशी आणि काव्याशी सुरेख ताळमेळ घालून शंकरजयकिशन हे यशाच्या ज्या शिखरावर जाऊन पोहोचले त्या शिखरावर नवीन संगीतकारांची नजरदेखील जाऊ शकणार नाही. तर ते शिखर गाठणे तर दूरच व अशक्य कोटीतीलच. आजपर्यंत अनेक संगीतकारांच्या जोड्या आल्या व गेल्या, पण सर्वांत ज्येष्ठ आणि बेस्ट संगीतकार म्हणजे शंकरजयकिशन.
शंकर जयकिशन यांच्यावर विस्ताराने लिहिण्यासारखे बरेच असे काही आहे पण जागे अभावी ते जमणे शक्य नाही. चित्रपट संगीतातले वाद्यवृंदाच्या स्वरुपात त्यांनी अमुलाग्र बदल केले. जुनी ताल वाद्ये, उदा. माठ, घटम यांना मोडीत टाकले व त्याजागी तबला, ढोलकी, कोंगो, बोंगो वापरात आणली. क्लेरेनेट, तुतारी बैन्ड यांचा वापर कमी करून व्हायोलिन, हवाई गिटार, क्ले व्हायोलिन यांचा वापर सुरु केला. पाश्चात्य ते भारतीय रागदारी, ग्राम्य संगीत ते कव्वाली अशा सर्व तऱ्हेच्या संगीताचा समावेश त्यांनी आपल्या गाण्यात करून हिंदी चित्रपटातील गाण्यांचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला.
सन १९७१ मध्ये जयकिशन यांच्या अकाली निधनामुळे, शंकर एकाकी पडले. त्यांच्या संगीतातील जादू कमी होऊ लागली. निर्मात्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. परिणामी त्यांचे चित्रपटसृष्टीतील संगीत कमी होऊ लागले.
शंकर जयकिशन यांना त्यांच्या कारकिर्दीत ९ वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाली.
आजच्या नवीन पिढीला क्रिकेट क्षेत्रातील फलंदाजाने पूर्ण केलेल्या शतकांची आणि नवीन विक्रमांची नोंद करून ठेवण्याची आवड आहे. त्या नवीन पिढीला असे सांगावेसे वाटते की, दोन गोष्टींची आजच नोंद करुन ठेवा ज्यातील पहिली गोष्ट अशी कि क्रिकेट प्रमाणे हिंदी चित्रपट संगीत हे असेच एक आव्हानात्मक क्षेत्र आहे जिथे प्रथम शतक पूर्ण करण्याचे मानकरी ठरले आहेत ते शंकर जयकिशन आणि दुसरी गोष्ट अशी की हा विक्रम मोडण्यास अजून एक मोठा काळ जावा लागेल व तो असेल एका शतकाचा.
 -    श्रीहरी कुलकर्णी

No comments:

Post a Comment