गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना आदरांजली

Select listen in browser.
गाणे ऐकण्यासाठी केशरी ➤बटन वर क्लिक करा.


बोलावा विठ्ठल - कौमुदी पत्की

आज  किशोरीताईंच्या निधनाची बातमी ऐकून खूपच वाईट वाटले. त्यांच्याविषयीच्या माझ्या काही हृद्य आठवणी आज मला लिहाव्याशा वाटतात. लहानपणापासून आमच्या घरात संगीताचे वातावरण होते. माझी आई गाणारी व  संगीत विषारद आहे. माझा भाऊ वाद्यांचा वितरक व तबला वाजवणारा. त्यामुळे मलाही  लहानपणापासून गाण्याची आवड निर्माण झाली. 
      
ज्याप्रमाणे जाई, जुई, मोगरा, सोनचाफा अशा अनेक फुलांचा सुगंध, त्या फुलांच्या नुसत्या आठवणीनेही पुन्हा ताजा होतो, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेले अनेक प्रसंगअनुभव कधी कधी बऱ्याच वर्षांनी  पुन्हा एकदा नव्याने आनंद देऊन जातात.१९८७ मध्ये गानवर्धन संस्थेच्या वतीने काही निवडक विद्यार्थीननींना किशोरीताईंनी शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. त्या निवडक विद्यार्थिनींमध्ये मी होते, हे मी माझे भाग्यच समजते. आम्ही ७-८ जणी रेल्वेनी मुंबईला जायचो.

त्यापैकी एकीचे माहेर चेंबूरचे होते. तिच्या घरी आम्ही उतरायचो. मुंबईची काहीही माहिती नव्हती. रविवारी सकाळी तयार होऊन आम्ही प्रभादेवीला सकाळी दहाच्या सुमारास  त्यांच्या घरी जायचो. पाय धुवूनच त्यांच्या खोलीत प्रवेश मिळायचा. प्रसन्न मुद्रेनी त्या आमचे स्वागत करायच्या. त्यांना नमस्कार करून दबकत आम्ही त्यांच्या समोर जाऊन बसायचो. 

त्या आवाज साधनेसाठी वेगवेगळे पलटे सांगायच्या. हाताची पेरं धरून एक पलटा १०८ वेळा कसा घोटायचा हे त्यांनी आम्हाला शिकवलं.  मंद्र सप्तकापासून तर सप्तकापर्यंत स्वर कसे लावत जायचे, वेगवेगळ्या रागाप्रमाणे त्या रंगाच्या श्रुतीनुसार स्वरांचा लगाव कसा असायला पाहिजे ते त्या सांगत. भूप गाताना पंचमावरून गंधरावर, षड्जावरून धैवतावर कसे यायचे याचे प्रात्यक्षिक दाखवत. 

यमन रागाची "मोमन लगन लागी" हा ख्याल आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाला. भूप रागाची झपतालातील "सा तपा आये गुरू" हि बंदिश शिकायला मिळाली. ती शिकवत असताना झपतालाच्या वजनाप्रमाणे उपज कशी करायची याचे मार्गदर्शन त्या करीत. तसेच भैरव रागातील "भज लछमी को लाल" ही बंदिश, यमन रागातील "सुमीरन कर राम नाम", "एरी आली पियाबीन" या बंदिशी काही प्रमाणात शिकायला मिळाल्या. तसेच त्यांनी एक गझलही शिकवली होती. ते शिकवत असताना पाश्चात्त्य संगीतातील कॉर्ड्सचा अभ्यास केला होता हे पाहून आश्चर्य वाटले . 

अजूनही या वयात त्यांच्या मैफिली ऐकताना त्यांचा व्यासंग पाहून मन थक्क होते. त्यांचे यमन, भूप, बागेश्री तसेच अनेक अनवट व जोडराग, बोलावा विठ्ठल, अवघा रंग एक झाला व इतर जनाबाईंचे अभंग उच्च सांगितिक आनंद देऊन जातात. अशा माझ्या आवडत्या आणि प्रतिथयश गायिकेच्या सान्निध्यात काही क्षण अनुभवता  आले, त्यांच्याकडे प्रत्यक्षपणे काही दिवस शिकायला मिळाले याचा मला अतिशय अभिमान वाटतो .

लेख आणि कट्ट्यासाठी गायन 
--- कौमुदी पत्की




No comments:

Post a Comment