सोशल मीडिया

वेळ :  सकाळी ५.३० वाजता
स्थळ : तुमच्या घराची बेडरूम
पात्र : पती, पत्नी और वो (मोबाईल)

अचानक मोबाईलच्या मेसेजचा आवाज येतो! तुम्ही आणि पत्नी (अर्थात तुमचीच !) खडबडून उठून बसता आणि मोबाईल बघता! मोबाईलमधला गुडमॉर्निंगचा मेसेज तुमच्याकडे पाहून जणू खदखदा हसत असतो! कुठल्यातरी निद्रानाश झालेल्या नातेवाईकाने साखरझोपेत मेसेज पाठवून तुमच्या झोपेचं खोबरं केलेलं असतं!

     वर घडलेला प्रसंग थोड्याफार फरकाने आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल! सोशल मीडियावर आपल्याला पिडणाऱ्या अनेक मंडळींपैकी ही एक जात आहे! या पीडेकऱ्यांच्या अश्या अनेक जाती आणि जमाती आहेत. व्हाट्सअँपवर ग्रुप तयार करून तुम्हाला न विचारता त्यात समाविष्ट करणारे, फेसबुकवर रोज न चुकता आपण जसे ब्रश करतो तसे स्वतःचे किंवा आपल्या मुलांचे फोटो टाकणारे, अनेकदा वाचून कंटाळवाणे झालेले जोक्स फॉरवर्ड करणारे, कुठलेतरी बकवास व्हिडिओ पाठवून तुमच्या फोनचे मेमरी कार्ड फुल करणारे!

     अशी ही मंडळी पाहिली की मार्क झुबेरबर्ग आणि जेन कोम (व्हाट्सअँपचा निर्माणकर्ता) यांच्या सात पिढ्यांचा उद्धार करावासा वाटतो! कशाला शोधून काढावी अशी साधने की जी वापरून ही अशी पीडेकरी मंडळी आपल्याला वेठीला धरतात? पण मार्क आणि जेनला काय माहित की आपण शोधून काढलेली ही साधने वापरून सातासमुद्रापलीकडील काही मंडळी इतरांना वैताग आणणार आहेत !

     खरंतर सोशल मीडिया ही किती सुंदर आणि उपयुक्त संकल्पना आहे. त्याचा जर आपण योग्यरित्या आणि संयमाने वापर केला तर, आपले कंटाळवाणे आयुष्य आपण किती सुसह्य करू शकतो!
दूरदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाशी फक्त बोलण्याचीच नव्हे तर त्याला प्रत्यक्ष बघण्याची सोय आता व्हाट्सअँपमुळे शक्य झाली आहे. डोळ्यात प्राण आणून आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या वृद्ध आईवडिलांच्या कंटाळवाण्या आयुष्यात यापेक्षा अधिक आनंदाचे क्षण कोणते असू शकतात? शाळेतला आपल्या बाकावर बसणारा जुना मित्र जेव्हा फेसबुकवर (टकलासहीत) सापडतो तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. आपल्या आयुष्यातील हरवलेले क्षण परत मिळवून देण्याचे सामर्थ्य सोशल मीडियात आहे! जर त्याचा योग्य तो वापर केला तर मित्रांचे, स्नेह्यांचे एक उबदार कवच आपण आपल्याभोवती निर्माण करू शकतो, जे कितीही कठीण प्रसंग आला तरी आपल्याला नेहमीच साथ देईल.

     पण सध्याच्या काळात याचा इतका गैरवापर होतो आहे की अफूच्या गोळीप्रमाणे सोशल मीडिया हे एक व्यसनच झाले आहे. नुकतीच पेपरमध्ये एक बातमी आली होती की निमहांस या बंगलोरमधील प्रख्यात आरोग्यसंस्थेने सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुक्तीसाठी एक विशेष व्यसनमुक्ती केंद्र सुरु केला आहे, इतकी त्याची गरज निर्माण झाली आहे.

     मुलांमध्ये वाढलेला सोशल मीडियाचा प्रभाव हा खरंतर स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. आपण जर आपले बालपण आठवले तर असं वाटते की अरे आपले बालपण किती सहज आणि सुंदर होते. टी.व्ही.,इंटरनेट, मोबाईलपूर्वीचा काळ किती छान होता! तेव्हाचे आयुष्य कसे साधेसरळ होते. लहान मुले मनसोक्त हुंदडायची, दंगा करायची आणि घरी आली की (मोठ्या माणसांच्या धाकाने का होईना) रामरक्षा म्हणून अभ्यास करायची. मोठी मंडळी ऑफिसमधून आल्यावर चहा वगैरे घेऊन अंगणात बसून छान गप्पा मारायची आणि त्यामध्ये मग कधीकधी आजूबाजूचे शेजारीही सहभागी होतं. मग त्यामध्ये एखादे तात्या किंवा नाना अनेक गोष्टी रंगवून सांगायचे आणि गप्पा इतक्या रंगायच्या की वेळेचे भानच राहायचे नाही. स्त्रि स्त्रियांचे आयुष्य सुद्धा किती साधेसोपे होते. सगळ्यांनी एकत्र जमून तिथे नसलेल्या एखाद्या कमलताईंची मनसोक्त निंदानालस्ती करायची, एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायच्या आणि सगळे सण एकत्र साजरे करायचे!  असे निरागस आयुष्य होते तेव्हा!

     खरं म्हटलं तर सोशल मीडिया ही याच निवांत आयुष्याची सुधारित आवृत्ती आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसे एकमेकांपासून दूर गेलीत. पूर्वीसारखे एकत्र बसून गप्पा मारणे आता शक्य नाही! परंतु मनातील स्नेहभाव, मैत्री अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळेच सोशल मीडियाने स्थळकाळाची बंधने झुगारून कुठल्याही माणसाला, कुठूनही, कुणाशीही जोडण्याची विलक्षण सोय करून दिली आहे. याचा जर योग्य वापर केला तर खरंच हा एक क्रांतिकारक शोध आहे. स्नेहाचे, मैत्रीचे हे जाळं जर तुम्ही काळजीपूर्वक विणले आणि जोपासले तर त्याइतका मोठा आनंद नाही.

     पण कुठलीही गोष्ट संयमाने, विचारपूर्वक करेल तर तो मानव कुठला? ज्या मानवाने ईश्वराने दिलेली नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश करण्याचा सपाटा लावला आहे, तो सोशल मीडियाचा अतिवापर करणार नाही हे कशावरून?

     मी स्वीडनला काही कामानिमित्य जवळजवळ वर्षभर होतो. तेथे रोज ऑफिसला जाण्यासाठी मी ट्रेनचा वापर करीत असे. तेथील ट्रेनचे वैशिट्य म्हणजे ट्रेनचे डब्बे पूर्णपणे एकमेकांना जोडलेले असत, त्यामुळे ट्रेनमधील बहुतेक सर्व प्रवाशी आपल्याला दिसू शकतं! या रोजच्या प्रवासात एक मजेदार, अतिपरिचित दृश्य मला दिसे. नजर पोहचेल तिथपर्यंत सगळे प्रवासी इअरफोन लावून शांतपणे आपापल्या मोबाईलवर काहीतरी बघत असत! असा भास होई की जणू काही अनेक यंत्रमानव बसलेले आहेत! कधीकधी मला असे वाटे की या मंडळींनी मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी मनसोक्त गप्पा केल्या तर यांचा प्रवास किती आल्हाददायक होईल!

     खरं तर सोशल मीडियाच्या या आभासी जगामुळे आपण खरेखुरे आयुष्य जगण्याची कलाच विसरलो आहोत! व्हाट्सअँपवर मित्राशी तासनतास केलेल्या चॅटला प्रत्यक्ष भेटल्यावर पाठीवर थाप मारून केलेल्या गप्पांची सर कधीच येणार नाही. आईशी मोबाईलवर बोलणे आणि तिच्या पायाशी बसून, तिने प्रेमाने आपल्या केसांतून हात फिरवीत मारलेल्या गप्पा - या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्या प्रेमळ स्पर्शाची सर सोशल मीडियाला येणार नाही. फेसबुकवर अनेक फोटो पाहूनही आल्प्स पर्वताचे बर्फाळ सौंदर्य आपल्याला तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळू शकते. तिथे अंग गोठविणाऱ्या थंडीची मजा फेसबुक आपल्याला देऊ शकत नाही. खरंखुरं जीवन हे जास्त सुंदर आहे, अधिक जिवंत आहॆ! त्याचा प्रत्यक्षात उपभोग घेण्याचे सोडून आपण जर सोशल मीडियाच्या खोट्या जगात गुंतून पडलो तर त्यासारखी दुर्देवी गोष्ट नाही.
     सोशल मीडियाचा अजून एक दुष्परिणाम म्हणजे आपण वाचन वगैरे पूर्णपणं विसरून गेलेलो आहोत. वाचन म्हणजे व्हाट्सअँपवर आलेले बाष्कळ विनोद आणि फेसबुकवरील पांचट पोस्ट्स असा अनेकांचा गैरसमज झालेला दिसतो! ज्या पिढीने श्रीमान योगी, मृत्युन्जय, बटाटयाची चाळ, इन्कलाब सारखे दर्जेदार वाचले आहे त्यांच्यासाठी हे असे उठवळ साहित्य (!) वाचणे म्हणजे एक शिक्षाच वाटते!

     म्हणूनच सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला असे सांगावेसे वाटते की, बाजूला ठेवा तो मोबाईल आणि लॅपटॉप! जरा तुमच्या आजूबाजूला बघा. तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल इतक्या सुंदर गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसतील ! आयुष्य जिवंतपणे जगण्याची कला आत्मसात करा, म्हणजे मग तुम्हाला या खोट्या आभासांची गरजचं भासणार नाही.

     फेसबुकवरील सनी,  कतरिना आणि प्रियांकाचे फोटो पाहण्यापेक्षा समोर राहणाऱ्या एखाद्या साध्यासुध्या, सुंदर मुलीवर प्रेम करा. मग बघा आयुष्य कसे विविध रंगांनी फुलून येतं ते! खूप प्रवास करा, जग पहा! पण हो, त्याचे भरमसाठ फोटो सोशल मीडियावर टाकून इतरांना वैताग आणू नका! स्वतःच्या कोषातून बाहेर पडून ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे त्यांना मदतीचा हात द्या, कुणास ठाऊक प्रकाश आमटेंसारखं एखादं महान कार्य तुमच्याही हातून होऊन जाईल!

     आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला असं वाटायला नको की -

     वेगवेगळी फुले ऊमलली, रचूनि त्यांचे झेले
     एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले!


- अविनाश चिंचवडकर




























1 comment:

  1. एकदम सही है भैय्या पण आपली पिढी नशीबवान आहे आपण लहानपणी , तरूणपणी खुप आनंद उपभोगला आहे आता म्हातारपणी हे वॉटस् अप , फेसबुकच भूत मानगुटीवर बसु बघतय पण त्यातही आनंददायक हेच की तुझ्यासारख्या प्रतीभावंताचे दर्जेदार लेखन त्वरीत आमच्यापर्यंत पोचते व आमच्या प्रतीक्रीया तुमच्यापर्यंत .. हेही नसे थोडके
    संदीप फडणवीस

    ReplyDelete