लता मंगेशकर

     हर खुशी हो वहाँ तू जहाँ भी रहे


येशूच्या जन्माची कहाणी अशी सांगतात की, कित्येक शतकांपूर्वी काही ज्योतिष्यांना एका रात्री पूर्वेकडे एक कधीही पाहिलेला अद्वितीय तारा विशिष्ट दिशेने जाताना दिसला. ज्योतिष्यांनी त्या ताऱ्याचा पाठलाग सुरू केला. जेरुसलेम येथे येताच एका झोपडीवर तो तारा स्थिर झाला. ज्योतिष्यी त्या घरात शिरले आणि पाहतात तो काय, त्या घरात एक अद्वितीय बालक जन्माला आले होते - तो होता येशू ख्रिस्त!

असंभवता, अंधश्रद्धा आणि व्यक्तिपूजेचा आरोप स्वीकारूनही कधीकधी मला असे वाटते की २८ सप्टेंबर १९२९ च्या रात्री जर कुणी आकाशात बघितलं असतं तर असाच एखादा दिव्य अलौकिक तारा मंगेशकरांच्या घरावरही स्थिर झालेला दिसला असता. कारण त्या दिवशी त्या घरात एक अद्वितीय बालिका जन्माला आली होतीती होती लता मंगेशकर! गानसम्राज्ञी, स्वरकोकिळा लता मंगेशकर! “लता गाती है, बाकी सब रोती हैं|सज्जाद हुसेनसारखा कुणालाही दाद देणारा अख्खड संगीतकारसुद्धा तिच्याबद्दल असे बोलून गेला आहे, यापेक्षा अधिक काय सांगावं?


आज लता मंगेशकर हे नाव उच्चारताच मान आदराने झुकावी असा सन्मान तिने मिळवला आहेपण या साऱ्या यशाच्या मागे तिची किती तपश्चर्या आहे याचा कुणी कधी विचार तरी केला आहे कामाणूस आपल्या इच्छाशक्तीच्यापरिश्रमांच्या जोरावर काय करू शकतो याचं लता हे मूर्तिमंत उदाहरण आहे.  १९४२ साली मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं तेव्हा लता अवघी १२/१३ वर्षांची होती. साऱ्या कुटुंबाची जबाबदारी इवल्याशा लतावर येऊन पडली होती! पण निसर्गाने लताच्या गळ्यात स्वरांचा मधुर खजाना भरून ठेवला होता. या खजिन्याच्या जोरावर लताने आयुष्याचा खडतर संघर्ष केला आणि ती यशाच्याकीर्तीच्या शिखरावर जाऊन विराजमान झाली! या खडतर कालखंडात किती अपमानकिती कडू घोट तिला गिळावे लागले असतील ते तीच जाणे!  पण

मेरे दिले नादान तू गमसे ना घबराना
एक दिन तो समझ लेगी दुनिया तेरा अफसाना

असा स्वतःलाच दिलासा देत लता गात सुटलीआपल्या आवाजाने तिने हिंदी चित्रपटसृष्टी झळाळून टाकली अन् आज तर ती आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनली आहे!

लताची जीवनकहाणी दुर्दम्य इच्छाशक्तीची आहे. लताने दुसऱ्या गायिकांना संधी मिळू दिली नाही, तिच्यामुळे अनेक नवीन गायिकांचे नुकसान झाले असे म्हणणे म्हणजे सूर्याचा प्रकाश होता म्हणून तारे चमकू शकले नाहीत, असं म्हणण्यासारखंच हास्यास्पद आहे. आपल्या सहस्ररश्मी किरणांनी सूर्य तळपत असताना काय बिशाद आहे कुणाची, त्याचं वर्चस्व नाकारण्याची? लताचं यशही असंच निर्विवाद आहे! लता मंगेशकर ही हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेली एक सोनेरी झालर आहे. तिच्या आवाजाने या स्वप्नसृष्टीला एक वेगळाच दिव्य आयाम मिळवून दिला आहे.

लताने गायिलेल्या गाण्यांच्या संख्येत तिची श्रेष्ठता ठरवणाऱ्यांची मला कीव येते. या लौकिक गोष्टींवरून तिच्या अलौकिक स्वरांची महती पटविण्याची काही गरजच नाही. तिचं कुठलंही एक गाणं ऐका! तिच्या दिव्यत्वाची प्रचिती तुम्हाला आपोआपच येईल.
माया’ मधील ते  विलक्षण गाणं ऐका. दगडालाही पाझर फोडण्याची ताकद आहे तिच्या आवाजात!

          जारे उड जारे पन्छी, बहारोंके देश जा रे,
     यहाँ क्या है मेरे प्यारे
के उजड गयी बगिया मेरे मनकी

विरहिणीची व्यथा किती समर्थपणे मांडली आहे लतानी! लताचा आवाज या गाण्यात अगदी आर्त आणि कातर झालेला असतो!

          डाली रही ना कली, अजब गमकी आँधी चली
          उडी दुखकी धूल राहोंमे

सोसाट्याचा वारा यावा तसं दुःखाचं एक तुफान अचानक आयुष्यावर चालून आलं आणि कळ्यांचा पाचोळा करून, मागे वाटेवर धूळ सोडून निघून गेलंया गाण्याची पुढची ओळ तर मनाला अगदी भिडून जाते.

          मै बीना उठा ना सकी,  तेरे संग गा ना सकी
ढले मेरे गीत आहोंमें!

तुला साथ देणं मला शक्य नव्हतं! तुझ्या सुरात सूर मिळवून गाणं माझ्या नशिबात नव्हतं! आता फक्त अश्रू आणि उसासे माझं गीत गात असतात. हे गाणं ऐकल्यावर जो माणूस अस्वस्थ झाला नाही तो एकतर बेशुद्ध असेल किंवा निर्जीव असेल!


लताचा आवाज अतिशय लवचीक आहे. ती जशी अतिशय वेगवान गाणं उत्तम गाते तसंच अतिशय संथ गाणंपण तितक्याच ताकदीने म्हणते.

        पवन वेगसे उडनेवाले घोडे, तुझपे सवार है जो
       मेरा सुहाग है वो, रखियों रे आज उनकी लाज हो

किंवा

कहे झूम झूम रात ये सुहानीपिया होलेसे छेडो दोबारा
वही कलकी रसिली कहानी!

या वेगवान गाण्यांमध्ये आपल्याला मोहून घेण्याचे जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच सामर्थ्य -

          रजनीगंधा फूल तुम्हारे, महके यूँही जीवनमें
          यूँही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमें

या अतिशय संथ, भावपूर्ण गाण्यातही आहे. प्रत्येक गाणं सारख्याच उत्कटतेने अभिव्यक्त करण्याची लताची क्षमता केवळ अवर्णनीय आहे. अशी क्षमता रफीचा अपवाद वगळता इतर गायकांमध्ये सहसा आढळत नाही -

          मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम
          नेकीपर चले और बदीसे रहें, ताकी हसते हुए निकले दम!

या गाण्यामुळे लता तुमच्या मनात भक्तिभाव निर्माण करून जाते.

          भैय्या मेरे राखीके बंधनको निभाना
भैय्या मेरे छोटी बहनको ना भुलाना

असं म्हणून भावाबहिणीचं पवित्र नातं सुंदरतेने व्यक्त करते!

          मेरे वतनके लोगों, जरा आँख मे भरलो पानी
          जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी

या गाण्यामुळे पं. नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले होते ही वारंवार सांगण्यात आल्यामुळे कंटाळवाणी झालेली कहाणी सांगताही, तुमचे नेत्र ओलाविण्याची क्षमता आहे! तुमच्या मनात देशप्रेमाची मशाल पेटविण्याची शक्ती आहे!

          गुडिया हमसे रुठी रहोगी, कबतक हंसोगी
          देखो जी किरनसी लहराई
          आई रे आई रे हंसी आई

दोस्ती मधल्या या गाण्यामुळे प्रसन्नतेची एक लहर आपल्या मनाला स्पर्शून जाते.
          रहे ना रहे हम, महका करेंगे
          बनके कली, बनके सबा, बाग--वफामें

या गाण्यात आपल्या मनात उदात्ततेची, पावित्र्याची लाट निर्माण करण्याची शक्ती आहे! अशी किती उदाहरणं द्यावीत?

प्रणय हा तर मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातील नाजूक छटा, सुरेख बारकावे आणि आर्त विरह व्यक्त करावा तो लतानीच! या क्षेत्रातील लताचा एकाधिकार निर्विवाद आहे! आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अवखळ, खट्याळ प्रेयसीच्या भावना लता अगदी  खट्याळपणे व्यक्त करते -
                   उनसे मिली नजर के मेरे होश उड गये
                   ऐसा हुआ असर के मेरे होश उड गये

आणि आपल्या प्रियकरावर अव्यक्त, मूक, गाभाऱ्यात शांतपणे तेवणाऱ्या समईप्रमाणे प्रेम करणाऱ्या शालीन प्रेयसीच्या भावनाही तितक्याच समर्थपणे व्यक्त करते -
                   तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा
                   तुम्ही देवता हो...
                   कोई मेरी आखोंसे देखे तो समझे
                   के तुम मेरे क्या हो? तुम्ही प्राण मेरे !

लता ज्याप्रमाणे -
                   हां मैने प्यार किया
                   हाय हाय . क्या जुर्मं किया?

असं निर्भीडपणे विचारते तशीच -
                   जारे कारे बदरा, बलमाके पास
                   वो हैं ऐसे बुद्धू जो समझे ना प्यार !

असं लाजरंबुजरं प्रेमही तितक्याच मुग्धपणे व्यक्त करते.
                   जादूगर सैंय्या छोडो मोरी बैंय्या
                   हो गयी आधी रात, अब घर जाने दो !

असं शृंगारात आकंठ बुडालेलं प्रेमही ती सारख्याच उत्कटतेने व्यक्त करते.
                   सारी सारी रात तेरी याद सताये
                   नींद आये मुझे चैन आये

या गोड हुरहूर लावणाऱ्या विरहाइतकाच -
                   छुप गया कोई रे दूरसे पुकारके
                   दर्द अनोखे हाय, दे गया प्यार में

हा जीवघेणा विरहही ती तेवढीच मन लावून व्यक्त करते!
                   रंग दिलकी धडकन लाती तो होगी
                   याद मेरी उनको आती तो होगी

हे नुकतेच उमलू लागलेलं प्रेम लताच्या तोंडी जितकं चपखल बसतं, तितकंच -
                   सनम, तेरे हो गये हम, प्यारमे तेरे खो गये हम
                   मिल गया मुझको सनम, जिंदगीका बहाना...


हे गीतही तिला तेवढंच शोभून दिसतं. श्रावणातील ऊनपावसाच्या खेळाप्रमाणे लताची गाणी आपल्याशी एक विलोभनीय खेळ खेळत असतात. खरं तर लताची गाणी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सोबत करीत असतात. लताच्या अगदी खूपच आवडणाऱ्या गाण्यांची यादी जरी द्यायची म्हटली तरी ते शक्य नाही, कारण तसा प्रयत्न केला तरी शेकडो गाण्यांच्या लहरी मनावर उमटून जातात.  

               २८ सप्टेंबर रोजी लताने वयाच्या ८८ व्या वर्षात प्रवेश केला.  जर निसर्गाने मानवाला आपले आयुष्य इतरांना दान करण्याची क्षमता दिली असती तर मला खात्री आहे की माझ्यासकट लताच्या हजारो चाहत्यांनी आपल्या आयुष्याचे दान तिला हसतहसत दिले असते!
                   लताच्याच एका नितांत सुंदर गाण्याच्या माध्यमातून मी तिला माझ्या शुभेच्छा अर्पण करतो -

                   हर ख़ुशी हो वहाँ, तू जहाँ भी रहे
                   जिंदगी हो वहाँ, तू जहाँ भी रहे
                   रोशनी हो वहाँ, तू जहाँ भी रहे
                   चांदनी हो वहाँ, तू जहाँ भी रहे...



अविनाश चिंचवडकर
  





No comments:

Post a Comment