अतूट बंधन!


इंट्रो
यंदा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ७५ वी पुण्यतिथी आणि त्यांच्या अलौकिक कन्येच्या, लता दीदींच्या गान कारकिर्दीची पंचाहत्तरी असा दुर्लभ योग जुळून आला आहे. आजच्या पिढीने दीनानाथांना पाहिलेलं नाही. मात्र केवळ गेली ७५ वर्षं अथकपणे त्यांचे स्मृती समारोह साजरे करूनच नव्हे, तर सर्वार्थाने त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवलंय ते प्रामुख्याने दीदींनी व नंतर हृदयनाथजींनी. पुढच्या पिढ्यांसाठी तर त्यांनी एक उत्तम आदर्श घालून दिलाच आहे, पण त्याहीपेक्षा मला मनोज्ञ वाटतं ते लता दीदींनी ज्या तऱ्हेने आपल्या कणाकणात त्यांची स्मृती जपलीय ते पाहणं...  


प्रिय बाबा,
      खरं तर तुम्ही माझे बाबा नाही... मी तुम्हाला पाहिलेलंही नाही. तुमचा काळ पाहिलेला नाही, तुमचं कुबेरालाही हेवा वाटेल असं वैभव आणि त्या नंतरची विपन्नावस्था आणि विरक्तीही पाहिलेली नाही. सुरांचा उत्तम आस्वाद घेता येतो, सूर मला मोहून टाकतात या पलीकडे सुरांचा आणि माझा संबंध नाही... आणि तरीही मी तुम्हाला बाबा असं संबोधते आहे. मला तसंच म्हणावंसं वाटलं. कारण तुमच्याबद्दल तुमच्या जणू गंधर्वच असलेल्या मुलांकडून, विशेषतः लतादीदींकडून इतकं ऐकायला मिळालंय की मी तुम्हाला बघितलेलं नाही असं मला वाटतच नाही  आणि बाबा किंवा पिता ही मला वाटतं कुणी एक व्यक्ती नसते. ती एक चालती बोलती संस्था असते. तो एक संस्कार असतो.जो कायमच तुमच्या सोबत असतो. तुमची पाठराखण करत असतो. त्यात हे पितृत्व जर लोकोत्तर असेल, त्याने स्वतःच्या मुलांबरोबरच अन्य असंख्य मुलांना उभं केलं असेल..त्यात अगदी हरीजनांचीही मुलं असतील तर ते त्या व्यक्तीने जन्म दिलेल्या मुलांपुरतं मर्यादित नसतं. ते सार्वकालिक असतं आणि सर्वांसाठीही असतं. तुम्ही तसे होतात असं मला जाणवतं आहे आणि त्याच बरोबर हेही जाणवतं आहे की तुम्ही शरीराने भलेही ७५ वर्षांपूर्वी या जगातून निघून गेला असलात, तरी तुम्ही तुमच्या सुरांच्या व आठवणींच्या माध्यमातूनच नव्हे तर तुमच्या संस्कारांच्या रूपात व तुमच्या लाडक्या लेकीच्या लताच्या मनात आजही शिल्लक असलेल्या पित्याच्या अतृप्त पोकळीच्या रूपात जिवंतच आहात. ती आजही तुम्हाला शोधतेच आहे. तिच्या कणाकणात, रोमारोमात तुम्हीच वसलेले आहात. आमच्या पिढीने तर तुम्हाला पाहिलं नाही. पण तिने तिचे बाबा समर्थपणे आमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. आणि विशेष म्हणजे हे पोहोचवणं विशेषतः ती व तुमची इतर मुलं गेली ७५ वर्षं एखादा वसा घेतल्याप्रमाणे तुमचे जे पुण्यतिथी समारोह साजरे करतात केवळ त्याच माध्यमातून घडलेलं नाही. तो एक प्रवाह आहे, जो त्यांनी कधी थांबूच दिलेला नाही.
अलीकडेच तुमचा ७५ वा पुण्यतिथी समारंभ पार पडला. पुण्यतिथी कार्यक्रमाला समारंभ म्हणावं की नाही हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. त्यात तुमच्यासारख्या अकाली हे जग सोडून गेलेल्या नटश्रेष्ठाच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला समारंभ म्हणायचे का, ते योग्य दिसेल का असेही विचार मनाला स्पर्शून जातात. पण त्या दिवशीची लता दीदींची आणि हृदयनाथजींची कृतार्थ भावना बघितली, त्यांच्या मनातला आनंद बघितला आणि हा शब्द योग्यच वाटला.
त्या वेळी भाषणात दीदींनी तुमचा पहिला स्मृतिदिन कशा प्रकारे साजरा केला होता ते सांगितलं. त्या मास्टर विनायकांच्या कंपनीत कामाला लागल्या होत्या. मास्टर विनायकांनी त्यांच्या कंपनीतर्फे ‘उसना नवरा’ हे नाटक बसवलं होतं. नेमका तुमच्या पहिल्या स्मृतिदिनाच्याच दिवशी त्याचा पहिला प्रयोग होता. दीदींनी त्यांना विनंती केली की मध्यंतरात आपण माझ्या बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करू या. बाबांच्या फोटोला हार घालू या. मी त्यांची दोन-तीन गाणी गाईन. त्यांनी ते मानलं आणि तुमची पहिली पुण्यतिथी तशी साजरी झाली. प्रख्यात लेखक, गायक, संगीतकार अशा विविध प्रतिभांचे धनी असलेले पु. ल. देशपांडे त्या नाटकाला आलेले होते. त्यांना तुमच्या लाडक्या लेकीचं गाणं खूप आवडलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते घरी आले. लताला म्हणाले, “दीनानाथांच्या सगळ्याच गोष्टी आणल्या आहेस तू...आता मी पण तुला एक गाणं शिकवतो...’’

ही गोष्ट दीदी अनेकदा सांगतात.तुमच्या ७५ व्या स्मृतिसमारंभातही त्यांनी आवर्जून ही गोष्ट सांगितली. त्याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं हे सांगितलं... आज सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’पासून देश-विदेशातले असंख्य मानाचे पुरस्कार तुमच्या या लाडक्या लेकीच्या नावावर जमा आहेत. पण आजही तिला अप्रूप वाटतंय ते पुलंच्या त्या विधानाचं! मला असं वाटतं की त्याचंही कारण हेच असावं की, त्यांनी हे म्हटलं की ‘दीनानाथांच्या सगळ्याच गोष्टी घेऊन आलीयस तू...’ तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ती अशीच आयुष्यभर भरत आली आहे... त्यामुळे पुलंचं हे विधान हा तिच्यासाठी खूप मोठा गौरव आजही आहे!

त्या एकदा सांगत होत्या,“बाबांच्या हयातीत मी ‘खजांची’ चित्रपटातल्या गाण्यांच्या स्पर्धेत भाग घेऊन पहिला नंबर मिळवला. मी त्या स्पर्धेत भाग घेऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. कारण काही कारणाने मी हरले वा मी त्यांची मुलगी असल्याने माझ्या बाबतीत काही भेदभाव झाला, मला मुद्दाम डावललं गेलं तर त्याचा कायमचा ओरखडा माझ्या मनावर उमटेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण मी पाहिलं बक्षिस मिळवून घरी आले आणि त्यांना जो आनंद झाला तो मी कधीच विसरू शकत नाही. पुढे आयुष्यभर मी असंख्य बक्षिसं मिळवली. मानसन्मान मिळवले,पण या‘खजांची’चं मोल दुसऱ्या कशातही होऊ शकत नाही, कारण हे बाबांच्या हयातीत मी मिळवलेलं एकमात्र बक्षिस आहे.
ते कायम सांगायचे की आपले पाय कायम जमिनीवरच असले पाहिजेत. आपण स्वतःला कधी मोठं समजू नये कारण आपल्या पेक्षाही हुशार अशी असंख्य माणसं असतात आणि प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीकडून आपल्याला काही तरी शिकण्यासारखं असतंच... मी तेच आत्मसात करून आजवर चालत आलेय” आणि हे त्यांचं वागणं मीच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच बघितलंय...!
त्यांच्यावर तुम्ही केलेल्या अशा प्रत्येक संस्कारातून तुम्हीच तर डोकावता! 
त्या दिवशी दीदींकडून तुमच्या दुसऱ्या स्मृतिदिनाविषयीही ऐकायला मिळालं. मरीन लाईन्सला भरलेल्या नाट्य संमेलनात तुमची गाणी गाऊन त्यांनी तुमची दुसरी पुण्यतिथी साजरी केली होती.

तुम्हाला त्यांनी गाण्यातूनच वाहिलेल्या आदरांजलीचा त्यांनी आणखी एक किस्साही सांगितला. त्याच वर्षी १९४३ सालीच, मुंबईत आणखी एक नाट्य महोत्सव भरला होता. त्यात विविध नाटकांचे प्रवेश सादर होणार होते. तुमचे पार्टनर कोल्हटकरमामा पण त्यात होते. तिथे तुमची दोन गाणी गाण्यासाठी आयोजकांनी दीदींना आमंत्रित केलं होतं... त्यासाठी दीदी आणि त्यांच्या मावशी इथे तुमच्याच बंधूंकडे आल्या. पण ‘तुला जमणारच नाही, तू माझ्या भावाचं नाक कापशील’ असं ते इतकं बोलले की दीदी खूप रडल्या. चौदाच तर वर्षांचं वय होतं बिचाऱ्यांचं... पण तरीही त्या वयात, वयाला न पेलणाऱ्या धीराने त्या परिस्थितीला सामोरं जायचा प्रयत्न करत होत्या  आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमची स्मृती समाजातही जिवंत ठेवायचा प्रयत्न करत होत्या... त्यांची मावशी काकांना तसं म्हणालीही... पण कदाचित ते समजून घेण्याची त्यांची मन:स्थिती नसावी.
पण दीदी सांगत होत्या की, “रडत रडत मी झोपले आणि बाबा माझ्या स्वप्नात आले...धैर्यधराच्याच रूपात! त्यांनी ‘चंद्रिका ही जणू...’ हे गाणंही म्हटलं... मला खूप बरं वाटलं. मी उठले. मावशीला हे सांगितलं.ती म्हणाली ’खूप छान. बाबांचा तुला आशिर्वाद आहे.उद्या तुझं गाणं चांगलंच होणार.’ ’’
मग दुसऱ्या दिवशी काकूची साडी नेसून मी तयार झाले. तिच्याच बांगड्या घातल्या.पण मी इतकी बारीक होते की त्या सारख्या खाली घरंगळत होत्या. तशीच मी स्टेजवर गेले. माझा नंबर येईपर्यंत  स्टेजच्या मागे अंग चोरून उभी राहिले. काका बोलल्यामुळे मनावर प्रचंड दडपण होतं... शेवटी माझा नंबर आला. मी जाऊन बाबांची दोन नाट्यगीतं म्हटली. त्यातलं एक ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ होतं हे मला आठवतं... ती लोकांना इतकी आवडली की लोकांनी वन्स मोअर तर दिलेच, मला पुन्हा जाऊन आणखी दोन गाणी तर गावी लागलीच.पण ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अप्पा पेंडसे यांनी मला त्या काळी खूप मोठी रक्कम म्हणता येईल असं २५ रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आणि नामवंत अभिनेत्री ललिता पवार यांनी मला कानातले देण्याची घोषणा केली. अत्यंत समाधानाने मी घरी आले. मी माझ्या बाबांचा मान अबाधित राखला होता. काका म्हणत होते तसं त्यांचं नावं कापलं नव्हतं!

त्या नाट्य संमेलनात तर दिवसभर माझ्या गाण्याचीच चर्चा होत राहिली. इतकी की त्याचे आयोजक रात्री घरी आले आणि मला पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन गाण्याची गळ घालू लागले... पण मला आता मुंबईत राहायचंच नव्हतं. मी मावशीला म्हटलं की आत्ताच्या आत्ता, रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला परत जाऊ. काका बोलला ते माझ्या खूप जिव्हारी लागलं होतं.... पण मी सिद्ध केलं की मी बाबांचं गाणं व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांचा मान आणि त्यांची शान कायम राखली.. बाकी मला काहीच नको होतं म्हणून मी त्या च्या त्या रात्री परत गेले. विशेष म्हणजे माझ्या बाबांचं इतकं प्रेम दाखवणारा हा काका आमच्या मदतीला तर त्या काळात आलाच नाही. पण मी सिनेमात काम करते, गाते म्हणून त्याने आमच्याशी संबंध तोडले होते. नानाचौकात आमच्या घराच्या समोर राहत असून तो आमच्याशी कधी बोलला नाही. पुढे माझं नाव झाल्यावर अगदी मरणाच्या दारात असताना तो एकदा बोलला. आमच्या माईने मात्र त्याच्या लग्नात आमच्या घरात तेव्हा उरलेली एकमेव किमती चीज म्हणजे बाबांची हिऱ्याची अंगठी त्याला भेट दिली. तिला बाबांची मान मर्यादा जपायची होती. तिने तेच संस्कार आमच्यावर केले. त्यामुळेच गेली ७५ वर्षं देशभरातल्या मोठमोठ्या कलाकारांना घेऊन आम्ही त्यांचा स्मृतिदिन साजरा करत आलो. आज मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय... ७५ वर्षं हा खूप मोठा काळ आम्ही हे निष्ठेने केलं.बाबांची स्मृती समाज मनातून विरू दिली नाही...’’
हा खरंच तुमचा खूप अलौकिक सन्मान आहे. पुढच्या पिढ्यांना तुमच्या  मुलांनी घालून दिलेला आदर्श आहे.

मात्र मला यापेक्षाही खूप खूप मोलाचं वाटतं ते दीदींचं तुमची स्मृती जपणं... त्यांनाच तुमचा सहवास सगळ्यात  जास्त मिळाला... तुमच्याकडून शिकण्याचं भाग्य मिळालं. त्यांनाच त्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त आठवताय... तुमची नाटकं, तुमचं गाणं, तुमचा शिकण्याचा ध्यास, तुमची ज्योतिष विद्या, तुमचं घरातलं रूप, मुलांमध्ये मूल होऊन रमणं, कधीही न ओरडणं पण शिस्त लावण्याच्या बाबतीत,रियाझाच्या, सुरांच्या सच्चेपणाच्या बाबतीत कर्तव्यकठोर असणं...या सगळ्याबद्दल त्या कायमच भरभरून बोलतात.... पण त्या पलीकडेही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी मनोमन जपल्यायत... किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर त्यातही त्या तुम्हालाच शोधतायत...
एकदा त्या सांगत होत्या, “बाबा सतत ‘भगवद्गीता' आणि ‘गीता विजय’  हे ग्रंथ वाचत असायचे. त्यांचं संस्कृत फार छान होतं. रात्री नाटकावरून आले, जेवण वगैरे झालं की हे ग्रंथ वाचायला बसायचे. त्यासाठी आम्हालाही उठवून ठेवायचे आणि हे ग्रंथ वाचताना अक्षरशः रडायला लागायचे.’’
एकदा तर म्हणे तुमच्याकडे एक तुंबडी लावणारा आला होता. तुमच्या सांगण्यावरून तो गाणं म्हणायला लागला.
             एक डोंगरावरी झाड
             वर मुळ्या,खाली पानं...
हे ऐकताना तुम्ही रडायलाच लागलात... कारण तुम्हाला अत्यंत प्रिय असलेल्या गीतेतल्या पंधराव्या अध्यायातला ‘ऊर्ध्वमूलमधःशाखं...’ हा श्लोकच तो म्हणत होता... त्याला तुम्ही त्या काळातली घसघशीत अशी १० रुपयांची बिदागीही दिलीत आणि आग्रहाने खाऊही घातलंत...

हे अतिशय कौतुकाने सांगणाऱ्या दीदींनी पुढे अगदी आवर्जून गीता रेकॉर्ड केली, त्या संस्कृत शिकल्या हाही तुमच्या पावलावर पाऊल टाकण्याचाच नव्हे तर तुम्हाला अशा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून शोधण्याचा प्रयत्नच होता. नाही का ?
मराठी नाट्य संगीतात तुम्ही पंजाबी ढंग आणलात...आणि दीदींचा सगळ्यात आवडता राग पहाडी आहे...हाही मला नाही वाटत  निव्वळ योगायोग आहे!
तुम्ही शंकर महाराजांचे भक्त होता, किंवा अधिक नेमकं सांगायचं तर शंकर महाराजांचा तुमच्यावर वरदहस्त होता... तर दीदी जेव्हा जेव्हा पुणे मार्गे कोल्हापूरला जात तेव्हा तेव्हा त्या पुण्यात सातारा रोडवर असलेल्या शंकर महाराजांच्या मठात, त्यांच्या त्या पावन समाधीस्थळी आवर्जून जाऊन बसत. ‘तिथे गेल्यावर मला खूप शांत वाटतं’ असं त्या सांगत होत्या. शंकर महाराजांचे आणि तुमचे काही किस्सेही त्यांच्या मनात आजही अगदी कालपरवा घडल्यासारखे ताजे आहेत.
त्या सांगत होत्या, “एकदा शंकर महाराजांना बाबांचं गाणं खूप आवडलं. अगदी प्रसन्न होऊन ते बाबांना म्हणाले की तुला कोणत फूल आवडतं? –बाबा म्हणाले मोगरा.त्या बरोबर  शंकर महाराजांनी तिथला रिकामा कलश उचलला आणि उपडा केला तरमोगऱ्याच्या फुलांची रासच्या रास खाली पडली आणि सारा आसमंत त्या सुवासाने भरून गेला.’’

संत ज्ञानेश्वरांची जी गाणी दीदींनी गाऊन अजरामर केलीयत त्यातलं त्यांचं स्वतःचं सर्वात आवडतं गाणं ‘मोगरा फुलला’ हे आहे हाही निव्वळ योगायोगच असेल का? का तुमची ही आवड त्यापाठी असेल?
त्यांना एकूणच जी गाणी आवडतात त्यातही अदृश्य रूपात तुम्ही असता,ती कुठे तरी तुमची गाणी असतात म्हणून ती आवडतात, असं माझ्या लक्षात आलं आहे.
आता हेच बघा ना... मीराबाईची त्यांनी जी गाणी केली आहेत ती सगळीच छान आहेत,पण हृदयनाथजींनीच  केलेल्या ‘मीरा सूर कबीरा’ या अल्बममधलं ‘दीनानाथ अब बारी तुम्हारी’ हे गाणं त्यांना जास्त आवडतं. त्या सांगत होत्या, “या अल्बममधल्या सगळ्याच चाली छान आहेत. पण यात आमच्या बाबांचं नाव आहे. त्यामुळे मला ते जास्त आवडतं.”

तसंच ‘लेकीन’ चित्रपटातलं ‘यारा सिली सिली’ हे गाणं खूप गाजलं. पण त्यांना आवडतं ते त्याच सिनेमातलं ‘सुनियो जी अरज म्हारियो बाबुल हमार...’ हे गाणं.
त्या एकदा या सिनेमाबद्दल, त्यातल्या गाण्यांबद्दल  बोलताना सांगत होत्या, “मला हे गाणं आवडतं, कारण एक तर गुलझारजींचे शब्द फार सुरेख आहेत आणि दुसरं म्हणजे हृदयनाथने त्याची चाल फार सुरेख बांधलीय. ती मूळ बाबांची बंदिश आहे, ती त्याने जरा बदललीय. त्यातली सरगम मात्र त्याने स्वतः बांधलीय.”
मुलींनी साधं राहावं, मेकअप करू नये यावर तुमचा कटाक्ष होता... आयुष्यभर चंदेरी दुनियेत वावरूनही दीदी व तुमची सगळीच मुलं खूप साधी राहिली, तुमचा संगीताचा वसा निष्ठेने चालवत राहिली, हृदयनाथजींनी तर तुमच्या चीजा, बंदिशी, तुमचं संगीत अतिशय प्रगल्भपणे पुढे नेलं. यामागेही माई व दीदींनी जपून ठेवलेला तुमचा स्मृतिगंधच  तर आहे!

तुमचा दिलदारपणा, तुमची शिवभक्ती, तुमची राष्ट्रभक्ती हेही दीदींनी तसंच तर पुढे नेलंय... त्या त्यांच्या कृतीतूनही तुम्हीच तर दिसता...अलौकिक गंधार गळ्यात घेऊन जन्माला आलेली ही तुमची लाडकी लेक फाळणीच्या यातना सहन न होऊन हिंदू महासभेत कार्यकर्ता म्हणून दाखल व्हायला निघाली होती, त्या मागेही तुमचाच संस्कार तर होता... कदाचित तुम्ही त्या वेळी असता तर तुम्हीही हेच केलं असतं... मग तुम्ही गेला आहात कुठे?

मला सतत हेच जाणवतं... की दीदीनी त्यांच्या श्वासाश्वासात, रोमारोमात तुम्हाला जपलंय....तुम्ही शरीराने गेला असाल... पण आमच्यासारख्या पुढच्या सगळ्याच पिढ्यांसाठी त्यांनी तुम्हाला निष्ठेनं जिवंत ठेवलंय... ही मानवंदना खरंच खूप दुर्लभ आणि मोठी आहे... त्यामुळेच मी तुम्हाला पाहिलं नाही पण ती खंत मला जाणवतच नाही......तुम्हाला मी बाबा म्हणून संबोधायचं धाडस केलं किंवा करू शकले ते त्याच मुळे....
वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं... त्यांनी तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलं...पण त्या मात्र क्षणाक्षणाला... कणाकणात तुम्हालाच शोधतायत.... ७५ वर्षं झाली तरीही....अखंड...अथक! त्यांच्या मनातली ती पोकळी आजही तशीच आहे आणि त्या कितीही पोक्त झाल्या..त्यांनी कितीही कर्तृत्व गाजवलं, त्या कितीही कणखरपणे सगळ्या समस्यांना तोंड देत उभ्या राहिल्या तरीही तुम्ही गेलात त्या वेळी त्यांच्यात गोठून गेलेली ती १२ वर्षांची छोटी मुलगीही तशीच आहे... आजही!

  जयश्री देसाई





No comments:

Post a Comment