निसर्गाच्या सहवासात (भाग ४)

आपण आपला कन्टेनर/कुंडी वेगवेगळ्या पद्धतीने भरू शकतो. माती, वाळू आणि शेणखत असे मिसळून कुंडी भरू शकतो हे आपण मागच्या भागात पहिलेच. दुसरी एक पद्धत डॉ. रमेश दोशी व मराठी विज्ञान परिषद यांनी विकसित केली आहे. जो कन्टेनर आपण झाड लावायला घेणार आहोत, त्याचे ढोबळपणे तीन भाग करायचे. सर्वात खालच्या भागात, तळाशी गवत (जे आंब्याच्या पेटीत घालतात ते) , उसाचे चिपाड, झाडाच्या बारीक, छोट्या कापून टाकलेल्या फांद्या, कणसाची टरफले अशा तंतुमय गोष्टीनी भरायच्या. त्यावर मधल्या भागात वाळलेली पाने, जमा केलेला जैविक कचरा किंवा घरचे कंपोस्ट टाकायचे. सर्वात वरच्या भागात माती टाकायची, जी सच्छिद्र असेल. माती, वाळू आणि शेणखत असे मिसळलेली असेल तर उत्तमच. माती फार कोरडी नको, त्याचा गोळा करता आला पाहिजे. शेणखताऐवजी कोकोपिट पण वापरू शकतो. या पद्धतीने जर कन्टेनर भरला तर या तीन भागांमुळे वजनाच्या सहापट पाणी शोषून घेण्याइतपत मातीची क्षमता वाढते. सुरुवात करताना नर्सरीमध्ये मिळणारी तयार माती वापरू शकतो.


वर उल्लेख केलेले कंपोस्ट आपण घरच्या घरी तयार करु शकतो. कंपोस्ट म्हणजे तपकिरी काळ्या रंगाचे मटेरीअल, जे दिसते मातीसारखेच पण पोषक गोष्टींनी (nutrient rich) भरपूर असते. हे तीन प्रकारांनी करता येते. एरोबिक, अनएरोबिक आणि वर्मी. घरी करताना एरोबिक पद्धतीने करू शकतो. बास्केट अथवा रिकामी कुंडी वापरून करता येते. आजकाल बाहेर बाजारात कंपोस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची (daily dump सारखी) मातीची भांडीदेखील मिळतात. तीदेखील वापरू शकतो. परदेशात मोटरवर चालणारी, टेंपरेचर कंट्रोलची सोय असणारी कंपोस्ट मशीन्स असतात. आपल्याकडेदेखील थोड्याबहुत फरकाने ही उपलब्ध आहेत. कंपोस्टसाठी कार्बन रिच मटेरीअल आणि नायट्रोजन रिच मटेरीअल दोन्ही एका कन्टेनर मध्ये (ज्यामध्ये आपण कंपोस्ट करणार आहोत) एकत्र करायचे असते. सुकलेली पाने, तण, पेंढा, छोट्या वाळक्या फांद्या, माती, फुले म्हणजे कार्बनरिच मटेरीअल तर लाकडाचा भुगा, ताजी पाने, स्वयंपाकघरातला ओला कचरा(भाज्यांच्या, फळांच्या साली-टरफले, पालेभाजीची मुळे, देठे, बिया  वगैरे शक्यतो बारीक  चिरून) म्हणजे नायट्रोजन रिच मटेरीअल. अंड्याचे कवच टाकताना मात्र त्याचा बारीक चुरा करून टाकावा लागतो कारण त्याचे विघटन व्हायला जवळजवळ चाळीस दिवस लागतात. मांस-मच्छीपण टाकू शकतो. पण शक्यतो कम्पोस्टिंगचा सराव झाल्यावर हे टाकायला सुरुवात करावी. धूळ, मेलेली झुरळे, केस, काळी-पांढरी वर्तमानपत्रेसुद्धा चालतात. एकच पथ्य पाळायचे की टाकताना सगळे बारीक करून टाकायचे, म्हणजे लवकर विघटन होते. कीड लागलेली झाडाची पाने, निलगिरीची पाने (toxic असतात),  डेअरी प्रोडक्ट्स, टाकायचे नाहीत. गांडुळे आत सोडली की विघटनाचा वेग वाढतो, मात्र त्यावर  आपण सायट्रस फ्रुट्सचा कचरा घालू शकत नाही. प्रत्येक वेळी कचरा घातल्यावर एका काठीने किंवा garden tool वापरून ते हलवायचे. हे नीट मिक्स करणे महत्त्वाचे आहे.

कम्पोस्टिंग करणाऱ्या जीवजन्तुना कार्बन रिच मटेरीअल एनर्जी देते, तर नायट्रोजन रिच मटेरीअल प्रोटीन आणि  moisture पुरवते. कार्बन रिच मटेरीअल जास्त झाले तर विघटनाचा वेग मंदावतो. आणि नायट्रोजन रिच मटेरीअल जास्त झाले की वास येतो. कचरा सडणे आणि कुजणे यात फरक आहे. सडण्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे वास येतो, तर कुजण्यामध्ये ऑक्सिजन मिळतो म्हणून वास येत नाही. त्यामुळे दोघांचे प्रमाण साधारण सारखे ठेवावे. एक वेळ कार्बन रिच मटेरीअल जरा जास्त झाले तर चालू शकते. कम्पोस्टिंग करायला सुरुवात केल्यावर साधारणपणे चार ते पाच दिवसानंतर bacteria निर्माण होतात. उष्णता निर्माण होते. bacteria मुळे पीएच कमी झाल्यावर organic acids ची निर्मिती होते. सूक्ष्म जीवजंतू एन्झाईम निर्मिती करतात आणि पेथोजेनिक सेल्स नष्ट केले जातात. कालांतराने हे पेथोजन जगण्याची, वाढण्याची (पुनर्निर्मिती ) किंवा सर्व्हाइव करण्याची आपली क्षमताच गमावून बसतात. त्यामुळे इन्फेक्शन पसरण्याचा धोका नाहीसा होतो. हा गुणधर्म जेव्हा तयार कंपोस्ट आपण झाडांना घालतो तेव्हा दिसून येतो.

कम्पोस्टिंग करताना काही अडचणी येऊ शकतात. पावसाळा आणि हिवाळा यांच्या तुलनेत उन्हाळ्यात कंपोस्टिंगचा वेग जास्त असतो. कंपोस्ट करताना ओलावा राखणे गरजेचे असते. जास्त ओला किंवा जास्त सुका चालत नाही. कचरा वाळतोय असे वाटले की त्यावर थोडे पाणी शिंपडायचेकचऱ्याला वास आला (नायट्रोजन रिच मटेरीअल जास्त ) म्हणजेच ओला कचरा जास्त झाला. तेव्हा सुका कचरा घालायचा. कधीकधी किमऱ्या बसतात तेव्हा गवती चहा बारीक कापून वर घालायचा. कधीकधी कचऱ्यामध्ये अळ्या होतात, याचा अर्थ कचरा जास्त ओला आहे, हवा खेळू  शकत नाहीये, तेव्हा सुका कचरा घालायचा. लाल मिरचीची पूड घातली तरी अळ्या जातात. मुंग्या आल्या तरी चालतात, पण लक्ष्मणरेषा खडू आखला की निघूनही जातात.

अशा  प्रकारे  दाणेदार मातीसारखे कंपोस्ट तयार झाले की सर्व कुंड्यांमध्ये मिसळून टाका. टाकताना कधीही झाडाच्या बुंध्याशी /मुळांशी टाकू नये, काही अंतरावर गोल पसरून टाकावे. नवीन झाड लावताना मातीमध्येदेखील ते काही प्रमाणात मिसळता येते.
कंपोस्टमुळे बरेच फायदे होतात. झाडांचे आरोग्य, मातीचा कस सुधारतो. माती पोरस बनते आणि मुळे वाढू शकतात. कंपोस्टमधले जीवजंतू nutrients (चांगले घटक) तयार करतात. ते झाडांच्या मुळांपर्यंत पोचतात. toxic गोष्टीना chemically अल्टर करतात, म्हणजेच निरुपयोगी बनवतात. जशी माती तसे कंपोस्ट वागते. वाळूदार मातीत पाणी धरून ठेवते तर मातीच्या जमिनीत पाणी निघून जायला मदत करते. घरातला ओला-सुका कचरा कमी होतो. वातावरणातले प्रदूषण, जमिनीची धूप कमी होते. मुख्य म्हणजे कंपोस्टमधल्या पोषक गुणधर्मामुळे झाडांचे आरोग्य सुधारते.

घरी झाडे लावल्यावर कम्पोस्टिंग करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी देखील आपण पार पडू शकतो.ज्यांना हे घरी करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी बाहेर बाजारात तयार कंपोस्टदेखील उपलब्ध असते.  

--- रुपाली गोखले

2 comments:

  1. Nisargachya Sahavasat abhyaspurna Leah. Well done Roopali

    ReplyDelete
  2. रुपाली, लेख छान लिहिला आहेस, अगदी सोप्या भाषेत सगळी माहिती दिली आहेस👍

    ReplyDelete