मुलाखत : 'चारोळी'कार चंद्रशेखर गोखले

 मी माझा ह्या पुस्तकाने आमच्या पिढीला अक्षरशः वेड लावले. सुंदर, सहज, सोप्या तरीही मार्मिक अश्या चारोळ्या आमच्या पिढीने पहिल्यांदाच वाचल्या. चार ओळीत सर्व सांगणे हे कौशल्यपूर्णच ! चारच ओळी, पण स्वत:मध्ये पूर्ण कविता. प्रत्येकाला वाटले की माझ्या मनातलेच आहे हे सगळे. चपखल शब्दात अतिशय मार्मिक पद्धतीने लिहिलेल्या, अगदी सत्य; कधी दाहक सत्य तर कधी अनुभवाचे बोल असलेल्या ह्या चारोळ्यांनी त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. आपल्या सर्वांनाच अतिशय हळवा व गुणी कवी, कथाकार, पटकथाकार मिळाला. सर्वांचे दैवत असलेले पु.ल. देशपांडे, आशा भोसले आणि शांता शेळके ह्या सर्वांनी नावाजलेले, अतिशय गुणी तरीही नम्र (down to earth ) अशा चंद्रशेखर गोखले यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
गोखले सर, तुम्ही मुलाखत द्यायला तयार झाल्याबद्दल तुमचे शतशः आभार! 
८०-९० च्या दशकात कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रत्येक तरुण- तरुणीला, काळ्या पार्श्वभूमीवर असलेले अतिशय राजबिंडा चेहरा असलेल्या युवकाचे मी माझा हे छोटेसे पुस्तक नक्कीच माहीत होते. मी माझा वाचले का? असे प्रत्येकाच्या तोंडी असायचे. त्या वेळेच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलामुलींना आपल्या भावना व्यक्त करायला आणि समोरच्याला इंप्रेस करायला ह्या चारोळ्यांचा खूपच उपयोग झाला. मी तर म्हणेन की कित्येक जोड्या जमवायचे पुण्य तुम्हाला नक्की लागले असणार.
तुमच्या प्रत्येक मुलाखतीची सुरुवात मी माझा कसे सुचले ह्या प्रश्नांनी होत असणार. मलाही हेच विचारायचे आहे की तुम्हाला आपण मी माझा ह्या चारोळी संग्रहातून व्यक्त व्हावे असे का वाटले?
मंजिरी तुझा विश्वास बसणार नाही, पण मला वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी कविता सुचायला लागल्या. त्या वयात धड अक्षरओळख नव्हती, पण त्या अजाणत्या वयातही मला ट ला ट जोडता येत होते. त्याला कारण माझी आई होती. माझी आई माझ्याशी खूप बोलायची. खूप गोष्टी सांगायची. बालपणी सतत आईच्या गप्पा, गाणी, गोष्टी सांगणे, भजन म्हणणे हे चालू असायचे त्याच संस्कारात मी वाढलो. 
माझी आई खूपच बोलकी होती. मी अगदी ममाज बॉय म्हणतात तसा आईच्या पदराला सारखा चिकटलेला असायचो. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर खूप झाले. व्यक्त होण्यात आनंद आहे हे मला नकळत्या वयात कळले होते. त्यामुळे मी खूप लहान असल्यापासून लिहीत आहे. सगळ्यांना वाटते की मी माझामुळे मी एकदम प्रसिद्धीस आलो; पण तसे नाही. मी १०-१२ वर्षांचा असल्यापासून मी लिहितोय. माझी पहिली गोष्ट किशोर मासिकामध्ये छापून आली होती. तेव्हा त्या गोष्टीचे उदंड कौतुक झाले होते. त्या वेळी संपादकांचे पत्र आले होते की  ह्या मुलात मोठ्या लेखकाचे गुण आहेत. मी माझा हा माझ्यासाठी एक टप्पा झाला, पण सुरुवातीपासून मी लिहीतलिहीत आहेच. जे इतरांकडे नाही ते आपल्यात आहे ह्याची जाणीव मला  नकळत्या वयापासून होती.

चारोळी आणि हायकू सारखेच आहेत का? दोन्हीत काय फरक आहे?
हायकू हा जपानी प्रकार आहे. त्याचे नियम खूप कडक आहेत. ३ ओळीत कविता बसली पाहिजे. पहिल्या २ ओळी साध्या असतील तर तिसऱ्या ओळीत अशी चमक पाहिजे की वाहवा आली पाहिजे.
चारोळ्या मला सहज सुचत गेल्या आणि मी त्या लिहीत गेलो. मला सुचलेली पहिली चारोळी
पाण्याचे वागणे
किती विसंगत
पोहणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवते तरंगत
मला स्वतःला माहीत नव्हते की ही कविता ग्रेट आहे. जेव्हा माझ्या बहिणीने माईने वाचली तेव्हा ती म्हणाली, अरे हे काय सुंदर लिहिले आहेस! त्यानंतर मात्र मला सगळे चारोळीत सुचायला लागले. मी कथा आधीपासून लिहीत असलो तरी कविता मात्र चारोळी फॉर्ममध्ये सुचायला लागल्या. तुम्हाला जे सांगायचे आहे ते जर चारोळीत होत असेल तर मग कशाला जास्त लिहायचे, असे वाटायला लागले. चारोळीत कविता बसवायची हा अट्टाहास नव्हता, पण तसेच व्हायला लागले.
आम्ही शाळेत वाचलेल्या कविता ह्या सगळ्या अगदी जड, अलंकारिक भाषेतल्या असायच्या. शिक्षकांची मदत घेतल्याशिवाय त्या काही समजायच्या नाहीत. पण तुमच्या कविता सहज, सोप्या, साध्या, अगदी प्रत्येकाला आपल्याशा वाटतील अशा. शब्द नेहमीचेच, पण अर्थपूर्ण! तुम्ही शब्दप्रभूच आहात.
मी शब्दप्रभू वगैरे काही नाही. ते एक सीक्रेट आहे. माझे स्वतःचे वाचन खूप कमी आहे. त्यामुळे शब्दसंपदा कमी आहे. खरेतर विजय तेंडुलकर, प्रिया, गौतम राजाध्यक्ष, जयवंत दळवी ह्या सगळ्या मोठ्या लोकांच्या जवळ असूनसुद्धा वाचनाची आवड नाही. पण स्वतः विचार करून लिहिण्याची सवय आधीपासूनची.
तुम्ही नक्कीच शब्दप्रभू आहात. शब्द नेहमीचेच आहेत, पण आम्हाला नाही सुचत इतके मार्मिक आणि अर्थपूर्ण. तुमच्याकडे हे उपजतच आहे. तुमची निरीक्षणशक्ती खूप असणार, कारण तुम्ही जे लिहिता ते आम्हाला आपलेच वाटते. माझ्याच भावना आहेत असे वाटते. तुम्हाला सुचतात कशा संवेदनशील चारोळ्या? तुम्ही हळवे आहात का?
मी खरेतर हळवा नाहीय. मी अगदी प्रॅक्टीकल आणि परखड आहे. मी एवढे मात्र पाळतो की माझ्यामुळे कुणाचे नुकसान होऊ नये. माझ्यामुळे कुणी दुःखी होऊ नये. माझी प्रतिक्रिया हळवेपणाकडेच जाते.
खरेतर माझ्या आईनी जपले माझे हळवेपण. लहानपणी मुलांना आई कशी वाढवते ह्यावर खूप अवलंबून असते. लहानपणी आईबरोबर संवाद महत्त्वाचा असतो. माझी आई मला कडेवर घेऊन कळी उमलताना दाखवायची. कळीचे फूल कसे होते ते सांगायची. अशा अनेक छोट्या-छोट्या प्रसंगांतून तिने मला शिकवलेय, तो संवाद खूप महत्त्वाचा होता. निरीक्षणशक्ती महत्त्वाची. त्यामुळे कुठलाही प्रसंग किंवा कल्पना, पटकथेत कशी बसवायची ह्यात माझा हातखंडा आहे.
तुम्ही कथा लिहिता आणि ४ ओळींची कविताही लिहिता. तुम्हाला दोन्हीमध्ये काय आव्हानात्मक वाटते?
मी प्रांजळपणे सांगतो, कविता करणे माझ्या हातात नाही. त्यामुळे त्यावर बडेजाव मी मिरवू शकत नाही. मला वाटते ती परमेश्वराची देणगी आहे मला. साईंची इच्छा आहे मी हे लिहावे, त्यामुळे मला सुचते व मी लिहितो आणि आनंदाने मिरवतो.

असे म्हणतात कि दुःखाचा आणि उत्तम निर्मिताचा (साहित्यातील) अगदी जवळचा संबंध असतो. तुम्ही काय सांगाल ह्याबद्दल?
माझ्या आयुष्यात सगळे निर्णय मी अतिशय प्रॅक्टिकली घेतलेत. आपली माणसे राहिली नाहीत, घर राहिले नाही ही दुःखे नक्की आहेत. प्रेमभंगाच्या मी इतक्या कविता लिहिल्यात. मला अजून प्रेमभंग कसा असतो माहीत नाही. मी खूप उशिरा प्रेमात पडलो, जिच्या प्रेमात पडलो तिच्याशीच लग्न झाले. पण निव्वळ मी अभ्यासात हुशार नाही ह्यासाठी खूप मोठा अन्याय सोसला. सुरुवात मी डावखुरा आहे तिथपासून झाली. माझ्यासाठी ते खूप मोठे दुःख आहे, खेदजनक बाब आहे ही. मला काय-काय जमते ह्यापेक्षा मला काय-काय जमत नाही ह्याबद्दल लोक चर्चा करायचे, भंडावून सोडायचे. मला ह्याचा अतिशय त्रास झाला. मी आताही खूप परखडपणे ह्याबद्दल लिहितो आणि बोलतो; माझ्यावर जसा अन्याय झाला तसा कुठल्याही मुलावर होऊ नये या हेतूने. सगळ्यांना इंजिनियर आणि डॉक्टर मुले हवी असतात. आमच्या पिढीत ७-८ वर्षांच्या मुलीलाही सांगितले जायचे की तुझ्या घरी जा आणि हवे ते कर. मुलाला सांगितले जायचे की तू कमावता हो आणि वाट्टेल ते कर. अरे, स्वतःच्या पायावर उभे राहणे इतके सोपे आहे का? सगळी शक्ती लोकांना समजावण्यात जाते. असा एखादाच पालक असायचा, तुला काय हवे ते कर, अपयश आले तरी मी तुझ्या पाठीशी आहे असे मुलांना म्हणणारा.
आत्ता कार्यक्रमाच्या वेळी काही पालक मला येऊन सांगतात आमच्या मुलाला अभ्यास जमत नाही. पण मुलाने काही केले तरी त्याच्या पाठीशी आम्ही भक्कम उभे राहणार. आमच्या वेळी मात्र पालक भयंकर होते. माझ्या आयुष्यात अभ्यास न करणे हा घटक फार काळ टिकला. हे दुःख माझ्यासाठी खूप मोठे होते. इतर मुले हे निमूटपणे सहन करायची, पण माझे विचार वेळेपेक्षा प्रगल्भ होते कदाचित, मला ह्याचा प्रचंड त्रास झाला. सगळ्यांना एकाच फूटपट्टी वर मोजले जायचे. जसे पालक तशाच शिक्षिका. मी तर गोरागोमटा, ब्राह्मण घरातला आणि अभ्यासात ढ असे विचित्र कॉम्बिनेशन मिळाल्यामुळे ते शिक्षक माझा यथेच्छ समाचार घ्यायचे. मी हे सगळे खूप सोसले.
तुम्ही पुस्तकांच्या जमान्यातले, आता एकदम सोशल ंंमीडिया ह्या भुताने सगळीकडे धुमाकूळ घातलाय. साहित्य कुणालाही, कुठेही, कधीही वाचता येते (ओपन सोर्स). कसा वाटतोय हा मोठा चेंज?
चेंज मोठा आणि चांगला आहे, पण माझे नाव न घालता माझ्या कथा, चारोळ्या आपल्या नावावर खपवतात लोक, ते वाईट आहे. ते कुठेतरी थांबवले पाहिजे. पण तेव्हाही मी माझाच्या लाखोप्रती खपल्या होत्या, आताही लाखोनी प्रती खपतात. त्यामुळे ह्या चेंजचा मला तसा काही फरक पडला नाही. तुम्ही चांगले लिहीत असाल तर ते यश तुम्हाला मिळतेच. फेसबुकने मला उत्तम मित्र-मैत्रिणी दिल्या. प्रत्येक शहरात आता माझे एक घर आहे. तुला एक प्रसंग सांगतो. साताऱ्याला गेलो होतो तेव्हा ३०-४० किलोमीटर आधी गाडी बंद पडली, रात्रीचे ११.३० वाजले होते. मी फक्त हेमंतला फोन केला. १२.३० च्या सुमारास ५-६ कुटुंबे मला भेटायला, काळजी घ्यायला हजर झाली. असे अनेक प्रसंग आहेत. माझे सगळे लहानपण अपयशी म्हणून कोपऱ्यात बसून गेले. पण काय विरोधाभास आहे बघ, आज मला सगळेच इतके भरभरून मिळाले.
तुमच्या बाकी लेखनाबद्दल सांगा.
मी आधी मालिका लेखन करायचो, पण त्यामध्ये अजिबात स्वातंत्र्य नाही. लोक स्वतःला काहीही कळत नसताना काहीही बदल सुचवतात. मला ते अजिबात पटले नाही. हिंदी आणि मराठी दोन्हीकडे हीच अवस्था आहे. त्यामुळे पाहिल्यासारखा उत्साह राहिला नाही. चित्रपट आणि नाटक लेखनाचाही असाच अनुभव आहे. मी आनंदासाठी लेखन करतो आणि तोच मिळत नसेल तर काय अर्थ आहे? स्वतः कर्तबगार असलेल्या माणसाने मला काहीही सांगितले तरी आवडेल, पण पैसा भरपूर आहे आणि बाकी काहीही लायकी नसलेल्या माणसाने मला सूचना केलेल्या आवडत नाहीत. काही बाबतीत मी खूपच परखड आहे. मला दोनदा पुरस्कार मिळणार होता. ज्याच्या हातून मिळणार होता ती व्यक्ती मला मान्य नव्हती, त्यामुळे मी ते पुरस्कार नाकारले.

तुम्ही आणि उमाताई मिळून एक कार्यक्रम करता त्याबद्दल सांगा.
आम्ही हा कार्यक्रम जवळजवळ १० वर्षे करतोय. ३०० च्या वर त्याचे प्रयोग झाले आहेत. कथावाचन, कवितावाचन असते. उमा काही गाणी (गझल, लावण्या, भावगीत) गाते. आम्हाला आलेले अनुभव आम्ही सांगतो, गप्पा मारतो. कार्यक्रमाचा प्रवाह ठरलेला असतो, पण स्क्रिप्ट ठरलेले नसते. आमचे कार्यक्रम सगळ्यात जास्त पुण्यात रंगले.
तुमचे आवडीचे लेखक कोणते?
माझे अतिशय आवडीचे लेखक पु.ल. देशपांडे. अगदी दैवत म्हणायला हरकत नाही. कुठलाही आव न आणता सामान्य माणसाचे अतिशय परखडपणे स्वतःला गृहीत धरून केलेले चित्रण म्हणजे त्यांचे लिखाण. दुर्गा भागवत यांचे पद्धतशीर आणि मुद्देसूद लिखाणही आवडते. जयवंत दळवी, शिरीष कणेकर यांचे लिखाण आवडते. शकुंतला गोगटे यांच्या कादंबऱ्या मला आवडायच्या.

तुमच्या एखाद्या चारोळीने मुलाखतीची सांगता करू या.
शिंपल्यात मोती शोधायचा नसतो
मिळाला तर बघायचा असतो
मला वाटत प्रत्येक क्षण
असा टपोरा जगायचा असतो
असा प्रत्येक क्षण टपोरा आणि समृद्ध जगण्याऱ्या आनंदी, स्वच्छंदी आणि मनाने राजामाणूस असलेल्या गोखले सरांना मित्रमंडळ बंगळुरूतर्फे अनेकानेक शुभेच्छा!! तुमचे भरपूर कथासंग्रह आणि चारोळी संग्रह आम्हाला वाचायला मिळोत ही साईचरणी प्रार्थना!
गोखले सर तुम्ही वेळात वेळ काढून खूप आपुलकीने, मोकळेपणाने गप्पा मारल्यात त्याबद्दल आभार! तुमच्या पुढील वाटचालीकरता मनःपूर्वक शुभेच्छा! रसिकांचे तुमच्यावरील प्रेम उत्तरोत्तर वाढत जावो.

-- मुलाखत आणि शब्दांकन
  मंजिरी विवेक सबनीस









________________________________________________________
कवितासंग्रह
1.    मी माझा (गुजराती, हिंदी आणि इंग्लिश)
2.    मी
3.    पुन्हा मी माझा
4.    मी नवा 
5.    माझ्यापरीने मी
6.    मी माझा २५
कथासंग्रह
1.    मनोगत
2.    मर्म
3.    मोहनमाळ ( नुकताच प्रसिद्ध झालेला कथासंग्रह )
Bookganga वरून तुम्हाला ही पुस्तके ऑर्डर करता येतील.


8 comments:

  1. Very nicely articulated. Great Work Manjiri.
    Thanks Gokhale Sir for such a wonderful informative interview.
    It is really important that parents back their kids in whatever they do

    ReplyDelete
  2. शब्दप्रभू....

    ReplyDelete
  3. मंजिरी, चंगों बरोबरची मुलाखत खूप छान झाली! आपल्याला आयुष्यात अशा काही व्यक्ति अप्रत्यक्षपणे भेटतात आणि आपल्या जगण्याचा आनंद द्विगुणित करून टाकतात जसं पुलंचं लेखन किशोरीताई किंवा भीमसेनजींचं गाणं आणि तशात अशा आवडत्या व्यक्तिमत्वाशी समोरासमोर गप्पा मारायला मिळणं म्हणजे तर काय मी कल्पना करू शकते. मी फार काही वाचलं नव्हतं त्यांचं साहित्य पण आता जरूर वाचीन कारण ही मुलाखत वाचल्यावर मला कळलं कि आयुष्याकडे इतकी प्रॅक्टिकलि बघणारी माणसंच इतक्या कमी शब्दात आयुष्या बद्दल खूप काही सांगून जातात.

    चंगो — "मराठी Twitter चे जनक "म्हणू?
    छान मुलाखत घेतल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन!

    ReplyDelete