फेसबुकचा महिमा वर्णावा किती!

तर मी काय म्हणत होते, आपला झुकरबर्गांचा मार्क आहे ना, तो लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा. तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉर्मेटरीमध्ये राहायचा ना, तेव्हा त्याने बहुधा शम्मी कपूरचे "बदनपे सितारे लपेट हुए" हे गाणे ऐकले असावे. त्या गाण्यात एक ओळ आहे- "है बनने सवरनेका तबही मजा, कोई देखनेवाला आशिक तो हो" या एका वाक्याने तो प्रेरित झाला असावा. आणि मग? जात्याच हुशार असल्याने वयाच्या विसाव्या वर्षी त्याला समजले की एकविसाव्या शतकात माणसाला नेमके काय हवे असेल आणि मग त्याने FACEBOOK निर्माण केले. आता FACEBOOK असे नाव देऊन त्याला लोकांनी पुस्तकासारखे चेहरे वाचावेत अशी अपेक्षा होती की चेहऱ्यावरचे भाव पुस्तकबद्ध करण्याची, हे सांगणे कठीण आहे. पण त्याचा तीर निशाण्यावर लागला आणि बघता बघता हा जगातल्या सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत गणला जाऊ लागला. मार्कचा मूळ उद्देश लोकांनी सोसेल एवढे सोशलायझिंग करावे हा असावा. पण त्याच्या त्या कल्पनेचा एवढा मोठा वटवृक्ष होईल याची त्यालाही कल्पना नसेल कदाचित.

मला तर फेसबुकच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांची किती मजा आहे असे वाटते. ते दिवसभर ऑफीशियली FACEBOOK वर असतात! तर अश्या ह्या फेसबुकचा महिमा काय वर्णावा महाराजा? फेसबुकने आपल्याला ते दिले, जे मिळण्याआधी त्याची गरजदेखील कोणाला ओळखता आली नव्हती. असे म्हणतात की आजची हौस ही उद्याची गरज बनते. ती गरज त्याने तयार केली. त्याला माहीत होते की माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो. कोणीतरी आपल्या रूपाचे किंवा गुणाचे कौतुक करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. ती या फेसबुकने पूर्ण केली.

जुने मित्रमैत्रिणी भेटणे, दूरचे नातेवाईक संपर्कात येणे हे तर झालेच. पण लोकांना तो/ती सध्या काय करते, कुठे असते अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घरबसल्या मिळू लागली. इतकेच नव्हे तर मोठमोठे कलाकार, खेळाडू, पुढारी यांच्याशी संपर्क साधणे सोपे झाले. एरवी अमिताभजी किती वाजता झोपतात, सचिन तेंडुलकर गुढीची पूजा कशी करतात अश्या गोष्टी आपल्याला कळायला काही मार्ग होता का सांगा.

प्रत्येक माणसात काही ना काही गुण असतात. कोणाचे पेंटिंग चांगले, कोणाची फोटोग्राफी चांगली, कोणी चांगला खेळाडू तर कोणी उत्तम स्वयंपाकी. प्रत्येकाला आपले चांगले गुण जगाला दाखवायची आणि त्यावर कौतुक मिळवून द्यायची सोय या फेसबुकने केली. आपण सुंदर आहोत असे म्हटलेले कोणाला नाही आवडणार, सांगा! फेबूने प्रत्येकाला स्टारडम  अनुभवायची संधी दिली. 

पूर्वी सुंदर साडी नेसून तयार झाल्यावर बायका नवऱ्याकडून कौतुकाची अपेक्षा करायच्या. आता ती गरज पडत नाही, कारण फेसबुकवर मैत्रिणी कौतुकाचा पाऊस पाडतात. नवरे लोकांना तर वाढदिवस वगैरे लक्षात ठेवायची गरजच पडत नाही. फेसबुक आठवण करून देते. हल्ली तर २/४ वर्षांपूर्वीच्या आठवणीसुद्धा जाग्या करून देते. प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात आपला अहंकार फुलवायचा असतो. स्वाभिमान टिकवायचा असतो. ते अशा कौतुकामुळे नक्कीच साधते. 

आता मला सांगा, पूर्वी आपण कुठे गावाला गेलो तर काय घराच्या भिंतीवर लिहून जाता यायचे का, आम्ही कुठे जातोय म्हणून? आणि ते ट्रिपचे फोटो दाखवायचीसुद्धा सोय नव्हती. पण आता कसे आपल्या अकाउंटची हक्काची भिंत असल्यामुळे हवे ते जाहीरपणे सांगता येते. 

मी तर असेही ऐकलेय की हल्ली काही चतुर कामवाल्या सरळ फेसबुकवर सांगतात कामाला येणार नसल्या तर, म्हणजे प्रत्येक घरी वेगळा मेसेज देत बसायला नको.
मला तर फेसबुक नैवेद्य दाखवायची कल्पनासुद्धा फार आवडली आहे. म्हणजे सणावाराला देवाला नैवेद्य दाखवला की त्या ताटाचा एक फोटो काढून फेसबुकवर पोस्ट करायचा आणि किमान १० लाईक आल्याशिवाय कोणी जेवायला सुरुवात करायची नाही. छान आहे की नाही फेसबुक नैवेद्य?

शिवाय फेसबुक पार्टी हा पण एक छान प्रकार आहे. या प्रकारात आपण आपल्या घरी जेवायला काहीतरी मस्त चमचमीत करायचे. त्याचा फोटो काढून फेबु वर पोस्ट करायचा आणि लोकांना जेवायला या असे आग्रहाचे निमंत्रण द्यायचे. नंतर आपणच ते चमचमीत पदार्थ खायचे आणि मग लोकांच्या कंमेंट्स वाचायच्या. लोक हमखास आपल्या पाककलेला दाद देतात. घरी खरे पाहुणे बोलावले असते तर त्यांनी हेच केले असते, पण त्यांना जेवू घालायचा उटारेटा करावा लागला असता. पण फेसबुकने काम सोप्पे झाले की नाही?

शिवाय फेसबुकने इंग्रजी भाषेला नवीन शब्द बहाल केले. yummilicious, fantabulastic, bestest असे इनोवेटीव्ह शब्द ही फेसबुकची देणगी आहे इंग्रजी भाषेला! फेसबुकने काही म्हणी-वाक्प्रचार सुद्धा प्रचलित केलेत जसे : गल्लीत विचारेना कुत्र, पण फेबुवर ढीगभर मित्र! किंवा नेकी कर कुएमें डालI बाकी कर फेसबुकपे डाल॥

फेसबुकमुळे PDA (Public Display of Affection)  ही एक नवीन संकल्पना उदयाला आली. यामध्ये आपण आपल्या जोडीदाराशी घरी कितीही भांडत असलो तरी आपले प्रेम अथवा कौतुक आपल्या भिंतीवर जाहीर करायचे. यामुळे लोकांना आपल्या अतूट नात्याची ग्वाही देता येते. तसेच तुला माझे काही कौतुकच नाहीअशी तक्रार करायला जोडीदाराला संधी मिळत नाही.

तसेच आपण मागच्या जन्मी कोण होतो, आपण किती वर्षे जगणार, आपला मृत्यू कसा होणार, आपल्याबद्दल कुठली बातमी वर्तमानपत्रात छापून येणार याची  माहिती घरबसल्या काही क्षणात मिळणे सोपे झाले. फेसबुकपूर्व काळात हे कधी शक्य होईल असे कोणाला वाटले देखील नव्हते.

असे म्हणतात की ३ सफरचंदांनी जग बदलले. एक अॅडमचे, एक न्यूटनचे आणि एक स्टीव्ह काकांचे. पण मला वाटते की जग बदलणाऱ्यांमध्ये आपल्या झुकरबर्गच्या फेसबुकचा पण नंबर लावायला हवा. नाही का?

--- विनया रायदुर्ग



No comments:

Post a Comment