तंद्री...


कलावंत स्वत:च्याच एका तंद्रीत जगत असतो... सृजनतंद्री. तेच त्याला भावतं आणि मानवतं... कारण कलावंत असणं हे काही छंदापुरतं मर्यादित नसतं, तर त्याच्यासाठी तीच लाईफस्टाईल असते; असं मला वाटतं. आवड म्हणून किंवा फावल्या वेळचा छंद म्हणून एखाद्या कलेशी आपली ओळख असणं वेगळं आणि त्या कलेचा ध्यास हाच श्वास होऊन रहाणं वेगळं. म्हणूनच की काय, कलावंतांची आणि इतर माणसांची जगतानाची गणितं बदलतात.

संगीतापुरतं बोलायचं तर रसिकांच्या, श्रोत्यांच्या काही अपेक्षा असतात. संगीत मनोरंजक हवं, चालू ट्रेंडमधलं हवं, अहो... कोणालाही सहज गुणगुणता आलं पाहिजे हं!... ते तुमचं रागदारी वगैरे नको बुवा... काय ते तुमचं नियमांचं जोखड... अवघडच की सगळं. आणि शब्द... तो एक वेगळाच मुद्दा बरं का. आशयघन कविता फार जड असतात, फार cerebral काम असलं कि विकायला त्रास होतो... हलकंफुलकं आजच्या भाषेतलं काही नाही का?
आता बघा... कविता जुनी की नवी हे कंटेंटवरून ठरवावं की भाषेवरून? अर्थात दोन्हीवरून! पण जुन्या मराठीतल्या अनेक कवितांचा कंटेंट आजही ताज्या, नव्या विचारांशी नातं सांगणारा आणि आजच्या भाषेतल्या अनेक कवितांचा कंटेंट अगदीच घिसापिटा, चावून चोथा झालेला असू शकतो.

हे सगळं असणारच... सगळे मुद्दे आपापल्या जागी ठीकच आहेत. प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या मतांच्या, मागण्यांच्या आणि अपेक्षांच्या गदारोळात, कलाकार म्हणून, सृजनाबद्दच्या आपल्या स्वत:च्या जाणिवा सुस्पष्ट आहेत का? व्यक्त होण्यासाठीचे त्याचे स्वत:चे असे काही मार्ग त्याला सापडले आहेत का? कोणत्याही कालाक्षेत्रात, अतिशय मनस्वीपणे काम करणारे, जे अवलिये होऊन गेले, त्यांनी काय विकलं जाईल किंवा काय चालेल, याचा विचार न करता स्वत:च्या अंत:प्रेरणेशी ठाम राहूनच आपली वाटचाल केली आहे. पण असं करण्याचं भाग्य फार थोड्या कलाकारांना, विशेषत: संगीतकारांना मिळतं. भाग्य अशासाठी की स्वतंत्र विचार करणारे संगीतकार किंवा गायक नाहीत असं नाही. पण इंडस्ट्रीसाठी काम करताना मनोरंजनात्मक मूल्यं आणि मागणी तसा पुरवठा अशा प्रकारची आव्हानं त्यांना स्वीकारावीच लागतात... प्रसंगी तडजोड करूनही स्पर्धेत आपलं स्थान टिकवावंच लागतं.

याउलट एखादा कलाकार असाही असतो की जो निखळपणे निर्मिती करत असतो तेव्हा त्याच्या मनात रसिकांचा विचारच नसतो... त्याला जाणवलेलं, भावलेलं, समजलेलं जे असतं ते त्याला व्यक्त करायचं असतं. ही निर्मिती होत असताना आपल्याला वाटणारा विस्मय, आनंद एखाद्या जरी रसिकापर्यंत आपल्या अनुवासकट पोहोचला तर सगळ्याचं चीज झाल्यासारखं त्याला वाटतं. पण या अनाम रसिकाचा शोध सुरु होतो तो मात्र स्वत:च्या सृजनाच्या तंद्रीतून बाहेर आल्यानंतर... आणि कधी ना कधी तो त्याला सापडतोही. जसं बहुभूतीने म्हणून ठेवलं आहे-

उत्पस्यतेSस्ति मम कोSपी समानधर्मा
कालो ह्ययं निरवधीर्विपुलाच पृथ्वी!

माझा समानधर्मा कधीतरी कुठेतरी जन्माला येईलच...
काळ अनंत आहे आणि पृथ्वी आफाट आहे...

याच भावनेतून मीही माझं संगीत आणि आवाज पोहोचवते आहे त्या अनाम समानधर्मी रसिकापर्यंत...

खालच्या लिंकवरचं गीत हे पूजा भडांगे हिची कविता आहे आणि माझं संगीत आहे. जरूर ऐका आणि अभिप्राय कळवा.


धन्यवाद!
प्रवरा संदीप



5 comments: