वळिवाची सर - विनया रायदुर्ग

मे महिन्याचे रणरणते ऊन, दुपारची चार-साडेचार वेळ.
तरीही अंगाची काहिली होत असते. पक्षी, जनावरे, माणसे सर्वच आडोशाच्या शोधात असतात. मागचे २-३ महिने उन्हात सगळेच होरपळून गेलेले असतात. एवढ्यात कुठूनसे आभाळ भरून येते.  आडोशाला निवांत बसलेल्या पक्ष्यांचा चिवचिवाट सुरूसुरू होतो. अचानक गार वारा सुटतो आणि आभाळाची माया थेंबाथेंबातून बरसू लागते. 

क्षणार्धात चित्र बदलते.  उन्हाच्या तप्त किरणांची जागा आता बोचऱ्या थंड वाऱ्यांनी घेतलेली असते.  आता आकाशातून गारादेखील पडू लागलेल्या असतात. घरांच्या कौलांवर, त्र्यांवर गारांचे एक लयबद्ध संगीत सुरू होते. रस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्यांची तारांबळ उडते. लहान मुले आणि मनात लहान मूल जपलेली मोठी मंडळी गारा वेचायला धावतात. गारांचा मार पाठीवर पडतो, तरीही मुले गारा वेचायचे सोडत नाहीत. अकस्मात आलेल्या पावसाच्या सुखद स्पर्शाने उन्हात होरपळलेली धरतीदेखील मोहरून उठते. तिच्या मातीत पडलेल्या भेगा आता त्या अमृतधारांनी भरू लागलेल्या असतात. त्या प्रेमाच्या ओलाव्याचा गंध हवेत भरतो. हा अद्वितीय गंध महागड्या अत्तरापेक्षादेखील मोहक असतो.


पुढचा अर्धापाऊण तास गारांचे हे लयबद्ध नृत्य चालू राहते. कोणी पावसात चिंब भिजून गारांचा आनंद लुटतात, तर कोणी गारांच्या माराच्या भीतीने आडोसा शोधतात. कोणी मोबाईलवर त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करतात. ज्याची त्याची पद्धत न्यारी. पण कोणीही निसर्गाच्या त्या जादूची दखल घेतल्यावाचून राहत नाही.

थोड्याच वेळात ती वळिवाची सर थांबते. जितक्या अचानकपणे येते तितक्याच अचानकपणे निघूनही जाते. हातात वेचलेल्या गारांचे आता थंड पाणी झालेले असते. आकाश पुन्हा एकदा निरभ्र होते आणि सृष्टीचे अजून एक मनोहारी दृश्य इंद्रधनुष्याच्या रूपाने समोर येते. एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे असलेले पण तरीही एकमेकात आकर्षकपणे मिसळलेले ते रंग आणि त्यांची कमनीय कमान. ..  केवळ वर्णनातीत सौंदर्य. 

निसर्गाच्या अनेक सुंदर रंगकृतींपैकी एक अद्वितीय रंगाकृती... इंद्रधनुष्य... तेही फार काळ टिकत नाही.  पुन्हा सारे पूर्वत होते, पण आता सृष्टीत नवचैतन्य  संचारलेले असते.  उन्हाची मरगळ जाऊन झाडेपाने टवटवीत झालेली असतात.

निसर्गाचा हा खेळ आपल्याला उल्हसित करून जातो.  अचानक पडलेल्या गारा आपण वेचतो.  थोड्या वेळानी त्याचे पाणी होणार हे माहीत असले तरी...  असे आयुष्यात कधी कधी अचानक येणारे आनंदाचे क्षण आपण वेचायला शिकले पाहिजे.  तो आनंद अल्पायुषी असला तरी त्याची आठवण दीर्घ काळ मनाला प्रफुल्लित करते.

असा हा वळिवाचा पाऊस नव्हे पावसाची एक सर मला एखाद्या जिवलग मैत्रिणीसारखी वाटते.  आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कधी निराशेचे दुःखाचे क्षण येतात.  ते मनाला क्लेश देतात.  मन नकारात्मक विचारांनी ग्रासलेले असते. अशा वेळी अचानक एखादी जुनी मैत्रीण भेटावी... तिला न सांगताच मनातले कळावे आणि तिने तिच्या प्रेमळ बोलांनी मन टवटवीत प्रसन्न करावे... जशी ती वळवाची सर तापलेल्या धरतीला तृप्त करते तशी.  आणि अशा वेळी त्या घट्ट मैत्रीच्या नात्याचा सुगंध अनुभवावा... अगदी ओल्या मातीसारखा!

--- विनया रायदुर्ग

No comments:

Post a Comment