पावसाची रिपरिप - आरूशी दाते


पावसाची रिपरिप, 
तप्त धरणीचा वेध घेत होती, 
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबातुन, 
धरणीला शांत करत होती... 

त्या ओल्याचिंब धरणीला, 
नवजीवनाचं दान देत होती, 
तीपण नवचैतन्याच्या सोबतीने, 
उत्साहाने अंकुरली होती... 

ह्या अंकुरांची नवी नवलाई, 
गगनाकडे झेप घेणारी, 
त्याच्याच छताखाली, 
आपले अस्तित्व जागवणारी... 

सगळ्याचा मेळ जेव्हा 
जमतो खरंच छान, 
तेव्हा समाधान पसरवतं, 
अंकुरणारं प्रत्येक पान... 

ह्या वरुण राजाची, 
हीच ती जादुई स्वारी, 
नकळत येणारी आणि 
निसर्ग सृष्टीला फुलवणारी... 

ह्यातूनच सुखसमाधानाची 
आपसूकच निघे वारी, 
प्रत्येक प्राणिमात्राला, 
धन्य धन्य करणारी... 
--------------------------

आरूशी दाते


No comments:

Post a Comment