संस्कारमाला- भाग ३


आज सुर्यावलोकन आणि निष्क्रमण ह्या संस्कारांबद्दल विचार चालू असताना मन आजोळ्च्या घराकडे धावले, अगदी बहिणाई च्या कवितेतल्या पाखरा सारखं. आजोळचा चौसोपी वाडा, शेणाने सारविलेली जमीन, पाण्याचे २ आड, सरपणाची रास, दुभत्याचे कपाट सगळं क्षणार्धात डोळ्यासमोर आले. त्याच बरोबर डोळ्यासमोर आली ती अंधारी खोली आणि त्यात दरवळणारा वेखंडाचा वास. ही अंधारी खोली म्हणजे बाळंतिणीची खोली. माजघर आणि स्वयंपाकघर ह्याच्या मधली. तिला एकच खिडकी ती सुद्धा माजघरात उघडणारी! ह्या खोलीत एक वेगळीच ऊब जाणवायची, कदाचित मातृत्वाची असेल. सव्वा महिना बाळ बाळंतिणीचा मुक्काम ह्या खोलीत असायचा. घरी येणाऱ्या पै पाहुण्यामुळे बाळाला infection होऊ नये ह्याची खबरदारी. जन्मानंतर सव्वा महिन्याने बाळाला खोलीबाहेर आणले जायचे.

चांगला दिवस बघून देवळात नेले जायचेही कृती पूर्वजांनी सूर्यावलोकन व निष्क्रमण ह्या संस्कारात गुंफली आहेबालसंगोपन शास्त्रानुसार दुसऱ्या महिन्यात बाळाची नजर स्थिर होते आणि ते वेगवेगळ्या गोष्टींचे निरिक्षण करायला लागतेआवाजाच्या दिशेने प्रतिसाद देतेवरील संस्कारांमध्ये बाळाला सूर्य, चंद्रआजुबाजूचा परिसर हयांचे दर्शन घडवून त्याची धारण शक्ती उददीपीत केली जाते.



पाचव्या, सहाव्या महिन्यात बाळ आधाराने जमिनीवर बसू लागते. हा भूमीस्पर्श सुध्दा संस्कारमय करण्याची आपली संस्कृती! हा संस्कार म्हणजे "कटीसूत्रधारण". ह्यामध्ये
बाळाच्या कमरेला आपल्या आवडीनुसार चांदीचे अथवा रेशमाचे कटीसूत्र बांधायचे, त्याला जमिनीवर बसवायचे आणि धरणी मातेला प्रार्थना करायची "रक्षेनं वसुधे देवी सदा सर्वगतं शुभे". सहाव्या महिन्यानंतर बाळाचा जामिनीवरचा वावर वाढणार असतो अशा वेळी त्याला जमीन बाधू नये हा ह्या संस्कारा मागील उद्देश.


सहाव्या महिन्या नंतर बाळाच्या योग्य वाढीसाठी नुसते दूध पुरत नाही. त्याच्या हालचाली वाढलेल्या असतात. त्याने रांगायला सुरवात केली असते. अशा वेळी त्याला घन आहार दयायला सुरवात करावी असे बालसंगोपन शास्त्र सांगते. ह्यालाच संस्कार भाषेत "अन्नप्राशन" म्हणतात. हा आहार जर योग्य वेळ बघून सुरू केला तर बाळाची प्रकृती आयुष्यभर निकोप रहाते असे
जाणकार सांगतात. हा घनआहार खिरीच्या रूपात सुरु करावा. तांदळाची, दूध, तूप आणि साखर घालून मऊसूत खीर बनवावी. ती निवल्या नंतर त्यात थेंबभर दही व मध घालून बाळाला भरवावे अशी ग्रंथांमध्ये नोंद आहे. ह्या अन्नप्राशना नंतर बाळाला इतर चवींची ओळख करून दयावी.

ह्या पुढचा संस्कार म्हणजे "जावळ". जावळ चा अर्थ आहे , जन्मतः डोक्यावर असलेले केस काढून टाकणे. मुलगा आणि मुलगी दोघांचेही जावळ काढण्याची आपल्याकडे प्रथा आहे. बाळाच्या डोक्याला लोणी आणि हळद लावून जावळ काढावे असे  शास्त्र सांगते. जुन्या काळातील antiseptic cream ! जावळ काढण्याने मस्तकावरील त्वचेला शुद्ध हवेचा पुरवठा होतो आणि त्वचारोग  होण्याची शक्यता कमी होते.  सुश्रुताच्या मते हा एक हर्षवर्धक, उत्साहवर्धक संस्कार आहे.

पहाता पहाता बाळ एक वर्षाचे झाले. त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणे हा पण संस्काराचाच भाग बरं का. बाळाला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे ह्या साठी त्याच्या जन्मतिथीच्या दिवशी त्याला औक्षण करायचे. औक्षण तुपाच्या निरंजनाने करायचे कारण ते मलीन होत नाही, काजळी धरत नाही. सोन्याने ओवाळायचा गर्भितार्थ असा की बाळाचे आयुष्य सोन्यासारखे निष्कलंक आणि तेजस्वी असावे. सुपारी आणि कापूस हे त्याच्या अविनाशी आयुष्याची कामना करतात तर त्याच्या डोक्यावरच्या अक्षता म्हणजे त्याच्यावर केला जाणारा आभिष्टचिंतनांचा वर्षाव!


असे हे औक्षण बाळाला प्रकाशाकडे, उन्नतीकडे घेउन जाणारे आहे. आता वाचकांनी विचार करायचा आहे कि वाढदिवसाला मेणबत्त्या विझवून टाळ्या वाजवायच्या का ओवाळून आर्शिवादरूपी टाळ्या वाजवायच्या ...


- आरती जोशी 


No comments:

Post a Comment