निसर्गाच्या सहवासात (भाग ५)


झाडे लावण्यासाठी कुंडी वेगवेगळ्या प्रकारांनी कशी भरता येते, झाडे लावायची कशी हे आपण सदराच्या मागील भागात पाहिले. बी पेरल्यानंतर वनस्पतीची होणारी शारिरीक वाढ आपल्याला आता हळूहळू अनुभवास यायला लागते. पहिल्या भागात उल्लेख केलेले हेच ते वाढीचे टप्पे.
सौजन्य : विजय गोखले

बी पेरल्यावर साधारणतः चार-पाच दिवसांत पहिली लहान पाने येतात. मग चार पाने, आठ पाने... वाढत वाढत रोपांची उंची सात-आठ सेन्टीमीटर झाली की जसे लहान मुलांना बोर्नवीटा, होर्लीक्स देतात तसे त्यांना आवश्यक घटक दिले गेले पाहिजेत.  त्यासाठी थोडेसे कंपोस्ट घालावे. पहिल्या पंधरा-वीस दिवसांत मुळांची वाढ भराभर होत असते. लहानपणी पाने कोवळी असतात, त्यामुळे स्वतःचे अन्न स्वतः नाही बनवू शकत. पण तरुण झाली की मग स्वतः अन्न तयार करू लागतात. खूप शाखा, उपशाखा फुटायला लागतात. रोप अंगाने भरायला लागते; म्हणजे खोडाची जाडी वाढायला लागते. मॅच्युरिटी आली की कळ्या येतात, फुले येतात, फळे येतात. जर कलम लावलेले झाड असेल तर मात्र ते मातीत रुळायला वेळ लागतो. एक ते दोन आठवडे लागतात.


प्रत्येक वनस्पतीचे जीवनमान वेगळे असते. उदाहरणार्थ, टोमॅटो, मिरची यांचे तीन महिने ते चार महिने इतके असते.  सर्वसाधारणपणे, बी किंवा कंद पेरल्यापासून चाळीसेक दिवसांत भाजीपाला मिळायला लागतो. अळूचे पीक बारा महिने घेता येते. तर काकडीसारखी फळभाजी दीड महिन्यात येते आणि तीन  महिन्यांपर्यंत भाजी मिळत राहते. मात्र फळभाजीची तीन पिके घेऊन झाली की रोप काढून टाकावे. बारीक तुकडे करून त्याच मातीत मिसळावे आणि मोसमाप्रमाणे नवीन दुसरी फळभाजी लावावी. एखादे फळझाड जर कुंडीत लावले असेल तर एक काळजी घ्यायला लागते. आलेल्या भरमसाठ फुलांपैकी थोडीशीच झाडावर ठेऊन इतर फुले खुडून टाकावीत. कारण अधिक फळांच्या लालसेने फळाचा आकार मात्र खुंटतो.

झाडांची वाढ होत असताना पाण्याची, सूर्यप्रकाशाची त्यांची गरज पुरविली जात आहे ना हे बघावे. झाडांना बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही आहे ना याकडे बारकाईने लक्ष द्यावे. कुंडीत तण उगवले असेल तर वेळीच काढून टाकावे. झाडांना वाढीसाठी लागणारे पोषक घटक पुरवावेत. फॅास्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियम हे झाडांच्या वाढीसाठी लागणारे मुख्य घटक. सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम इ. हे दोन नंबरचे घटक तर आयर्न, झिंक आणि बोरॅान इ. म्हणजे ट्रेस एलिमेंट. बाजारात तयार रासायनिक खते मिळतात. परंतु जैविकदृष्ट्या विघटनशील गोष्टी झाडांना दिल्या तर त्या सोयीस्कर आणि उपयुक्तदेखिल ठरतात. कारण वर उल्लेखिलेले सर्व घटक यात असतात.

झाडांची वाढ होताना त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवले की त्यांना काय हवे आहे ते आपल्याला कळू शकते. उदाहरणार्थ, पाने हिरवी रसरशीत दिसत नाहीत किंवा रोप खुरटलेले वाटले, जुनी पाने आधीच गळायला लागली तर समजावे की नायट्रोजन हवा आहे. निसर्गाने मेथीच्या पानात आणि देठात भरपूर नायट्रोजन दिला आहे. अशा वेळी मेथी चिरून कुंडीत घालायची. समजा, पानावर काळसर डाग दिसले किंवा नवीन पाने वाळायला लागली की झाडाला कॅापर हवे आहे असे समजावे. कारल्याचा कचरा ती उणीव भरून काढतो. कधी कधी पानांची टोके किंवा कडा करपल्यासारख्या दिसतात, फुले-फळे अकाली खुडून पडतात, कधी कधी लाकडासारखी कडक होतात. अशा वेळी केळ्याच्या किंवा पपईच्या सालींचा कचरा घातल्यावर पोटॅशियमची गरज भागविली जाते. पानांची गुंडाळी होते आहे असे वाटले की फ्लॉवरचा कचरा घालायचा म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता जाणवणार नाही. 

निसर्ग इतका शहाणा आहे की आपल्या गरजा तो स्वतःमधूनच भागवतो. झाडांना त्यांचा स्वतःचा कचराच उपयोगी ठरतो. म्हणूनच निर्माल्याची फुले त्या त्या कुंडीतच टाकावी. कांदा, लसूण यांचा कचरा मात्र फळझाडं व फुलझाडं यांना चालत नाही.

कधी कधी झाडांवर बुरशी, अळ्या, कीटक येतात. त्यासाठीची उपाययोजना वेळीच करायला लागते. कडूनिंबाची पाने घालून उकळवून अर्धे केलेल्या पाण्याचा फवारा दर पंधरा दिवसांनी झाडावर मारला तर हा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो. बुरशीनाशक म्हणून शेवग्याच्या पानांची पूड मातीत मिसळावी. साबणाच्या किंवा मिरचीच्या डायल्यूटेड पाण्याचा फवारा मारला तर अळ्या, मुंग्या येत नाहीत. अशा प्रकारे केलेल्या नैसर्गिक उपाययोजनेचा परिणाम जास्त काळ राहतो. बाजारात नीम केक, द्रावण उपलब्ध असते तेही वापरायला हरकत नाही.

निसर्गाच्या सहवासात या सदराच्या आतापर्यंतच्या सर्व भागांमधून जरुरीपुरती आवश्यक प्राथमिक माहिती आपण घेतलेली आहे. निसर्गाच्या जवळ राहण्यासाठी आपल्या बाल्कनीत, गच्चीत, घराबाहेर आपण झाडे लावू शकता. आता जसजसा या बाबतीतला आपला अनुभव वाढत जाईल तसतसे आपण असंख्य प्रयोग आपल्या घरी करू शकता. मग बाहेर उपलब्ध असणारी अमृत मिट्टी वापरणे असो किंवा शेण, गोमूत्र, पिकलेली केळी वापरून घरच्या घरी तयार कलेले अमृत जल असो. इंटरनेटच्या मायाजालावर उपलब्ध असलेली माहिती आपण आपल्या झाडांसाठी alter करून वापरू शकतो. गांडूळ देखिल आपल्या कुंड्यांमध्ये आनंदाने नांदतात आणि भरभराट करतात, म्हणजे मातीचा कस वाढवतात. त्यांचाही सहवास अनुभवा. नाहीतर बाजारात वर्मीकल्चर देखिल उपलब्ध असते. पक्षी, फुलपाखरे या पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. पण कबुतर आणि खारीचे स्वागत मात्र बेतानेच करा. टेरेस गार्डनिंग या विषयात रुची असणारे असंख्य निसर्गप्रेमी ग्रुप facebook तत्सम माध्यमांद्वारे तुम्ही जॅाइन करू शकता. ज्याद्वारे प्रत्येकाच्या विविध अनुभवांचा उपयोग आपण आपल्या झाडांच्या संगोपनात आणि संवर्धनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी करू शकतो. शेवटी ही two way process असते. जेवढे तुम्ही झाडांकरिता कराल तेवढी झाडेसुद्धा आपल्यासाठी करतात. किंबहुना, आपल्याकडून फळाची अपेक्षा न करता झाडे आपले कर्म करत असतात. अशा आनंददायी निसर्गाच्या सहवासात आपणा सर्वांची सर्वांगीण भरभराट होवो हीच सदिच्छा!

--- रुपाली गोखले











इतकी मौलिक आणि उपयोगी माहिती सदररूपाने कट्ट्याला दिल्याबद्दल रुपाली तुझे मित्रमंडळ बेंगळूरू कट्टातर्फे अनेकानेक धन्यवाद.

No comments:

Post a Comment