आदिवासी चित्रकला

चित्रकला व हस्तकला यांची आवड मला लहानपणापासूनच आहे. तेव्हा काढलेल्या चित्रात निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे काढल्याचे मला आठवते. शाळेत चित्रकलेच्या दोन परीक्षाही दिल्या होत्या.

आदिवासी कलेशी माझी पहिली ओळख बंगलोरमध्ये जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी झाली. त्या वेळी आमच्याकडे एल.आय.सी.ची एक डायरी होती व कव्हरच्या आतल्या पानावर वारली चित्रकलेचे नमुने होते. ते पाहताक्षणीच मी ह्या कलेच्या प्रेमात पडले. ही आदिवासी चित्रकला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील. मोजक्या आकारांतून साकार झालेली ही कला, पण कोणत्याच बाबतीत कमी नाही. त्रिकोण, वर्तुळ व रेघा ह्यातून एक परिपूर्ण कलाकृती होऊ शकते हे मला जाणवले. त्रिकोणांचे कोन बदलले की आकृती बदलते व कमीत कमी रेघांमधूनही आकृती बरेच काही व्यक्त करू शकते ही कमालच. वारली समाजाच्या दैनंदिन जीवनातील घटना ह्या चित्रात प्रकट केलेल्या असतात; जसे की सणवार, लग्नसमारंभ वगैरे.

काही वर्षांनी एका आकर्षक ग्रीटिंग कार्डने माझे लक्ष वेधून घेतले.  ते मधुबनी ह्या प्रकारातले चित्र होते. मधुबनी ही बिहारची आदिवासी कला. रंगसंगती, चित्रातील मांडणी व समतोल अतिशय छान होती.  ह्यात प्रामुख्याने पौराणिक गोष्टी, देवी-देवता व निसर्ग हे विषय हाताळलेले असतात.

माझा तिसरा आवडता चित्रकला प्रकार हा म्हणजे मध्य प्रदेशातील ‘गोंड’ ही आदिवासी चित्रकला.  गोंडही त्याच्या रंगसंगती व बारकाव्यांमुळे अतिशय आकर्षक वाटतो. आदिवासी भागात दिसणारे प्राणी-पक्षी ह्यात प्रामुख्याने आढळतात.

ह्या कलांचा खरे तर माझा फार अभ्यास नाही, पण त्या मला बऱ्याच कारणांनी आवडतात. त्यात मुख्य गोष्ट म्हणजे हे कलाकार प्रशिक्षित नसतात, तरीही ते आपल्या घराण्याची परंपरा पुढे चालवत असतात.  लहानपणापासून घरातल्या मोठ्यांकडूनच ते ही कला शिकत असणार. दुसरे म्हणजे ह्या लोकांना जात्याच असणारी उत्तम रंगसंगतीची जाण. रंगसंगतीनेच कलाकृती आकर्षक होते असे मला वाटते. महागाईचे कृत्रिम रंग न वापरता रोजच्या वापरातील, स्वयंपाकातीलदेखील, वस्तूंपासून नैसर्गिक रंग बनवून ह्या चित्रात वापरतात. त्याने वेगळाच उठाव येतो.

आपल्या देशातील कलाप्रकारांचे हेच वैशिष्टय आहे की प्रत्येक कलाकृती आगळीवेगळी असते. अनेक वेळा हस्तकला प्रदर्शनांमध्ये अशा कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, ही लोकं खूप निरागस, निगर्वी व स्वभावाने मोकळी असतात. त्यांच्या कलाकृतींबद्दल प्रश्न विचारले असता ते मोकळेपणी सर्व माहिती देतात. आजकालच्या काळात हा गुण कौतुकास्पद वाटतो. त्यांच्याशी बोलून वाटणारही नाही की ह्यातील बरेच कलाकार राज्य व राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत. आपण सर्वांनीच अशा प्रदर्शनांना जाऊन ह्या कलाकारांचे कौतुक केले पाहिजे. मातीशी नाते जपणारे हे कलाकार आणि त्यांची कला आपल्याला बरेच काही शिकवून जाते.

वरील कलाप्रकारातून प्रेरणा घेऊन मीसुद्धा अशा प्रकाराची चित्रे काढायला सुरुवात केली. त्यातील काही नमुने सोबत देत आहे.

गोंड

मधुबनी

वारली

-- दिपा परांजपे

No comments:

Post a Comment