ऋतू हिरवा - कांचन देशमुख

एखाद्या बलाढ्य वीराला रोखण्यासाठी, पराभूत करण्यासाठी त्याच्याहून अधिक ताकदीचा महावीर समोर असावा लागतो. शस्त्र निकामी करण्यासाठी अधिक प्रभावी शस्त्रच लागतं. परंतु समस्त विश्व स्वतःच्या प्रखर तेजाने अगदी जाळून काढायला निघालेल्या सूर्यनारायणाची उन्हाळ्यातील दाहकता शांत करायला मात्र येत असतो सौम्य, शांत, आल्हाददायक ऋतू, अर्थात पाऊस! समस्त सॄष्टीला हिरवी शाल भेट द्यायला आलेला हा 'ऋतू हिरवा'. या हिरव्या ॠतूला कडक उन्हाळ्यानंतर आणून निसर्ग जणू आपल्याला शिकवू पाहतोय की जशास तसेहा न्याय सर्वच बाबतीत लागू होत नाही. दाहकता कमी करण्यास शीतलताच हवीप्रभावी शीतलता. या हिरव्या ऋतूसारखी.

हिरवा रंग - सृजनाचे, नवनिर्मितीचे प्रती. या आग ओकणाऱ्या उन्हाळ्याने जिवाची काहिली होत असताना, तप्त अशी ही भूमी ही स्वतः तडकत राहते. तिच्या भेगाळलेल्या अंगांगाला आता सृजनाची आस लागलेली असते. बीजाला स्वतःच्या उदरात अंकुरायचं असतं तिला आणि त्यासाठी तही आर्ततेने प्रतिक्षा करत असते या 'हिरव्या ऋतूची' आणि मग सर्वांना अशी आर्ततेने वाट पहायला लावून 'तो' येतो... स्वतःच्या दमदार चालीने तॄप्ती शिंपत, थंडाव्याची पखरण करत... ‘ऋतू हिरवा’.

आपल्या भारत देशात नैऋत्य मोसमी वारे हा हिरवा ऋतू घेऊन साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात अवतरतात. हल्ली तसा उशीरही होतोच, नाही असं नाही. पण जूनचा पहिला आठवडा म्हणजे पावसाचं आगमन हे समीकरण मात्र लहानपणापासून फिट्ट बसलंय डोक्यात. या 'हिरव्या ऋतूशी अनेकानेक लहानपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वारुळातून एक मुंगी बाहेर आली की तिच्या पाठोपाठ असंख्य मुंग्या बाहेरचा रस्ता धरतात, तसंच काहीसं 'हिरवा ऋतू' म्हटलं की होत असतं.

सर्वांत आधी आठवतं ते या 'हिरव्या ॠतूच्या स्वागतासाठी आपलं सज्ज असणं. रेनकोट/छत्री, पावसाळी बूट यांची खरेदी, त्या वेळी 'वॉटरप्रूफ' दप्तरं नव्हती.  मग एक भली-थोरली प्लॅस्टीक बॅग घेऊन तिच्यात वह्या-पुस्तकं भरायची आणि ती बॅग दप्तरात. या सार्या जाम्यानिम्यासह शाळेत जायची उत्सुकताच फार असायची. पावसाचं पाणी साचलेल्या भागातून मुद्दाम 'पचकपचक' करत पाणी उडवत रस्ता तुडवण्यातली मौज त्या वयातच समजते. भले मग आता कितीही आपण याच गोष्टीवरुन आपल्या मुलांना हटकत असू. कधीतरी मात्र या दिवसांत बालसुलभ कंटाळाही यायचाच शाळेत जायचा आणि त्या कंटाळ्याचं पारडं जड व्हायचं, जेव्हा रात्रभर पाऊस कोसळलेला असायचा, जिकडेतिकडे पाणीच पाणी, शाळा भरतेय की नाही याची खात्री नसायची, सुट्टी मिळण्याची आशा करत कसंबसं शाळेत पोचायचं आणि तिथे बोर्ड लावलेला असायचा 'सुट्टी दिल्याचा', त्या क्षणाचा आनंद अगदी अवर्णनीय असा, जग जिंकल्याचा. किती लहान-सहान गोष्टी आपल्याला त्या वयात आनंदी करत होत्या, नाही का?

शाळा भरली असताना कधी असाच अवचित तो पाऊस हजेरी लावायचा आणि मग मनच लागायचं नाही अभ्यासात. राहून राहून नजर वळायची खिडकीबाहेर. अखंड बरसणाऱ्या पावसात नखशिखांत भिजत उभे राहिलेले हिरवेगार वॄक्ष, हिरवाजर्द शालू नेसलेल्या नव्या नवरीगत तजेलदार दिसायचे ते! आजूबाजूची मंदावलेली वर्दळ, खिडकीच्या गजांवर जमलेले पाण्याचे तुषार अलगद हातावर झेलून ते आरस्पानी मोती निरखणं, खाली शाळेच्या कँटीनमधून येत असणारा भूक चाळवणारा खमंग भजी-वड्यांचा दरवळ.... अहाहा! पाऊस म्हटलं की मातीच्या सुवासाइतका चहा, भजी आणि बटाटेवड्यांचा सुवास डोक्याला झिणझिण्या आणतो माझ्या.


या हिरव्या ऋतूचा असा आस्वाद घेत असतानाच र्षं सरली आणि कॉलेजविश्व सुरू झालं. मग तर काय, पावसाला सुरुवात झाली की वर्ग ओस डून कँटीन्समध्ये वेटींग, हसणं-खिदळणं, वडापाव आणि आल्याचा चहा घेत गप्पांच्या मैफिली रंगवणं. हे सगळं म्हणजे या हिरव्या ऋतूने मनाच्या एका अलवार कप्प्यात करुन ठेवलेलं हिरव्याच रंगाचं 'गोंदण' जणू, कधीच पुसलं जाणारं आणि म्हणून कधीच विस्मरणातही जाणारं. आता इतक्या वर्षांनीसुद्धा केवळ 'हिरवा ऋतू' म्हणताच हे हिरवंकंच गोंदणच डोळ्यांसमोर येतं आणि थकल्याभागल्या जिवाला खुसखुशीत टॉनिक देऊन जातं.

यानंतरची र्षं कर्तव्यपूर्तीची, धकाधकीची, धावपळीची. हिरव्या ऋतूचे खुल्या मनाने स्वागत करत त्याला प्रतिसाद देण्याआधी, गाड्या वेळेवर आहेत का, ट्रॅफिकची परिस्थिती यांचीच चाचपणी करत वेळेत ऑफिस गाठण्याचा हा काळ.  असं हे 'प्रॅक्टीकल जीवनजगत असतानाही कधीतरी क्वचित आपल्यात दडलेल्या अल्लड चिमुरड्याला खेचून बाहेर काढतोच हा 'हिरवा ऋतू' आणि मग ठरतात बेत वर्षा सहलीचे,  पावसाळी ट्रेक्सचे आणि त्या निमित्ताने होतात मित्रांच्या भेटीगाठी; हिरव्या ऋतूच्या साक्षीने. तर कधी आपल्याच चिमुरड्यांना,  जोडीदाराला, आई-बाबांनाघेऊन एखादी कौटुंबिक सहल, छोटासा शहराबाहेरचा वीकेंडही एकसुरी आयुष्याला नवी खुमारी देऊन जातो. यांपैकी काहीच नाही जरी जमलं तरी आपल्याच घराच्या गॅलरीतून या हिरव्या ऋतू’चं लोभसवाणं सौंदर्य निरखत, हातात असलेल्या आल्याच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणं हेही एक प्रकारचं स्ट्रेसबस्टरच की.

मात्र या हिरव्या ऋतूचं हे एकच असं लोभसवाणं रुपडं आहे का हो? नाही ना... नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशीच या हिरव्या रंगालाही एक 'ग्रे शेड' आहेच की!!हिरव्या ऋतूच्या या रौद्र रूपाचं तांडवसुद्धा अनुभवलं आहेच की आपण. २६ जुलै २००५ चं मुंबईतलं, ंत्यानंतर चेन्नई, उत्तराखंड इथलं त्या थैमान घालणाऱ्या पावसानंतर कोलमडलेलं जनजीवन आणि त्यातून पुन्हा जिद्दीने उभारी घेणं...  हेही परिचित आहेच आपल्याला.

हे सारं स्वतः अनुभवताना किंवा त्याची दॄश्यं टी.व्ही.वर पहात असताना, असं वाटत होतं की हाच का तीन महिने भाजून काढणाऱ्या उन्हानंतर येता जिवाला तॄप्ती देणारा पाऊस? किती ते आल्हाददायक वाटायचं त्याचं आगमन? तना-मनावर प्रसन्नतेची पखरण करीत, आपल्या मनोराज्यातलं मानाचं स्थान पटकवणारा हा तोच का 'हिरवा ॠतू'? हा तर आता कित्येकांचे जीव घेऊ लागलाय. हे असं त्याचं रू कसं काय आवडणार कुणाला?

पण या रौद्र रूपाचा सारासार विचार करताना, त्यामागच्या कारणांचा उहापोह करताना आपणही मान्य करतोच की आपणच कुठेतरी चुकलेले आहोत. कुठे अतिप्रमाणात केलेलं  बांधकाम, तर कुठे केलेला प्लॅस्टीकचा भरमसाठ वापर, त्याची योग्य विल्हेवाट लावता तुंबवलेले नद्या-नाले, हेच तर कारणीभूत झालेत ना या रौद्र रूपाला?

तर मग आपली जबाबदारी ओळखून आपणच या गोष्टींना आळा घालण्यात पुढाकारही नको का घ्यायलाविघटन करता येण्याजोग्या प्लॅस्टीकचा वापर, त्याचा सुयोग्य पुनर्वापर,  झाडं लावून, वाढवून जमिनीची धूप थांबवणंप्रदूषण कमी करण्यात हातभार लावणं या आणि अशा कित्येक लहानसहान बाबींतून आपण या हिरव्या ऋतू’चं सांद्र रू अबाधित ठेवण्यास मदत रू शकतोच ना?

हा 'ऋतू हिरवा' जसा आपल्याला लहानपणी हवाहवासा वाटत होता तसाच तो आपल्या पुढच्या पिढ्यांनाही वाटायला हवा आणि हे निसर्गचक्र सुनियोजित राहायला हवं, यासाठी आपणही एक पाऊल पुढे टाकू या ना?

ऋतू हिरवा,  ऋतू हिरवा,  
अल्ल्ड हा पाऊस सावळा
निसर्गचक्र सुरळीत करुनी 
वेसण घालू उच्छॄंखल मना
ज्यायोगे हा ऋतू हिरवा,  
भासे जिवाभावाचा साथी सकळा
यथोचित आगमन-निर्गमन त्याचे,  
देई दिलासा बळीराजाला


--- कांचन देशमुख

1 comment: