मृद्गंध - उत्तरा ठोसर


सुगंधणाऱ्या मातीला म्हटलं,
एवढा कसला गं आनंद साजरा करतेस पाऊस भेटल्याचा?
तो तर मतलबी, तुझ्या कुशीत शिरावंस वाटलं तरच पडतो.
इतरवेळी ढगात दडी मारून बसतो.
तुझ्या जीवाची तगमगतुझं तडकणं,
तुझी लाहीलाही, त्याला कशी दिसत नाही ?
ती शमवण्यासाठी तो का बरं येत नाही?
त्याच्या स्पर्शासाठी भेगाळलेली, आसुसलेली तू..
त्याच्या चार थेंबांच्या शिडकाव्यानेही गंधून जातेस,
त्याच्या वळवाच्या सरीवर तू जीव ओवाळून टाकतेस .

तशी गंधाळून म्हणाली,
अगं, आपल्या स्त्रियांचा जन्मच असतो तरसण्यासाठी..
त्याने कधीही यावंकधीही जावं..
विश्वास फक्त द्यावा त्याला,
आपण आहोत त्याच्याचसाठी.

तेंव्हा, मात्र मी थक्क झाले !
म्हटलं, काय ही सहनशीलता!
न् आता, मी स्वतः ही अशीच झुरतीये.
त्याच्या एका कटाक्षाने ही मोहरून उठतीये.


--- उत्तरा ठोसर

No comments:

Post a Comment