पाऊस - माझा मित्र - स्मिता शेखर कोरडे

  
ओंजळीत माझ्या 
 येशील का रे थोडा 
  तुझ्या सोबत भिजेन
नाचेन गाईन
  होऊ का रे मी पण
  तुझ्यासारखा वेडा?

  पागोळ्यांच्या तालावर
  मन माझे डोले
  उदासलेले मन
  अश्रूतून खुले

  सरसर धारांची
  मातीला बसे मिठी
  भरलेले आभाळ
  जिथे पोचे दिठी!

  मातकट पाण्यामधे
  दिसे मज बालपण
  छपछप करीत आपण
  होड्या सोडू रे चल

  तडतड सरसर
  टपटप धो धो
  अरे अरे, पावसा
  किती रे तुझे आवाज
  सृष्टीला घालतोस कैसे
  हिरवेकंच साज!

  धारांशी करू दोस्ती 
  म्हणती रे हे अंकूर
  पटापट वर येती
  मातीचा फोडून ऊर!

  बाळे डोलताना पाहून 
  आनंदली सारी सृष्टी
  अरे सोनुल्या पावसा,
  तू कर छान वृष्टी!

  घेता ओंजळीत तुझ्या 
  थेंबांचे टपोरे मोती
  आठव करविती
  बालपणीची नातीगोती!

  ------------------------------------------------
स्मिता शेखर कोरडे

 

1 comment: