हुरहुर

मला एक सवय आहे - नव्हे छंद आहे म्हणा ना! सुंदर साडी दिसली कि माझी नजर झर्रकन तिकडे वळते. क्षणभर का होईना, मी त्या साडीत गुंतते. दुकानातल्या साड्यांपेक्षा, एखादीच्या अंगावरची साडी मला जास्त आकर्षित करते. रस्त्याने जाताना मी मुद्दाम साडी बघत नाही, पण एखादी साडी भावली कि मनातल्या मनात कौतुक करते. एकच क्षण, पुन्हा माझी मी. अगदी कामवालीच्या अंगावरची सुरेख साडीतसुद्धा माझं मन हरवून  जातं. 

नाटक, सिनेमा, किंवा सभा समारंभांना गेल्यावर तर मज्जाच! एखादं डिझाईन, रंग, किनार, वेगळं  नि छान वाटलं कि माझं लक्ष गेलंच. लग्नसमारंभ म्हणजे पर्वणीच. त्यामुळे लग्नात कम्पनी नसली तरी माझा वेळ छान जातो. नेत्रसुख भरपूर मिळतं. अर्थात, हे सर्व मनातल्या मनात. तितकीच ओळख असेल, नात्यातलली कोणी असेल, तर तोंडावर कौतुक. दोघींचही मन प्रसन्न करणारं. 

माझ्या या छंदामुळे एकदा एक मजेशीर प्रसंग घडला. फिरायला जायचं माझं एक ठिकाण म्हणजे दादा-दादी उद्यान. एक दिवशी बागेतल्या बाकावर दोघीतिघी गप्पा मारत बसल्या होत्या. त्यातल्या एकीची साडी साधीच पण इतकी सुरेख होती, की माझी नजर न जाईल तरच नवल. पांढरा रंग, त्यावर आकाशी निळ्या रंगाचं नाजूक डिझाईन. किनार, पदर सगळंच छान. जसं काही निळं निरभ्र आकाशच साडीवर उतरलंय. त्यातून ती साडी कॉटनची होती. त्यामुळे तर मी विरघळलेच. मी चालत पुढे गेले, पण पुन्हा मागे खेचले गेले. कारण ती साडी खरंच खूप मोहक, नेत्रसुखद नि आल्हादक होती. 

त्या बाईजवळ गेले म्हटलं, "आपली ओळख नाही. पण मला तुमची साडी खूपच आवडली. राहवलं नाही म्हणून कौतुक करायला आले." मी पुढे जाणार तेवढ्यात मला थांबवत म्हणाल्या, "आवडली ना - मग घेऊन जा...!" आम्ही दोघीही हसलो. 

फिरून परत येईपर्यंत तो बारकासा प्रसंग मी विसरूनही गेले. सात-आठ दिवसांनंतरची गोष्ट असेल. मी परत दादा-दादी उद्यानात फिरत होते. तिथे मला त्या बाई परत भेटल्या. त्यांच्या हातात एक पिशवी होती. म्हणाल्या, "ही घ्या साडी. तुम्हाला आवडली होती ना? मी त्या दिवशीच साडीची घडी मोडली होती. आता ड्रायक्लिनिंग करून आणलीय. मनात काही आणू नका. बहिणीने दिलीय असं समजा." आणि मला काही कळायच्या आत त्या निघूनही गेल्या. 

मी अचंबित. आश्चर्यातून बाहेर येतेय तोपर्यंत ही माझी नवीन बहीण गायब. काय करावं हे सुचेना. साडी नक्कीच ८००/९०० ची असावी. संभ्रमित अवस्थेतच घरी आले. दोन एक दिवसांत जरा मन स्थिर झाल्यावर मी जरा जमिनीवर आले. एका सर्वस्वी अनोळखी बाईकडून आपण इतकी भारी साडी कशी घेतली? आता आपण साडी दिली तर ते वाईट दिसणार! त्यांची भावना दुखावली जाणार. निर्मळ मनाने त्यांनी साडी दिलेली होती - तेव्हा एक सुंदर पर्स घेतली, पिशवीत घातली. बागेत गेल्यावर त्यांना द्यायची असं ठरवलं. बागेत मुद्दाम फिरायला जाऊ लागले. हातात ती पिशवी - फिरायला येणाऱ्या माणसांना काय वाटेल याची फिकीर न करता. पण नशीब रुसलं होतं. त्या बाई भेटल्याच नाहीत. तशाही नियमित येणाऱ्यातल्या त्या नव्हत्याच. पर्स माझ्याकडेच राहिली. त्यांना द्यायची इच्छा अपुरीच राहिली. आता बागेतही जावंसं वाटेना!

'स्वप्नातल्या कळ्यांनो...' अशी माझी भावावस्था झाली. त्या बागेतल्या बहिणीने माझ्या जिवाला वेड लावलं. ते वेड, ती हुरहूर आता संपणार नव्हती. त्याच ऋणात मला राहायचंय. त्यानंतर माझ्याकडे पुष्कळ सुंदर, नवीन डिझाईनच्या साड्या आल्या. पण आकाश पांघरलेली ती साडी नि ती माझी बहीण, मर्मबंधातल्या ठेवीसारखी, मी मनातल्या कप्प्यात जपून ठेवली आहे. 

----अंजली टोणगांवकर 



No comments:

Post a Comment