कथा - ठेव

प्रस्तावना          
  
  रेल्वे या गोष्टचे  लहानपणी पासून सगळ्यांनाच कुतूहल असते. लहानमुलांना झुकझुक गाडी वाफ उडवत जाताना दिसली तर त्यांचा चेहरा प्रसन्न होतो.  सगळ्यांनाच रेल्वेचा कुठला ना कुठला प्रवास नेहमी आठवत असतो. रेल्वे स्टेशनवर जमणारे प्रवासी एकाच दिशेला जात असले तरी त्यांचे स्वभाव वेगळे असतात. प्रवासामुळे त्यांना एकमेकांचा सहवास घडतो किंवा इच्छा नसताना हि त्यांना एकमेकांचे सहयात्री बनावे लागते. त्यानून कधी संघर्ष निर्माण होतात तर कधी संकट. कधी मजेदार प्रसंग येतो तर कधी भीतीदायक.
 असलेच काही प्रसंग आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. तर करायची लोहमार्गी कथांना सुरुवात. गोष्टी ज्या  ट्रेन मध्ये सापडल्या.

सगळ्या गोष्टी आणि पात्र लेखकाच्या कल्पनेवर आधारीत आहेत. कुठल्या हि जीवित किंवा मृत पात्राशी साम्य  वाटल्यास तो एक योगायोग समजावा.

ठेव 

माझे नाव गणोबा, वय ५५ वर्षे. मी वलसाडच्या रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन चालवतो. चालवतो म्हणजे सगळा कारभार बघतो. यात मी कित्येक प्रसंगं, भानगडी, किस्से आणि भांडणं बधितली आहेत. त्यातल्या काही आठवणीत कायमच्या मनात राहिल्या. त्यातलीच एक हकीकत इथे सांगतो आहे.
पाच वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. एक दिवशी सकाळी मी कॅन्टीनमध्ये एकटाच होतो. कुठल्या हि गाडीची वेळ नसल्याने कॅन्टीन रिकामेच होते. आमचे स्टेशन मास्टर कुलकर्णी माझ्या जवळ येऊन बसले. कुलकर्णी साहेब प्रामाणिक, कुटुंब वत्सल, सरळ मार्गाने चालणारे होते. बेताची उंची, थोडेशे स्थूल, स्टेशन मास्टर जरी असले तरी त्यांची मूर्ती कुठल्याही रिटायरमेंट जवळ आलेल्या कारकुनाला शोभेल अशी होती. प्रामाणिक किंव्हा कर्तव्यनिष्ठ लोकांचे दोन प्रकार असतात. पहिले थोडेशे भडकू, जास्त ना बोलणारे आणि एकदम कडक असतात. अशा लोकांच्या वाटेला फारसं कोणी जात नाही. दुसरे मनमिळाऊ, गरीब, कुणाच्या अध्यात ना मध्यात, हसरे असतात. कुलकर्णी साहेब दुसऱ्या प्रकारचे प्रामाणिक होते. स्वतःचा डबा घरून आणणारे आणि कॅन्टीनचा १ चहा पण फुकटात ना पिणारे. आज साहेब जरा थोडे अस्वस्थं दिसत होते.
मी चहा मागवला आणि त्यांना सांगितले कि या चहाचे पैसे मी घेणार नाही कारण हा चहा कॅन्टीनचा नसून माझ्या तर्फे आहे.

नेहमी खळखळून हसणारे कुलकर्णी फक्त स्मित करून परत आपल्या विचारात गेले.

मग मी सरळ सरळ विचारले "काय साहेब तब्बेत बरी नाही का ?"

"गणोबा तुझ्या बरोबर कधी असं झालं आहे कि तुला कोणी आपली वस्तू सांभाळायला दिली आणि त्यामुळे तुला नाकी नऊ आले ? " साहेबांनी मलाच उलट प्रश्न केला.

"प्रत्यक्ष माझ्या बरोबर तर नाही पण मागे एकदा बिहारमधून एक स्टेशन मास्टर कुमार साहेब सेमिनार साठी आले होते त्यांनी मला बिहार मध्ये घडलेली अशी एक हकीकत सांगितली होती." मी सांगितलं.

"मग सांग बघू काय सांगितलं होत कुमार साहेबांनी, माझं आपण नंतर बघू."

"दोन वर्षांपूर्वी मला कुमार साहेबांनी हा किस्सा सांगितला, म्हणजे काही दहा वर्षांपूर्वींची गोष्टं असेल. तेंव्हा ते बिहारच्या चंदनगढ स्टेशनावर स्टेशन मास्टर होते" मी सांगायला सुरुवात केली.

"आडगावच स्टेशन, स्टाफ सुद्धा जेमतेमंच. काही मोजक्या गाड्या तेथे थांबायच्या. जवळंच मोठं स्टेशन पाटणा असल्याने २-३ पाटणा पेसेंजर गाड्या चालायच्या. त्या काळी चंदनगढ आणि जवळच्या गावात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. गावात सगळं लुटून झाल्यावर दरोडेखोर आता ट्रेन प्रवाशांची लुटालूट करायला लागले होते. रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म वर सुद्धा धावा बोल करून यायचे आणि प्रवाशांना लुटायचे. रेल्वे आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र ते त्रास देत नसत आणि कर्मचारी पण दरोडेखोरांकडे काना डोळा करायचे. बहुतेक त्यांचा हा एक मूक करारच होता.

एका रात्री कुमार साहेब आपले काम संपवून घरी निघाले होते.  प्लॅटफॉर्मवरच एका गरीब दिसणाऱ्या माणसाने त्यांना थांबवले आणि माझी मदद करा अशी विनंती करू लागला. तो मनुष्य उत्तरप्रदेशच्या लखनौचा राहणारा असून पाटण्याला जात होता. त्याला वाराणसीला गाडी बदलायची होती पण पहिली गाडी उशिरा आल्याने त्याची गाडी चुकली होती. तो कसाबसा बस ने धडपडत चंदनगढ पर्यंत आला होता आणि दुसरा दिवशीच्या पेसेंजर ने पाटण्याला निघणार होता.

"साहेब मला रात्र या गावात काढायची आहे, बहुतेक मी प्लॅटफॉर्मवरच असेन पण इथे दरोडेखोरांचा त्रास आहे आणि माझ्या जवळ दहा हजार रुपये आहेत, ते ही माझे नाही, माझ्या मालकाने त्याच्या मुलाला पाटण्याला माझ्या मार्फत पाठवलेले आहेत. हे पैसे लुटले गेले तर मालक माझं काही ऐकणार नाही मला नोकरीवरून काढून टाकेल. मी एक गरीब कारकून आहे. माझी मदद करा. आज रात्री पुरते हे पैसे आपल्या जवळ ठेवा. सकाळी पाटणा पेसेंजर सुटण्याआधी मी तुमच्या कडून परत घेईन." तो मनुष्य विनवून म्हणाला.

कुमार साहेब विचारात पडले.

'हा मनुष्य तर खरंच गरीब वाटतो, मला त्याची मदद करायला हवी का? पण स्टेशन मास्टर प्रवाशांच्या  मौल्यवान वस्तूंची जवाबदार कशी घेऊ शकतो. आज हा आला आहे उद्या सगळे येतील.'

"तुम्ही रेल्वे पोलीसांकडे का जात नाही ?" कुमार साहेबांनी सुचवले.

"साहेब पोलीसांचा धाक असता तर दरोडेखोर इतके माजले असते कामाफ करा साहेब पण मला पोलीसांवर  विश्वास नाही. त्यांना माझ्या जवळ पैसे आहे कळलं तर तेच दरोडेखोरांना बोलवतील.  मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझी मदद करा. " तो काकुळतीने म्हणाला.

कुमार साहेबांचा मनात विचारांनी थैमान घातले

'मी या माणसाची मदद का करावी? माणुसकी म्हणून? शरणागताची मदद करा असं शास्त्र सांगते म्हणून? पण ये काही रामराज्य नव्हे, मला व्यावहारिक पातळी वर विचार करायला हवा. जर दरोडेखोरांना ये कळलं तर? आमचा मूक करारच मी मोडला आहे म्हणून माझ्यावरच ते उलटले तर? माझ्या मुलांचे, बायकोचे संरक्षण मला आधी बघायला हवे. या माणसाने दुसऱ्याची मोलाची वस्तू आपल्या जवळ ठेवण्याची चूक केली आहे, पण ती चूक मी करणार नाही.'

"अहो पण माझी तब्बेत बरी नाही, मी उद्या स्टेशन वर येऊ नाही शकलो तर तुमचे पैसे अडकून राहतील. एवढं घाबरू नका. परिस्थिती एवढी वाईट नाही. कशावरून आज दरोडेखोर येतीलच, आणि आलेच तर तुम्ही  स्वच्छतागृहात किंवा स्टॉलच्या मागे कुठे तरी लपा. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सहजच कुठे तरी लपू शकता."  अशी सांत्वना देत कुमार साहेब आपल्या घरी गेले.

सकाळी कुमार साहेब प्लॅटफॉर्मवर आले तर त्यांना कळले कि रात्री ३ वाजला दरोडा पडला. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली गाडी, प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूम च्या सगळ्या प्रवाशांना लुटले गेले. काही लोकांना मारहाण हि करण्यात आली होती. कुमार साहेबांच्या पोटात गोळा आला.

'अरेरे बिचार्याला मार पडला, पैसे हि गेले आणि आता नोकरी पण जाईल'.

त्यांचे कामात मन लागे ना. पाटणा पेसेंजर सुटण्यात होती आणि कुमार साहेबांना गार्डशी काहीतरी बोलायचे  होते म्हणून ते प्लॅटफॉर्म वरून गार्डच्या डब्याकडे चालायला लागले. मग त्यांच्या डोक्यात आले कि तो मनुष्य याच गाडीत बसला असेल. ते त्या माणसाचा डोळा चुकवत, गाडी कडे न बघता चालायला लागले. पण आपलं मन चंचल असतं  जिथे बघायचे नाही अस ठरवलं  तर नेमकं तिथेच बघायला लावतं . कुमारांना एका खिडकीत तो मनुष्य बसलेला दिसला. नजर चुकवून जाणार तेव्हड्यात त्याच माणसांनी यांना नमस्कार केला. त्यांनी घाबरत घाबरत त्या माणसाकडे बघितले.  तो मनुष्य अनपेक्षितपणे स्मित करत होता. कुमारांनी काही विचारायच्या आधीच तो म्हणाला "साहेब माझे पैसे वाचले".

आश्चर्याने त्या माणसा कडे बघत कुमार म्हणाले "कसे काय? मी ऐकलं कि सगळे प्रवासी लुटले गेले".

"हो मी हि लुटला गेलो मला मारलंसुद्धा, पण माझे पैसे वाचले. तुम्ही धीर दिल्यावर मी बिनधास्त प्लॅटफॉर्मच्या बाकावर झोपलो होतो. राती एक ट्रेन येऊन उभी राहिली, आणि काही वेळाने गाडीमधून आरडा ओरडा ऐकू यायला लागला. मी लगेच ओळखले कि दरोडा घातला जात आहे. मी उठलो आणि प्लॅटफॉर्मच्या दारातुन बाहेर पळून जाणार होतो. पण मग विचार केला कि आपण दरोडेखोर असतो आणि दरोडा घातला असता तर २ मनुष्य दाराशीच बसवली असती पळून जाणाऱ्या लोकांना लुटायला. म्हणून पळून जायेचा बेत रहित केला आणि तुम्ही सुचवल्या प्रमाणे स्वच्छतागृहात आलो. तिथे ५-६ लोकं आधीच जमली होती, बहुतेक गाडी मधून पळून आलेली. परत दरोडेखोरांच्या दृष्टीने विचार केला तर लोकं  स्वच्छतागृहात असतील ये त्यांना माहित असणं सोपं आहे हा काही त्यांचा पहिला दरोडा नव्हे.  म्हणजे तिथे पण भी सुरक्षित नव्हतो.  तिथे फक्त विचार करायला थोडा वेळ मिळू शकणार होता. मग मी लपून राहण्या किंवा पळून जाण्यापेक्षा संकटाला सामोरं जावे असे  ठरवले. माझ्याकडे चामड्याची पिशवी होती पाणी भरायची. आपल्या जवळच्या नोटा काढल्या त्यांची सुरळी  केली त्यावर २-३ पॉलीथिन चा पिशव्या घातल्या आणि त्यांवर रबर बँड लावून त्यांना बंद केले. मग ती सुरळी चामड्याच्या पिशवीत घातली आणि स्वच्छतागृहाच्या बाहेर आलो. लांबून मला १-२ दरोडेखोर माझ्या कडे येतांना दिसले. मी त्यांच्याकडे पाहिलेच नाही आणि आळस देत हळू हळू नळाकडे आलो. उद्देश्य होता कि दरोडेखोरांना वाटावं कि मी आत्ताच झोपेतून उठलो आहे आणि मला लुटी बद्दल काहीच माहित नाही . नळावर पटकन थोडं  पाणी प्यालो आणि मग ती चामड्याची पिशवी नळाखाली धरून पाणी भरायला लागलो.   दरोडेखोर तोवर माझ्या जवळ आले  होते त्यातल्या एकाने माझी माझी कॉलर धरली आणि दुसऱ्याने मला थोबाडीत मारली.  मार पडताच मी पाण्याची पिशवी सोडली आणि जवळची बॅग घट्टं धरायला लागलो. हे बघून त्यांनी माझी बॅग हातातून घेतली आणि त्यातले ४०-५० रुपये काढून घेतले. दुसऱ्याने माझ्या खिसा तपासाला त्यातले  २०-३० रुपये घेतले, माझे कपडे फाडले आणि मला अजून एक थोबाडीत लावून ते पुढे गेले. मी तिथे त्याच अवस्थेत रडत पडला राहिलो म्हणून मागून येणाऱ्या दरोडेखोरांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने पोलीस आले आणि सगळे दरोडेखोर पळून गेले. मी शांतपणे माझ्या पिशवीतून सगळे पैसे काढले. ओले सुद्धा झाले नव्हते. नंतर कळलं कि दरोडेखोरांने स्वच्छतागृहात लपलेल्या लोकांना मारहाण केली आणि सगळं स्वच्छतागृह धुंडाळून ते त्यात लपवलेले पाकीटं, चेना, घड्याळी सगळं घेऊन गेले".

"तुम्ही बॅग सांभाळून चामड्याची पिशवी सोडून दिली हे तर फार छान केलं, म्हणून त्यांचं लक्ष पिशवीकडे गेलंच नाही. पण एक गोष्ट समजली नाही, तुम्ही तुमच्या जवळचे सगळे पैसे पिशवीत का नाही लपवले मग तुमचे काहीच नुकसान झाले नसते"

"साहेब, कोणी मनुष्य प्रवासाला निघाला आणि त्याच्याकडे १ रुपया पण सापडणार नाही हे कसं शक्य आहे? दरोडेखोरांनी मला गुरासारखं बडवून मला विचारले असते कि पैसे कुठे लपवले म्हणून. किंवा त्यांचे लक्ष पिशवी कडे सुद्धा गेले असते "

हे ऐकून थोडं हसून कुमार साहेब गार्डच्या डब्या कडे निघून गेले. "

"गणोबा छान गोष्ट सांगितली. आपल्या कडे बुद्धी असते पण विरोधीपक्षाच्या शक्तीच्या भीतीने आपण त्याचा वापर करायला धजत नाही"  कुलकर्णी साहेब जे इतक्या वेळ लक्षपूर्वक ऐकत होते म्हणाले.

"बरं साहेब माझी गोष्ट तर झाली आता तुमची काय हकीकत आहे ती सांगा."  मी उत्सुकतेने विचारले.

"माझी हकीकत म्हटलं तर थोडी विचित्रंच आहे, तुझ्या जवळ वेळ असेल तर सुरुवाती पासून सांगतो"  कुलकर्णी साहेब म्हणाले.

"जरूर सांगा, आणि त्या आधी मी आणखी एक चहा मागवतो".

"पाच दिवसांपूर्वी मी १२६५ अप ची वाट बघत होतो. केबिन मधून सिग्नल मिळून गाडी १ नंबर वर येत होती. ASM (असिस्टंट स्टेशन मास्टर) ड्युटी वर असल्याने चार्ट आणि एन्ट्रीज तेच बघत होते. गाडी प्लॅटफॉर्म ला लागली आणि ५ मिनिटांनी १ गृहस्थं माझ्या ऑफिसात शिरले. खादी कुर्ता जाकीट, पांढरा लेंगा, डोक्यावर टोपी, गळ्यात हारवय पन्नाशीच्या जवळपास, थोडे से स्थूल आणि चेहऱ्यावर एक कृत्रिम स्मित. ओळखायला वेळ लागला नाही कि हे  पुढारी आहेत. मला वाटलं कि गुजरातचे कुठले मिनिस्टर असतील. त्यांच्या मागे २-३ लोकं आली, एकाच्या हाथात सुटकेस आणि दुसऱ्याच्या हाथात एक कार्डबोर्डचा बॉक्स होता. सामान ठेऊन बरोबर आलेली लोक बाहेर गेली आणि पुढारी मला नमस्कार करत माझ्या समोरच्या खुर्चीत बसले देखील.

"मी चंद्रशेखर पाटील रावळगढहुन आमदार आहे" स्वतःचा परिचय देत ते म्हणाले.

महाराष्ट्राचा आमदार आणि गुजरात मध्ये हा रुबाब. वाटलं कि ह्यांना वेटिंग रूम ची वाट दाखवावी. पण मराठी माणूस बघून मी काही म्हंटलं नाही. आणि खरं सांगू तर रावळगढ ऐकून मी थांबलो, रावळगढला माझी मुलगी आणि जावई राहतात.

त्यांनी मला त्यांच्या प्रवास बद्दल, पक्षाबद्धल आणि राजनैतिक परिस्थिती बद्दल सांगितलं. पक्षाचं नाव महत्वाचं नाही म्हणून ते सगळं गाळून एवढं सांगतो कि त्यांच्या पक्षाचं जामनगर ला अधिवेशन होता. गुजरात मध्ये त्यांची पार्टी नवीनच होती म्हणून इथे जम बसवायला अधिवेशन ठेवले होते. ते इथे गाडी बदलायची असल्याने उतरले होते आणि २ तास घालवायला मी मराठी स्टेशन मास्टर असल्याने माझ्याशी गप्पा मारायला ते माझ्या ऑफिस मध्ये आले होते.

मला जरा आश्चर्यच वाटले.  वलसाड गुजरातेत असलं तरी महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे म्हणजे महाराष्ट्र सोडून हे अगदी पहिलच मोठं स्टेशन. या पुढाऱ्यांना महाराष्ट्र सोडल्या सोडल्या मराठीची आठवण येऊन ते माझ्याशी गप्पा मारायला आले असतील का? माझा काही विश्वास बसे ना. नक्की काही न काही काम असेल.

मी विशेष विचार ना करता चहा मागवला आणि इकडल्या तिकडल्या गप्पा मारायला लागलो. सरकारी नोकरांना राजकारणी धोरण ठेवायची सोय नसते आणि धोरण असलेच तरी ते मोकळेपणाने कुठल्याही पुढाऱ्याला सांगणं मूर्खपणाचं असतं. राजकारण, जाती, धर्म हे विषय सोडून इतर विषयावरच गप्पा रंगल्या होता. पुढारी बोलण्यात पटाईत होते आणि माझी हि करमणूक होत होती. आणि मग मी एक चूक करून बसलो. बोलण्याचा ओघात मी त्यांना हे सांगून गेलो कि माझी मुलगी रावळगढला असते आणि लगेच जीभ चावली.

पुढाऱ्यांचा चेहरा एकदम खुलला जणू ते अशाच संधीची वाट बघत होते. त्यांनी लगेच माझ्या कडून मुली आणि जावयाची चौकशी केली, पत्ता घेतला आणि म्हणाले

"तुमच्या मुलीची काळजी सोडा, माझं घर हे आता तीचं  रावळगढ मधलं माहेर".

मला आपली चूक लक्षात आली. स्टेशन मास्टरच्या १० मिनिटाच्या ओळखील त्याच्या मुलीला आपली मुलगी म्हणणं म्हणजे काही ना काही तरी डाव नक्कीच असेलच. माझ्याकडून ते काही तरी वाकडं तिकडं काम करून घेतील आणि मला भिडेखातर नाही म्हणता येणार नाही. मला तसा वाजबीपेक्षा जास्त विचार करायची सवय आहे पण मला नक्की समजले होते कि इथे मी चुकीचा अंदाज करत नव्हतो. गप्पांचा रूळ बदलून मी इकडचं तिकडचं  बोलणं काढलं. मग त्यांच्या करता नाष्टा मागवला पण त्यांनी विनम्रतेने नकार दिला. बऱ्याच वेळ गप्पा चालल्या पण त्यांनी माझ्या कडून काहीही अपेक्षा ठेवली नव्हती. गाडीची वेळ झाली आणि त्यांनी आपल्या बरोबरच्या लोकांना बोलावले, लोकांनी सुटकेस उचलली आणि ते गाडी मध्ये बसायला निघाले. माझ्या शंकेखोर स्वभावाची मलाच थोडी लाज वाटली. मी त्यांच्या मागे त्यांना डब्याशी सोडायला गेलो. डब्यात सामान ठेऊन त्यांच्या बरोबरची लोकं बाहेर आली. पुढाऱ्यांनी मला त्यांच्या कूपे मध्ये बोलावले. माझ्या पोटात परत ढवळलं. मी आत गेल्यावर ते म्हणाले

"अरे हो मी दोन दिवसाने याच वाटेनं परत जाईन तेंव्हा इथे २ तासाचा मुक्काम होईल. तुमच्या मुलीसाठी काही पाठवायचं असेल तर संकोच करून नका".

आता मात्र मी स्वतःच्या जास्ती विचार करणाऱ्या स्वभावावर मनातल्या मनात चिडलो. इतक्या सौजन्यमूर्ती माणसाशी ते फक्त पुढारी आहे म्हणून मी पूर्वग्रह ठेवून वागत होतो.

"मागच्या महिन्यातच मुलगी येऊन गेली म्हणून काही पाठवायचं नाही. पण परत येताना नक्की घरी जेवायला यायचं, घर जवळच आहे २ तासात सहज जाऊन येता येईल, मी वाट बघेन." मी अत्यंत विनम्रतेने म्हणालो.

"मी नक्की येईन आणि आपल्याला एक अजून तसदी देत आहे. त्याचं काय झालं, येतांना एका स्टेशनवर एका स्नेहीने मला इंपोर्टेड व्हिस्की चा एक बॉक्स दिला. तसं मी दारूला हाथ सुद्धा लावत नाही पण मला त्याच मन दुखवे ना म्हणून ती भेट मला स्वीकार करणे भाग होते.  गुजरातमध्ये दारूबंदी आहे आणि अधिवेशनला असली वस्तू बरोबर ठेवणं धोक्याचं आहे. म्हणून मी तो बॉक्स तुमच्या ऑफिस मधेच ठेवला आहे. परवा याच डाउन गाडी ने मी परत येईन तेंव्हा घेऊन जाईन. तुमच्या मुलीची बिलकुल काळजी करू नका. अच्छा गाडीची वेळही झाली आहे. तुम्हालाही कामं असतील. भेटूच परवा.  नमस्कार"

मी परत आपल्या ऑफिस मध्ये येऊन त्या बॉक्स कडे बघितलं. बॉक्स मला वेडावून हसत होता. २ दिवस बॉक्स सांभाळणं काही विशेष नाही पण मला कुठे तरी फसवल्या गेल्या सारखे वाटत होते"  कुलकर्णी मास्टर गोष्ट संपवता संपवता चिडले होते.

"हा हा, अहो मास्तर गुजरात मधल्या दारूबंदीच्या भीतीची सुद्धा थाप असेल. तिथे अधिवेशनला इंपोर्टेड व्हिस्की नेली तर सगळे आलेले सभासद पिऊन टाकतील ही खरी भीती असेल" मी हसत म्हणालो.

"अरे हो हा विचार तर मी केलाच नाही"  कुलकर्णी थोडे मोकळे झालेले वाटत होते. बहुतेक माझ्या जवळ सगळं बोलल्यामुळे त्यांना हलके वाटत होते.

"बरं मग अडलं कुठे, ते आपली वस्तू घेऊन जातीलच" मी विचारलं.

"दोन दिवस हेच समजून मी काही विशेष लक्षं दिलं नाही. पण आता ४ दिवस झाले तरी त्यांचा पत्ता नाही"

"येतील हो तुम्ही काय एवढी काळजी करता"

"कालचा पेपर वाचला? हे पहा"

कालच्या पेपरला फोटोसकट बातमी होती कि  "जामनगरच्या अधिवेशन मध्ये रावळगढचे आमदार चंद्रशेखर पाटील ह्यांनी दारूच्या नशेत हंगामा केला, बायकांची छेड काढली आणि वृत्तपत्रकारांना मारहाण केली. त्यांना तात्काळ पोलिसानी अटक करून त्यांच्यावर दारूबंदी भंग करणे आणि आणखीन काही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत"

"तर गणोबा, सत्ताधारी पक्ष काही आमदारांना लवकर सोडत नाही. त्यांचा झिंगलेला फोटो आहे, वृत्तपत्रकारही चिडलेले आहे आणि दारूबंदीवर सख्ती दाखवायची ही सुवर्ण संधी आहे. आणि जर १-२ महिन्यात सोडलंच तरी मला वाटत नाही कि एवढ्या प्रकरणा नंतर ते तो बॉक्स घ्यायला इथे येतील."

"हे तर बरोबर आहे साहेब" मी म्हणालो.

"मग आता मी ह्या बॉक्सचं  काय करु? मी काल पासून विचार करून करून थकलो आहे. रेल्वे परिसरात दारूबंदी असतेच वरून हे गुजरात. कोणाला ह्याची बातमी लागली तर मला अटक झालीच. माझ्या या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल. काल संध्याकाळी ASM विचारीत होते कि "सर तुमच्या ऑफिस मध्ये तो बॉक्स कुठला आहे".  मी रिटायरमेंटच्या जवळ आलेला मनुष्य, माझं रेकॉर्ड लखलखीत, दारू कधी जवळून बघितली सुद्धा नाही आणि अशी काही भानगड झाली तर सगळी अब्रू मातीत जाईल. त्या आमदाराबरोबर २-३ लोक अजून होते त्यांनी पोलिसाला बॉक्स बद्दल सांगितलं तर? काल पासून प्लॅटफॉर्मवर उतरणारा प्रत्येक गणवेशधारी किंवा रुबाबदार मनुष्य मला दारूबंदी मोहिमेचा अधिकारी वाटतो आणि असं वाटतं कि माझ्या ऑफिस वर धाड  येईल. काल रात्रभर झोप नाही, सारखं वाटत होत कि माझ्या जवळ बाटल्या मिळाल्या आहे, मला हाथकड्या घालून उभं केला आहे आणि ये बघून कुटुंब रडतं आहे. सकाळी लवकर आलो, या विचाराने कि सगळ्या बाटल्या संडासात रिकाम्या करायच्या. पण दारूला वास असतो म्हणे, सगळ्या प्लॅटफॉर्मवर दारूचा वास दरवळला तर? कुणावर विश्वास नाही आणि स्वतः बॉक्स उचलून नेला तर लोक बघून प्रश्न विचारतील ही भीती. गणोबा तुला हे सगळं सांगितलं खूप हिम्मत करून, तुझ्यावर विश्वास ठेऊन आणि खरं सांगू तर ह्यासाठी सांगितलं की मी पकडला गेलो तर कमीत कमीत तू तरी माझ्याबाजूने  साक्ष देशील"  कुलकर्णी मास्टर हे सगळं सांगताना खूप घाबरलेले होते.


मी कुलकर्णी साहेबांचं बोलणं ऐकतचं राहिलो. किती दुर्बळ असतो सभ्य समाज. काही केलेलं नाही तरी केवढी भीती. लोकं पण बदनामी चवीने ऐकतात पण खुलासे ऐकत नाही. इतक्या वर्षाची कमावलेली अब्रू जपणं खरंच साहेबांना कठीण जात होता.

"साहेब दाखवा तो बॉक्स मला"

मग साहेब मला त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेले. त्यांच्या समोर मी तो बॉक्स उघडायला सुरुवात केली.  ते नाही म्हणत होते पण मी ऐकले नाही. बघितलं तर १० बाटल्या होत्या इंपोर्टेड व्हिस्कीच्या.

"जर मी आत्ताच्या आत्ता या बाटल्या इथून घेऊन गेलो तर? " मी मास्तरांकडे बघत म्हणालो.

"गणोबा मी तुला १०० रुपये देईन. तू करू शकतो हे माझ्या करता? " मास्तरच्या कपाळावरच्या आठ्या कमी होत होत्या.

"१०० रुपये नको साहेब, पण आता जरा मोकळं हसा. विसरून जा की कधी तुमच्या कडे या बाटल्या होत्या." मी सरळ बॉक्स उचलून कॅन्टीन मध्ये आणला.

रात्री २ बाटल्या पोलिसानां दिल्या आणि ८ माहितीच्या गिऱ्हाइकांना विकून चांगले ४००० कमावले. सभ्य समाजाची कमाल आहे जिथे पैसे मिळवायची संधी असली कि तिथे हे घाबरून बसतात. आता मी तुम्हाला २ गोष्टी सांगितल्या दोन्ही मध्ये कुणी तर कोणाची वस्तू ठेव म्हणून घेतली आणि पस्तावत होता. पण गरीब माणूस या काळजीत होता कि ती ठेव हरवली तर काय, आणि सभ्य मनुष्य या चिंतेत की वस्तू आपल्या जवळ राहिली तर काय.

आता थोडं खाजगी.  तुम्हाला थोडा धक्का बसला असेल कि हा गणोबा काही साधा सभ्य माणूस नव्हे. गोष्ट ज्याच्या दृष्टिकोनातून सांगितली जाते त्या पात्रात वाचक स्वतःला शोधतात आणि म्हणून त्याला सौज्वळ, साधा, गरीब, सभ्य समजतात.  तसा मी सभ्य आहे हो पण फक्त उगाच घाबरत नाही आणि जास्त विचार करत नाही. पण मला कुठे काय बोलायचं हे पक्के समजते . उदाहरणार्थं आपले कुलकर्णी साहेब इतके सरळ, साधे माणूस म्हणून मी त्यांना बिहारच्या कुमार साहेबांची गोष्ट थोडी बदलून सांगितली. कुमार साहेबांचे मनाचे विचार मी सरळ आपल्या मनाने ठोकले होते. का? अहो मी कुलकर्णी मास्तरांना ये कसं सांगू शकलो असतो मी कि त्या रात्री दरोडेखोरांना कुमार साहेबांनीच कळवलं होतं कि आज रात्री एक मनुष्य प्लॅटफॉर्मवर असेल, त्याच्या कडे १०००० रुपये असतील आणि तो बहुतेक स्वच्छतागृहात लपलेला असेल.


सचिन गोडबोले 




1 comment: