वेगळी वाट - बी मॅन - अमित गोडसे

धान्य-फळं-फुलं या सगळ्याच्या उत्पादनाबद्दल बोलताना हवामान, कीटकनाशकं-खत-पाणी आणि जमिनीचा कस या सगळ्या गोष्टींबाबत भरपूर उहापोह केला जातो. पण एक महत्त्वाचा घटक मात्र आपण सगळेच विसरतो. तो म्हणजे मधमाशी! या सगळ्या घटकांइतकंच मधमाशीलाही महत्त्व आहे, कारण मधमाशीने केलेल्या परागीभवनामुळे धान्य-फळं-फुलं या सगळ्याच्या उत्पादनामध्ये जवळ जवळ ७० ते ८० % फरक पडतो.
आपण सर्वसामान्य लोकांना मधमाशीबद्दल दोनच गोष्टी माहीत असतात. एक म्हणजे ती चावते, त्याने भयानक वेदना होतात; आणि दुसरी म्हणजे ती मध गोळा करून पोळ्यामध्ये साठवते.

माझाही काही वेगळा समाज नव्हता, पण त्याबद्दल जाणून आणि समजून घेण्यासारखं खूप काही आहे, हे कळलं अमित गोडसे या तरुणाला भेटून. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून, विचारलेल्या प्रश्नांमधून जी माहिती कळली ती पुढीलप्रमाणे.

अमित गोडसे हे पेशाने इंजीनिअर. आयटी कंपनीत जॉब करत होते. लहानपणापासून निसर्गात रमण्याची आवड होतीच. पुण्यातल्या त्यांच्या फ्लॅटशेजारी आग्या माश्यांचं भलंमोठं पोळं झालेलं होतं. सोसायटीने पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलावून ते पोळं काढून घेतलं. या कामात त्या पोळ्यावरच्या सुमारे दीडेक लाख माश्या मेल्या. मेलेल्या माशांचा ढीग बघून अमित अस्वस्थ झाले. काही दिवसांतच कोणाच्या तरी शेतावर गेले असताना पाळलेल्या मधमाश्या बघायचा योग आला. अमित यांची मधमाश्यांबद्दलाची उत्सुकता बघून त्यांना पुणे, महाबळेश्वर इथल्या सेंटर्सना भेट देण्याबद्दल सुचवण्यात आलं. अमित पुणे, महाबळेश्वर इथे जाऊन ट्रेनिंग घेऊन आले. शिवाय केरळ, गुजरात, ओरिसा इथेही गेले. संपूर्ण भारतभर हिंडले. आदिवासींना भेटले. त्यांच्या असं लक्षात आलं की मध, मेण या गोष्टींमध्ये सगळ्यांना रस आहे, पण मधमाश्या जगल्या पाहिजेत यावर कोणाचा फोकस नाहीये; ना सरकारी संस्थांचा, ना मेण वगैरे विकणाऱ्या आदिवासींचा. पण माश्याच वाचल्या नाहीत तर मध कुठून गोळा होणार?

पुण्यात भरपूर माश्या आहेत, कारण पुणं ही मधमाश्यांची मायग्रेटरी साईट आहे. मग अमितनी इथेच काम सुरू केलं. वेगवेगळ्या संस्था, सोसायट्या, शाळा-कॉलेजेस, पर्यावरणप्रेमी संस्था इथे जाऊन माहिती देणं सुरू केलं. मधमाश्या वाचणं आपल्याच दृष्टीने किती महत्त्वाचं आहे याविषयी जनजागृती सुरू केली. या कामात ते इतके बुडाले की शेवटी त्यांनी आपला आयटीचा चांगला जॉब सोडून पूर्ण वेळ हेच काम सुरू केलं. आता त्यांच्या या स्टार्टअपला तीन वर्षं झालीत. सुरुवातीला अडचणीही आल्या, पण त्या कोणत्याही नवीन उपक्रमाला येतातच, हे लक्षात घेउन त्यांनी आपली चिकाटी सोडली नाही.

ते आदिवासींना माश्या न मारता, त्यांना छान जगवूनही मध आणि मेण कसं मिळवता येईल याचं ट्रेनिंग देतात. त्यांच्याकडून मध, मेण विकत घेतात आणि विकतात. त्यातून आदिवासींना रोजगार मिळतो आणि स्टार्टअपलाही...

मधमाश्यांबद्दल नीट माहिती नसल्याने लोक त्यांना घाबरतात. आता पोळं हलवण्यासाठी अमित यांना कुठून कुठून फोन येतात. तिथे जाऊन पहिली पायरी म्हणजे मधमाश्यांचं अस्तित्व किती उपकारक आहे ते सांगायचं. जर जिवाला धोका नाही, पोळं हलवलं नाही तरी चालू शकेल अशा ठिकाणी असलं, तर त्यांना सांगून बघायाचं. एक जरी माशी चावली तर येऊन पोळं काढून टाकायचं आश्वासन द्यायचं. दहापैकी चार कॉलला पोळं आहे तिथेच ठेवायला मान्यता मिळते. आणि अजूनपर्यंत माशी चावल्याची एकही तक्रार आलेली नाही असं अमित सांगतात. मुळात या मायाग्रेटरी, म्हणजे स्थलांतर करणाऱ्या माश्या आहेत. पुणं हा त्यांचा एक मोठा टप्पा आहे. ३-४ महिने तिथे राहून त्या उडून जातात.  

ज्या ठिकाणी पोळं तसंच राहू देणं शक्य नसतं तिथलं पोळं मात्र काढलं जातं. जर शक्य असेल तर आसपासच्या झाडावर, जिथे कोणाचा धक्का लागणार नाही अशा ठिकाणी पोळ्याचं स्थलांतर केलं जातं. जर तिथल्या तिथे स्थलांतर शक्य नसेल तर पोळं तिथून काढून एखाद्या शेतावर (शेतमालकाच्या संमतीनं) अथवा शहराबाहेराच्या एखाद्या झाडावर लावलं जातं. या सर्व प्रक्रियेत एकही माशी मरणार नाही किंवा तिला दुखापत होणार नाही याची काळजी घेतली जाते.

ही पोळं हलवण्याची प्रक्रिया रात्री पार पाडली जाते. दिवसा माश्या मध गोळा करायला गेलेल्या असतात. तेव्हा पोळं हलवलं तर माश्यांना नवीन पत्ता कळत नाही, आणि राणी माशी व पोळ्याशिवाय त्या मरतात. रात्री सर्व माश्या पोळ्यात परतलेल्या असल्याने त्यांना पोळं हलवण्याचा त्रास होत नाही.

जेव्हा नवीन राणीमाशी तयार होते, तेव्हा जुनी, अनुभवी राणीमाशी काही कामकरी माश्यांना घेउन नवीन पोळं करायला बाहेर पडते; जुनं पोळं नवीन राणीमाशीवर सोपवून. एका पोळ्यातून ४-५ तरी राणीमाश्या तयार होऊन नवीन कॉलनीज तयार करतात. म्हणजे तितक्या पटीत जास्त मधमाश्या, मध वाढतो. परागीभवन वाढते. पोळ्याची रचना अशी असते की वरच्या बाजूला मध साठवलेला, मधल्या भागात कामकरी माश्या आणि खालच्या भागात राणी माशी. मध मिळवण्यासाठी वरचा मधाचा भाग अलगद कापून घेतला जातो. जर पावसाळा जवळ आलेला असेल तर माश्यांसाठी ३५ ते ४० टक्के मध तसाच ठेवला जातो, पावसाळ्यात त्यांना अन्न कमी पडू नये म्हणून.

लोकांचा या जनजागृतीला कसा प्रतिसाद मिळतो विचारले असता गोडसे म्हणाले की चांगला प्रतिसाद मिळतो. पूर्वी लोकांना माश्या न मारता पोळं काढता येतं हा पर्यायच माहीत नव्हता. पण माहीत झाल्यापासून ते आवर्जून आम्हाला बोलावतात. ही माहिती इतरांनाही देतात. पोळं आहे तिथेच राहू देण्याबद्दल सुचवलं, समजावलं तर मानतात.
अमित यांचा हा स्टार्टअप ही खूप अनोखी गोष्ट आहे. भारतभरात कुठेही मधमाश्यांच्या संवर्धनावर काहीही काम चालू नाही. सरकारचंही माश्या मरू न देणं या मुद्द्याकडे दुर्लक्षच आहे. त्यांचा भर पेटीमध्ये मधमाश्या पाळायला देणं, यावरच आहे. अमित स्वत:, हे शास्त्रीय पद्धतीने मध काढणं, माश्या न मारता पोळं काढणं, त्यांच्या संवर्धनाची  गरज आणि महती पटवणं, हे सर्व शिकण्यासाठी उत्सुक लोकांना आणि खास करून आदिवासींना हे काम शिकवतात. भारतभरातून त्यांना या कामासाठी फोन येतात.

फक्त मध आणि परागीभवन एवढाच मधमाश्यांचा उपयोग नाही. त्यांच्या पोळ्यातलं मेणही अतिउपयुक्त असतं. कॉस्मेटीक कंपन्या आपल्या महागड्या उत्पादनांमध्ये हे मेण, म्हणजेच बीजवॅक्स वापरत असतात.

आणखी महत्त्वाचा, आणि आपल्याइकडे फारसा माहीत नसलेला फायदा म्हणजे, माशीचे औषधी गुणधर्म. मधमाशीच्या विषापासून औषधे तयार केली जातात. जर एखाददुसरी माशी चावली तर ते उपकारकच असतं. बी व्हेनम थेरपी आणि बी स्टिंग थेरपी या परदेशात बऱ्याच लोकप्रिय आहेत. आर्थ्रायाटीस आणि पॅरलीसीसवर मधमाशीच्या विषाची औषधे वापरली जातात. आपल्या इथे जळू लाऊन जसे औषधोपचार केले जातात, तसेच चायना, साउथ इस्ट एशिया इथे मधमाशीचा डंख करवून घेऊन करायची उपचारपद्धती आहे. भारतात अजून ही फारशी आली नाहीय.
अमित यांनी आता ‘बी बास्केट’ नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. मधमाश्यांपासून बनलेली उत्पादनं तिथे उपलब्ध आहेत. 

Once Prof. Albert Einstein had said " If the honeybees disappear off the surface of the globe, then man would have only four years of life left.. No bees..no pollination, no plants,  no animals.. no man". 

मधमाश्यांबद्दल अजून काही माहिती हवी असेल, काही उत्पादन खरेदी करायचं असेल किंवा मधमाश्यांच्या पोळ्यासंदर्भात काही काम असेल तर श्री. अमित गोडसे यांच्याशी संपर्क साधू शकता. 

Amit Godse ( a Bee Man)
#: -  83083000008

Facebook Page: - https://www.facebook.com/BeeBasketIndia/
My website: - https://www.beebasket.in
Contact :- -contact@beebasket.in 

मुलाखत आणि शब्दांकन
--- रश्मी साठे


  

  







 
 
   

  

1 comment: